नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर "कपटी युद्धा'ला सामोरे जात असून, त्याचा सामना करण्यासाठी नवे मार्ग शोधावेच लागतील, असे सांगतानाच लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या संरक्षणासाठी आंदोलकलाच जीपला बांधून त्याचा मानवी ढालीसारखा उपयोग करणारे मेजर लितुल गोगोई यांचे समर्थन केले आहे. आंदोलक जवानांवर दगड आणि पेट्रोल बॉंब फेकत असतील तर मी आमच्या सैनिकांना हे सर्व पाहत राहून त्यांना मरण्यासाठी सोडू शकत नाही. याच आंदोलकांनी सुरक्षा दलांवर दगड भिरकावण्याऐवजी बंदुकांचा वापर केला असता तर मला आनंदच झाला असता असा उपरोधिक टोलाही त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना लगावला.
सध्या काश्मीर खोऱ्यामध्ये छुपे युद्ध सुरू असून, तो कपटी संघर्ष आहे, यामध्ये कपटनीतीचा वापर केला जातो आहे. जेव्हा प्रतिस्पर्धी समोरसमोर येऊन लढतात तेव्हा त्या संघर्षाला युद्धाचे नियम लागू होतात. आता जे सुरू आहे ते कपटी युद्ध आहे. याला तोंड देण्यासाठी नव्या मार्गांचा अवलंब करावा लागेल. काश्मीरमध्ये संघर्ष करणाऱ्या जवानांचे मनौधर्य वाढविण्यासाठी मला प्रयत्न करावेच लागतील असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील संरक्षण विषयक आव्हानांवर भाष्य करताना ते म्हणाले की, ""या आंदोलकांनी दगडांऐवजी आमच्याविरोधात शस्त्रांचा वापर केला असता तर आमच्या जे मनात होते ते आम्ही करून दाखविले असते. लोकांच्या मनातील लष्कराची भीती कमी झाली तर देशाचे अधःपतन व्हायला वेळ लागत नाही. बाहेरच्या आक्रमकांना तर तुमची भीती वाटायलाच हवी; पण त्याचबरोबर तुमचे लोकही तुम्हाला घाबरले पाहिजेत. आमचे लष्कर हे काहीसे मैत्रीपूर्ण आहे; पण जेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा लोकांनी तुम्हाला घाबरायलाच हवे.''
मनोधैर्य महत्त्वाचे
लष्करप्रमुख म्हणून माझ्यासाठी लष्कराचे मनोधैर्य महत्त्वाचे असून, ते अबाधित ठेवणे हेच माझे काम आहे. लढाईच्या मैदानापासून मी खूप दूर असतो. तेथील परिस्थितीवर मी प्रभाव टाकू शकत नाही. तेथे लढणाऱ्या जवानांना मी तुमच्या पाठीशी आहे एवढेच सांगू शकतो. काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर मात्र मी तेथे असेल. सुरक्षा दलांमधील विश्वासाचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. जेव्हा राज्यातील पोलिंग एजंटांनी संरक्षण मागितले होते तेव्हा गोगोईंनी ते नाकारले नव्हते, उद्या अनंतनागमध्ये निवडणूक झाल्यास याचीच पुनरावृत्ती होऊ शकते, आणीबाणीच्या स्थितीमध्ये लष्कराने मदत केली नाही तर लोकांचा लष्कर आणि पोलिसांवरील विश्वास उडेल असेही रावत यांनी नमूद केले.
लष्करप्रमुख म्हणाले
लोकांत अविश्वास निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न
गोगोईंना पुरस्कार देण्याचा निर्णय योग्यच
लष्करालाही स्वसंरक्षणाचा अधिकार आहे
सामान्य माणसाचे संरक्षण करणे हे लष्कराचे कर्तव्य
घुसखोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना हव्यात
उमर फैयाजच्या हत्येनंतर आवाज का उठला नाही?
राजकीय उपाययोजनांबाबत सरकारच निर्णय घेईल
|