दिल्लीवर पुन्हा प्रदूषित धुके 

दिल्लीवर पुन्हा प्रदूषित धुके 
Updated on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला मंगळवारी सकाळी प्रदूषित दाट धुक्‍याचा वेढा पडला. दरवर्षी या काळात किमान एक महिना शहर अशा धुक्‍यात हरवून जाते अन्‌ येथील स्थिती 'गॅस चेंबर'सारखी होते. आज सकाळी काही ठिकाणी हवेतील धुक्‍याची घनता सुरक्षित मर्यादेपेक्षा 44 पटींनी वाढून 'पीएम12' एवढी धोकादायक पातळी गाठली होती. 

प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेत दिल्लीतील शाळा काही दिवस बंद ठेवण्याचा विचार करण्याची सूचना मुख्यमंत्री केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना केली. त्यानुसार आज सायंकाळी झालेल्या बैठकीत बुधवारी (ता.8) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सिसोदिया यांनी जाहीर केला.

हवेतील वाढत्या प्रदूषणावरील नियंत्रणासाठी काय उपाययोजना केली याबद्दल गुरुवारपर्यंत माहिती देण्याची नोटीस राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिल्लीसह शेजारील उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब या राज्यांना बजावली आहे. दिल्लीकरांची आजची सकाळ दाट धुक्‍यातच सुरू झाली. यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने रस्त्यावरच्या वाहतुकीला याचा फटका बसला. हवाई वाहतुकवरही परिणाम झाला.

सर्वांत गंभीर बाब म्हणजे नागरिकांना श्‍वासोच्छ्वास घेण्यास कठीण झाले. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना श्‍वसनास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गरज नसेल त्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. 

दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या निरीक्षणानुसार हवेतील धुक्‍याची घनता पीएम 2.5ची नोंद 648 वर गेली. सामान्य 60च्या पातळीपेक्षा हे प्रमाण दहा पटींनी वाढले. काहा ठिकाणी 'पीएम 10'चे प्रमाण 999वर गेले होते. घन व द्रव स्वरूपातील प्रदूषण वाढविणारे घटक या हवेत आढळले आहेत. यात धूळ, धूर, काजळी व द्रव स्वरूपातील कण यांचा समावेश आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज सकाळी दहा वाजता सर्वाधिक प्रदूषणाची नोंद केली. 

दिल्लीतील हवेने प्रदूषणाची उच्चतम पातळी आज गाठली. या संकटापासून बचाव करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) नऊ हजार मास्क मागविले आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिल्ली मेट्रो, अन्य सरकारी कार्यालये आणि मंत्रालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे मास्क पुरविण्यात येणार आहेत. निमलष्करी दलातील महिला व पुरुष कर्मचाऱ्यांचे विषारी धुक्‍यापासून संरक्षण होण्यासाठी 'सीआयएसएफ'चे महासंचालक ओ. पी. सिंग यांनी मास्कची मागणी नोंदविली असल्याची माहिती निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

दिल्लीत हवेतील वाढत्या प्रदूषणाचा गंभीर परिणाम मुलांच्या आरोग्यावर होत असल्याचे लक्षात घेऊन मुलांना शाळेत मैदानी खेळ व तसे सर्व प्रकार बंद करण्याचे आवाहन भारतीय वैद्यकीय संघटनेने सरकारला केली आहे. 
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, नवी दिल्ली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.