नवी दिल्ली : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत चीनच्या राजदूतांची गुपचूप घेतलेली भेट व प्रथम हे वृत्त नाकारून नंतर ती झाल्याचे मान्य करणे यावरून सत्तारूढ भाजपने कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. गांधी यांनी चीनच्या राजदूतांना त्या देशाच्या वकिलातीत जाऊन भेटण्यामागचे "टायमिंग' संशयास्पद असल्याचा हल्ला भाजपने चढविला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राईलच्या दौऱ्यावर गेल्यावर चीनला मळमळ सुरू झाली व त्या देशाने सिक्कीमचा मुद्दा पुन्हा उकरून काढला. यावरून दोन्ही देशांत सध्या तणावाची परिस्थिती आहे. वातावरण तप्त असल्याने मोदी यांनी यावर विस्तृत भाष्य करण्याचे टाळल्याचे भाजपचे म्हणणे आहे. काही बोलायचे असेल तर पंतप्रधान संसदेतच बोलतील, अशीही शक्यता वर्तविली जाते. चीनशी या मुद्द्यावर द्विपक्षीय उपाययोजना सरकारच्या मनात आहे. अशा वेळी राहुल यांनी शनिवारी (ता. 8) रात्री चीनचे राजदूत लुओ झाओहुई यांना भेटण्यासाठी त्या दूतावासात जाऊन काय साधले, असा भाजपचा प्रश्न आहे.
मनात येईल तेव्हा उलटसुलट बोलण्याची सवय लागलेल्या कॉंग्रेसच्या उपाध्यक्षांनी अशा अवेळी चिनी दूतावासात जाऊन काय साधले, अशी विचारणा भाजप नेते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी केली. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, की देशाच्या हिताच्या मुद्द्यावर सर्व पक्षांनी सरकारच्या बाजूने उभे रहाणे ही भारताची परंपरा आहे. चीनच्या अधिकृत संकेतस्थळावरून राहुल यांच्या भेटीबाबत अधिकृतरीत्या जगजाहीर माहिती दिली गेली हे लक्षात घेतले पाहिजे.
राज्यसभेसाठी विनय तेंडुलकर
राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या गोव्यातील एका जागेसाठी भाजपने संघकार्यकर्ते विनय तेंडुलकर यांच्या नावाची घोषणा आज केली. विधानसभा निवडणुकीत भाजपला अडचणीत आणू पाहणारे संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर यांना याद्वारे शह देण्याचा सुप्त उद्देश यामागे आहे. तेंडुलकर यांच्या नावाची घोषणा दिल्लीतून आज दुपारी करण्यात आली. कॉंग्रेसचे शांताराम नाईक यांचा दोन वेळचा कार्यकाळ या महिन्यातच संपणार आहे. या एका जागेसाठी कॉंग्रेसपेक्षा कमी आमदार असलेल्या भाजपचेच पारडे जड राहणार असल्याचे स्पष्ट आहे.
|