प्रकाशदूतांच्या यशोगाथांना मोदींकडून उजाळा

प्रकाशदूतांच्या यशोगाथांना मोदींकडून उजाळा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’च्या ६२व्या भागामध्ये आपापल्या कार्यकर्तृत्वाने इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेल्या देशवासीयांची कहाणी सांगितली. वसंत ऋतूच्या आगमनाच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी इतरांच्या जीवनात प्रेरणेचा वसंत फुलविणाऱ्यांची उदाहरणे दिली. बिहारच्या पूर्णियातील विणकर महिला, बारावर्षीय गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन व शंभरी पार केलेल्या भागीरथी अम्मा यांच्या यशोगाथांना मोदींनी उजाळा दिला.

‘हुनर हाट’मध्ये घेतलेल्या लिट्टी-चोखाच्या आस्वादाची चव अजूनही जिभेवर रेंगाळत असल्याचे सांगतानाच पंतप्रधानांनी ‘इस्रो’बाबत माहिती देऊन एका विद्यार्थ्याचे शंकानिरसनही केले.

‘‘श्रीहरिकोटातील रॉकेट प्रक्षेपणाची प्रक्रिया तुम्ही प्रत्यक्ष तेथे जाऊन बघू शकता. विमानांतही बायोइंधन वापरण्यास भारतीय लष्कराने सुरुवात केल्याचे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, लेह विमानतळावरून ‘एएन-३२’ या विमानाने दहा टक्के बायोइंधनासह अलीकडेच आकाशात झेप घेतली तेव्हा हवाईदलाने नवा इतिहास घडविला. सामान्य इंधन व बायोइंधनाचे मिश्रण हवाई दलाने प्रत्यक्ष वापरण्याची ही पहिलीच वेळ होती. मोदी म्हणाले की, काम्या कार्तिकेयन या 12 वर्षांच्या चिमुरडीने जगातील प्रचंड उंचीवरच्या (7 हजार मीटर) दक्षिण अमेरिकेतील माउंट एकोनोगोवा हे शिखर सर केले. काम्या आता सारी उंच शिखरे सर करण्याच्या मोहिमेवर आहे.

भागीरथी अम्मांचा उल्लेख
केरळमधील 105 वर्षीय भागीरथी अम्मा यांनी या वयातही परीक्षेत 70 टक्के व गणितात 100 पैकी 100 गुण मिळवून जगाला दाखविले, की माणसाच्या आतील विद्यार्थी सदैव जिवंत राहतो, असेही पंतप्रधानांनी सांगितले. पूर्णिया जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांनी शतूतच्या झाडावरील रेशमाच्या किड्यांचे संगोपन करून रेशमाचे उत्पादन घेतले, तसेच त्याहीपुढे जाऊन त्यांच्या साड्या बनवून स्वतःच विकणे सुरू केले. आज या शतूत उत्पादन समूहाच्या महिलांच्या साड्या हजारो रुपयांना विकल्या जात आहेत, याकडेही मोदींनी लक्ष वेधले.

मोदींनी इस्रोच्या युविका उपक्रमाचा विशेष उल्लेख केला. आठवी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक राज्यांतील दोन-तीन विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करवून घेतले जाते, असे  ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com