नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज प्रशासकीय सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करताना विविध विभागांमध्ये सुमारे 17 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. निवडणूक आयुक्तपदी माजी प्रशासक सुनील अरोरा, महालेखा नियंत्रक (कॅग) म्हणून माजी गृह सचिव राजीव महर्षी यांची, तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अध्यक्षपदी अनिता करवाल यांची नियुक्ती करण्यात आली.
कायदा मंत्रालयाने अरोरा यांच्या नियुक्तीची माहिती दिली. नसीम झैदी जुलैमध्ये निवृत्त झाल्यानंतर निवडणूक आयुक्तांचे पद रिक्त होते. अचल कुमार जोती हे मुख्य निवडणूक आयुक्त असून, ओम प्रकाश रावत हे अन्य निवडणूक आयुक्त आहेत. अरोरा यांनी यापूर्वी माहिती आणि नभोवाणी सचिव तसेच कौशल्य विकास मंत्रालयातही सचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी अर्थ, वस्त्रोद्योग आणि नियोजन मंडळासारख्या मंत्रालये अणि विभागातही सेवा बजावली आहे.
महर्षी यांचा गृह सचिवपदाचा कार्यकाळ आजच संपत होता. त्यांची आता नवे कॅग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, अन्य नियुक्त्यांमध्ये अर्थ सेवा विभागाच्या सचिवपदी वरिष्ठ प्रशासक राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजच निवृत्त झालेल्या अंजुली छिब दुग्गल यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. राजेश कुमार चतुर्वेदी यांच्या जागी अनिता करवाल यांची सीबीएसईच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. राजेश कुमार आता राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळतील. प्रदीप कुमार त्रिपाठी हे मनुष्यबळ मंत्रालयातील नवे आस्थापना अधिकारी आणि अतिरिक्त सचिव असतील. अवजड उद्योग विभागाच्या सचिवपदी अशा राम सिहाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या कॅबिनेट सचिवालयात सचिव (समन्वय) म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या जागी वाणिज्य मंत्रालयातील अतिरिक्त सचिव इंदरजित सिंह यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी एन. बैजंद्रकुमार यांची नियुक्ती झाली आहे.
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रामेश्वर प्रसाद गुप्ता हे निती आयोगाचे अतिरिक्त सचिव असतील. ते सध्या नॅशनल वक्फ विकास महामंडळ लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. सत्यजीत राजन हे पर्यटन विभागाचे महासंचालक म्हणून काम पाहतील. वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव अली रझा रिझवी हे माहिती आणि नभोवाणी मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि आर्थिक सल्लागारपदाची जबाबदारी सांभाळतील.
|