भारतीयांनी जिंकली लढाई - मोदी

भारतीयांनी जिंकली लढाई - मोदी
Updated on

नवी दिल्ली - ‘‘नोटाबंदी म्हणजे सव्वाशे कोटी भारतीयांनी भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरुद्ध पुकारलेली व जिंकलेली निर्णायक लढाई आहे,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नोटाबंदीच्या वर्षपूर्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. 

गेल्या वर्षी याच दिवशी रात्री आठ वाजता झालेल्या नोटाबंदीच्या घोषणेच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने आज दिल्लीसह देशभरात ‘काळा पैसाविरोधी दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक व्हिडिओ जारी करून, तसेच ट्विटरच्या माध्यमातून नोटाबंदीला पाठिंबा देणाऱ्या सर्वसामान्य भारतीयांचे मनापासून आभार मानले. 

मोदी यांनी म्हटले आहे, की ‘‘नोटाबंदीमुळे ७.६२ लाख बनावट नोटा पकडल्या गेल्या. ३.६८ लाख कोटी रुपये बेहिशेबी स्वरूपात जमा करण्यात आले. सहा लाख कोटी रुपये हाय व्हॅल्यू नोटा प्रभावी रूपात कमी झाल्या. १७ लाख ३३ हजार बेनामी खात्यांबाबत माहिती मिळाली. २३.२२ लाख खात्यांत ७.६२ लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या.’’

दरम्यान, दिल्लीत भाजपतर्फे रायसीना रस्ता ते कॅनॉट प्लेसपर्यंत काढण्यात आलेल्या फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. तेथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यात केंद्रीय मंत्री विजय गोयल, दिल्ली भाजप प्रभारी श्‍याम जाजू , प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी आदी सहभागी झाले. 

‘मोदींकडून जनक्षोभाचे धार्मिक विद्वेषात रूपांतर’
नवी दिल्ली - ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पराक्रम करून देशाला लुटले आणि बेरोजगारीमुळे निर्माण झालेल्या जनतेच्या रागाचे रूपांतर धार्मिक विद्वेषात केले,’’ अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

नोटाबंदी ही शोकांतिका असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदी यांच्या या अविचारी कृतीमुळे कोट्यवधी प्रामाणिक भारतीयांचे जीवनमान उद्‌ध्वस्त झाले. मोदींच्या सुधारणांमुळे देशाची लूट झाली आहे. नोटाबंदीमुळे देशाच्या ‘जीडीपी’त दोन टक्के घट झाली. कोट्यवधी कामगारांचे जीवन उद्‌ध्वस्त झाले.’’ नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘फायनान्शियल टाइम्स’मध्ये राहुल गांधी यांनी लेख लिहिला असून, त्यात त्यांनी ही टीका केली आहे. लेखात ते म्हणतात, ‘‘भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा दावा पंतप्रधान करतात; मात्र गेल्या बारा महिन्यांत केवळ अर्थव्यवस्थेतील आत्मविश्‍वासाचे उच्चाटन झाले आहे.’’ दरम्यान, गांधी यांनी आज ट्‌विटरवरही मोदींवर टीका केली आहे. दरम्यान, काँग्रेसने आज नोटाबंदी म्हणजे मोठा गैरव्यवहार असल्याची टीका करत ‘काळा दिन’ पाळला. देशभर काँग्रेसच्या नेत्यांनी निदर्शने केली. 

राज्यभरातील घडामोडी
कोल्हापूर - नोटांबदीमुळे शेतकऱ्याची भाजी-भाकरी खायची ऐपत राहिली नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी युवा आघाडीने ‘खर्डा-भाकरी’  आंदोलन केले. काँग्रेसकडून मुंडण करून सरकारचा निषेध.

सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नोटांचे श्राद्ध.

सोलापूर - काँग्रेस, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निदर्शने. भाजपकडून समर्थन म्हणून लाडूचे वाटप. 

जळगाव - काँग्रेसची निषेध फेरी, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नोटाबंदीचे श्राद्ध आंदोलन. चोपडा येथे सुकाणू समितीच्या वतीने चलनातून बाद केलेल्या जुन्या प्रतीकात्मक नोटेला पुष्पहार अर्पण. 

नाशिक - शिवसेनेने गोदावरीच्या घाटावर निर्णयाविरोधात सरकारचे वर्षश्राद्ध घातले. राष्ट्रवादी काँग्रेसने श्राद्ध घालत निषेध नोंदवला. काँग्रेसने काळा दिन पाळत सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. जनस्वराज्य पक्षाने आंदोलन केले तर पुरोगामी संघटनानी मोर्चा काढत निषेध नोंदवला. भाजपने हा दिवस भ्रष्टाचार निर्मूलन दिन म्हणून साजरा करीत लोकांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प सोडला.

औरंगाबाद - काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष यासह पॅंथर सेना, भारिप आदींतर्फे नोटाबंदीविरोधात आंदोलने. मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही अशी आंदोलने. परभणीत काँग्रेसने पाळला काळा दिवस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.