वेश्या आहोत म्हणून?
 | | मी सुरेखा माने... एक सेक्स वर्कर आणि मी सीमा शिंदे, सोशल वर्कर. पुण्याला
वेश्यावस्तीत आम्ही काम करतो. एचआयव्ही एड्सबद्दल जागृती करतो. "पाथफाइंडर
इंटरनॅशनल' या संस्थेच्या मुक्ता प्रकल्पातर्फे हे काम चालतं. एप्रिलच्या
शेवटच्या आठवड्यात आम्ही आमच्या नगरच्या एका मैत्रिणीसह- संगीता शेलारसह बिहारला
जाऊन आलो. तिथं जे पाहिलं ते भयंकर होतं... आम्ही खूप अस्वस्थ झालो. कुणाशी तरी
शेअर करावंसं वाटलं... त्याचाच हा प्रयत्न... पाहा, तुम्हालाही अस्वस्थ करतोय
का... ...... बिहारमधलं एक ठिकाण... सीतामढी. सीतेचा जन्म इथं झाला, म्हणजे जनक
राजाला सीता इथंच सापडली अशी कथा आहे. म्हणून ही सीतेची "जन्मभूमी' मानली जाते.
सीतेची जन्मभूमी म्हणजे ही पवित्र भूमी, पवित्र स्थान.
या सीतामढीच्या जवळ बोहाटोला नावाची एक वस्ती आहे. गोलाकार वसलेली घरं आणि मधे
मोठं मैदान. ही आहे वेश्यावस्ती. अनेक वर्षं ही वस्ती इथं आहे. बोहाटोलाच्या
चारही बाजूंना चार गावं वसलेली आहेत. एका गावातून कुणालाही दुसऱ्या गावात जायचं
म्हटलं, तर या वस्तीतूनच जावं लागतं. वस्तीतल्या बायका धंद्याच्या वेळी बाहेर
उभ्या असतात. आमच्या बायका, मुलं या वस्तीतून जातात, तुम्ही रस्त्यावर उभं राहू
नका, अशी या गावांतल्या लोकांची मागणी होती; पण ती या वस्तीतल्या स्त्रियांनी ऐकली
नाही. सहा महिन्यांपूर्वी गावकऱ्यांनी एक बैठक घेतली आणि ही वस्तीच इथं नको, ती
हटवा, असा सूर लावला. ही सीतेची पवित्र भूमी आहे, तिथं शरीरविक्रय व्हायला नको,
हेही त्यांचं एक कारण होतंच. तसा अर्ज त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे केला.
१५ एप्रिलची गोष्ट. बोहाटोलाच्या मैदानात बैलांचा मेळा भरला होता. आजुबाजूच्या
अनेक गावांतले लोक या मेळ्याला आले होते. एवढी गर्दी, स्वाभाविकच पोलिस बंदोबस्तही
होता. एका व्यापाऱ्याच्या खिशात ६० हजार रुपये होते. ते घेऊनच तो बोहाटोलामध्ये
एका वेश्येकडे गेला. वेश्येला त्याच्याकडे पैसे असल्याचा सुगावा लागला आणि तिनं
त्याला लुटलं. या व्यापाऱ्यानं बाहेर येऊन आरडाओरडा सुरू केला. बैलांच्या
मेळ्यासाठी जमलेल्या लोकांपर्यंत हे पोचलं आणि वातावरण पेटलं...
सकाळी दहाच्या सुमाराला बोहाटोलामधल्या एका घराला आग लागली... आरडाओरडा झाला,
पळापळ झाली... आग लागली आहे, असंच वाटलं आधी...; पण पाहता-पाहता संपूर्ण वस्तीनं,
सगळ्या बाजूंनी पेट घेतला आणि बायकांना कळलं, ही आग लागलेली नाही, लावलेली आहे.
बैल मेळ्यासाठी आलेले लोक आता वस्तीभोवती कडं करून उभे राहिले. आगीपासून जीव
वाचवण्यासाठी लहान मुलांसह बाहेर पळणाऱ्या बायकांना ते पुन्हा आत ढकलत होते... एका
बाईच्या कडेवरचं दोन महिन्यांचं मूल खेचून लोकांनी परत आगीत टाकलं... दहा आणि बारा
वर्षांच्या दोन मुली बाहेर धावत येत होत्या. मोठी पळाली, धाकटीला लोकांनी पकडून
बेदम मारहाण केली... एका मुलाच्या दोन्ही मांड्या फ्रॅक्चर झाल्या... हे चालू
असताना गावकऱ्यांना कुणी रोखतही नव्हतं. आग लागली, तेव्हा पोलिस तिथंच होते... ते
फक्त बघत होते आणि लोकांना सांगत होते, तुम्हाला जे काही करायचंय, ते तीन-चार
तासांत करून घ्या... खुद्द पोलिस अधीक्षक घटनास्थळी होते. बायका येत होत्या आणि
आम्हाला वाचवा, असं म्हणत त्यांच्या अक्षरश: पाया पडत होत्या; पण ते त्यांना
लाथेनं ढकलून देत होते...
दर्ग्यात मिळाला आश्रय
इथून पळालेल्या सगळ्या बायका वस्तीतल्या दर्ग्यात आश्रयाला गेल्या; पण त्यांच्या
मागून जमाव तिथंही पोचला. त्यांना इथं ठेवू नका, परिणाम वाईट होतील, अशा धमक्या
दर्ग्याच्या व्यवस्थापनाला दिल्या जात होत्या; पण त्यांनी ऐकलं नाही. लोक
दर्ग्याभोवती असलेल्या ग्रिल्सही तोडण्याचा प्रयत्न करत होते; पण तो यशस्वी झाला
नाही... शेवटी त्यांनी दर्ग्याजवळच्या चहावाल्याला भरपूर पाणी उकळायला सांगितलं.
हे उकळतं पाणी दर्ग्यात लपलेल्या स्त्रियांच्या अंगावर त्यांना ओतायचं होतं; पण
चहावाल्यानं पाणी उकळायला नकार दिला. त्यालाही मग बेदम मारहाण करण्यात आली...
दुपारी चारपर्यंत हा गोंधळ सुरू होता. बायका दर्ग्यात बसल्या होत्या. चार वाजता
सीआरपीएफचे जवान आले. बायका आधी त्यांच्याशी बोलायलाच तयार नव्हत्या. पोलिसांचा
अनुभव त्यांनी सकाळपासून घेतला होता; पण जवानांनी त्यांना समजावलं. सहाच्या
सुमाराला अधीक्षकांसह पोलिस आले. त्यांनी त्यांना "गावकऱ्यांपासून संरक्षण देतो'
असं सांगून बांधकाम चालू असलेल्या पोलिस लाइनीतल्या एका इमारतीत नेलं. या
इमारतीच्या ना भिंती धड उभ्या रहिलेल्या... खाली लादी नाही... पाणी नाही, वीज
नाही... टॉयलेट्स नाहीत... तीन दिवस या २९० बायका तिथंच राहिल्या... मार
खाल्लेल्या... भाजलेल्या... विव्हळत, तडफडत...
कोलकत्याच्या सोनागाची इथल्या दुरबार महिला संघाच्या कार्यकर्त्यांना बिहारमध्ये
अशी घटना घडल्याची खबर लागली आणि त्यांनी धाव घेतली. पोलिसांच्या सतरा प्रकारच्या
परवानग्या काढून बोहाटोलामधल्या महिलांची भेट घेतली. नेमकं काय घडलं ते
त्यांच्याकडून समजून घेतलं आणि कामाला सुरवात केली. या महिलांना आधी औषधपाणी केलं.
त्यांच्यावर डॉक्टरी उपचार सुरू झाले. तीन दिवस त्यांनी अंगाला पाणी लावलं नव्हतं
की कपडे बदलले नव्हते. त्यांना कपडे दिले गेले. आग लावायच्या आधी तासभर एक महिला
बाळंत झाली होती. तिला, तिच्या बाळाला अंघोळही घालायला मिळाली नव्हती. तिला
हॉस्पिटलमध्ये नेलं. प्राथमिक मदत झाल्यावर वेश्यांमध्ये काम करणाऱ्या भारतातल्या
स्वयंसेवी संस्थांना त्यांनी हे कळवलं आणि या महिलांना आधार देण्यासाठी, त्यांना
मदत करण्यासाठी काही कार्यकर्ते पाठवायला सांगितलं. आम्ही गेलो होतो ते याच
उद्देशानं...
मदतही नाही, सुटकाही नाही
एप्रिलची २६ तारीख होती ती. घटना घडून दहा दिवस होऊन गेले होते; पण कुणीही या
महिलांना सोडवायला आलं नव्हतं. पोलिस तशी परवानगी देतच नव्हते. यांना सोडलं तर
गावकरी त्यांच्यावर पुन्हा हल्ला करतील, असं ते एकीकडे म्हणत होते आणि दुसरीकडे या
बायकांना सांगत होते, "पळून जा सरळ तुम्ही इथून... नाहीतरी आता इथं राहून काय
करणार... गावकरी नाहीच राहू देणार...' पोलिसांना आपली जबाबदारी झटकायची होती. या
बायका पळून गेल्या, तर त्यांना हात झटकून मोकळं होता येणार होतं...
आम्ही एकत्र आलो आणि काहीतरी करतोय हे पाहून गावकरी बिथरले. त्यांनी मीडियाला
हाताशी धरलं. एका चॅनेलवरून आम्हाला धमक्या यायला लागल्या... "यहां के वेश्याओ
को मदद करने बाहर से जो वेश्याएं आयी हैं, वो तुरंत यहां से निकल जाएं... वरना
उनकी जान को खतरा होगा... चौबीस घंटों का समय उन्हें दिया जाता है...' आम्ही ज्या
हॉटेलमध्ये राहिलो होतो, त्या हॉटेलवाल्यांनीही आम्हाला रूम खाली करायला
सांगितल्या; कारण त्यांनाही धमक्या येत होत्या. तीन दिवसांत आम्ही दोन हॉटेल्स
बदलली.
आम्ही मग धरणं धरायचं ठरवलं. आमच्या मुख्य मागण्या होत्या... आमच्या महिलांना
सुरक्षित घरी पोचवा... त्यांना तिथंही संरक्षण द्या... त्यांचं झालेलं नुकसान भरून
द्या... आणि ज्यांनी त्यांच्यावर अत्याचार केलेत, त्यांच्यावर कडक कारवाई करा...
आम्ही निर्धार केला, या प्रश्नाची तड लावल्याशिवाय इथून हलणार नाही; पण तरीही
यंत्रणा हलेना.
अर्थात, या काळातही गावातले काही लोक आमच्या बरोबर होते. त्यातलेच एक दिग्विजय
नावाचे वकील. त्यांनी या काळात आम्हाला मार्गदर्शन केलं, मदत केली. आम्ही नुसतीच
या बायकांना मदत करू पाहत होतो; पण नीट माहिती काढून सगळं काम पद्धतशीर कसं
करायचं, ते त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्ही हे प्रयत्न करूनही काही उपयोग होत
नाही हे पाहिल्यावर बोहाटोलामधल्या बायकांनीच मग दोन दिवस उपोषण केलं. यंत्रणा
हलली आणि आम्हाला बायकांना नेण्याची परवानगी मिळाली. आम्ही त्यांना गावात घेऊन
आलो. आता या बायका बोहाटोलामधल्या मशिदीत राहतात. त्यांना कपडे नाहीत, जेवण नाही..
कुणी शिजवून देईल तेव्हाच... त्या रोज वस्तीत जातात, आपलं जळालेलं सामान उपसतात,
त्यात काही हाती लागतं का बघतात...
सरकार म्हणतं, तुम्ही हा व्यवसाय सोडा, आम्ही तुमचं पुनर्वसन करू; पण असं किती
बायकांचं सरकार पुनर्वसन करणार? ते जमलं नाही तर आहे तीच परिस्थिती पुन्हा
येणार... एकीकडे गावकऱांचं टुमणं चालूच आहे... आम्ही इथं वेश्याव्यवसाय चालू
देणार नाही... ही सीतामैयाची भूमी आहे...
असेलही ही सीतामैयाची भूमी. लोकांची तशी श्रद्धा आहे, आम्ही तिचा आदर करतो. ज्या
गावकऱ्यांना आम्हाला हुसकून लावायचं आहे, त्यांना आमचं एवढंच सांगणं आहे, आम्हीही
तुमच्याच समाजाचा एक भाग आहोत. तुमच्यातलेच लोक आमच्याकडे येतात. आता तुम्ही हा
व्यवसाय बंद केला, तर तो लपूनछपून चालू राहील आणि ते अधिक धोकादायक आहे.
वेश्या स्वत: तर या सगळ्या प्रकारानं घाबरल्या आहेतच; पण त्यांच्या लहान लहान
मुलीही घाबरल्या आहेत. इथं अल्पवयीन मुली धंदा करतात, म्हणून सगळ्या अल्पवयीन
मुलींना निरीक्षणगृहात पाठवू, असं सरकार म्हणत होतं; पण इथं वेश्यांच्या मुलीही
आहेत. त्यांना आपल्या कुटुंबात राहण्याचा अधिकार नाही का?
अनेक प्रश्न आहेत. सगळ्यांचीच उत्तरं सहज आणि लगेच मिळणार नाहीत... आम्हालाही
त्याची कल्पना आहे. तोपर्यंत फक्त एकच सांगणं आहे, आम्हीही माणूस आहोत, आम्हाला
माणसासारखंच वागवा!!
-----------------------------------------------------------
आम्ही परवाना नाही दिलेला
आम्ही सेक्स वर्कर्स आहोत, हे खरं आहे. पैशासाठी आम्ही आमचं शरीर विकतो; पण
म्हणून वाटेल त्यानं आमच्या शरीराचं वाटेल ते करण्याचा परवाना आम्ही दिलेला नाही.
बोहाटोलामध्ये एक महिलेवर आठ जणांनी बलात्कार केला. ती बाई आज वेडी होऊन इथं तिथं
फिरत आहे.
-----------------------------------------------------------
(शब्दांकन - वैशाली रोडे) |
|