देशाला फसविणारे सरकार पडायलाच हवे - कारत यांचे मत .मंगेश वैशंपायन - सकाळ न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, ता. ११ - ""अणुकराराच्या मुद्द्यावर देशाला फसविणारे मनमोहनसिंग सरकार
पडायलाच हवे; मात्र निवडणुकीनंतर देशात जातीयवादी शक्ती सत्तेवर येता कामा नयेत,''
असे मत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश कारत यांनी व्यक्त केले.
कारत यांनी पक्षाच्या मुखपत्राच्या आगामी अंकाला दिलेल्या खास मुलाखतीत वरील
भूमिका मांडली आहे. ही मुलाखत येत्या सोमवारी (ता. १४) प्रसिद्ध होणार आहे. ती आज
"सकाळ'साठी उपलब्ध झाली.
कारत यांनी अणुकराराचे तोटे, मनमोहनसिंग यांचे वर्तन, यावरून सरकारचा पाठिंबा मागे
घेणे, त्यामुळे सरकार अल्पमतात येणे, या मुद्द्यावरून डाव्यांमधील कथित मतभेद,
निवडणुकीनंतर डाव्यांच्या लोकसभेतील संख्याबळात घट होण्याची चिन्हे या सर्व
प्रश्नांना विस्ताराने उत्तरे दिली.
सरकारचा पाठिंबा डाव्यांनी आताच काढून का घेतला, या प्रश्नावर कारत यांनी म्हटले
आहे, की चार वर्षांपूर्वी जेव्हा डाव्या पक्षांनी यूपीएला पाठिंबा दिला तेव्हाही
जातीयवादी शक्ती सत्तेवर येऊ नयेत, हाच मुख्य हेतू होता; मात्र अणुकराराच्या
मुद्द्यावर पंतप्रधानांनी डाव्यांना दिलेले आश्वासन न पाळता, आपल्याच
परराष्ट्रमंत्र्यांनाही तोंडघशी पाडून मागच्या दाराने परस्पर पुढे जाण्याचा उद्योग
करून डाव्यांचीही अडचण केली. त्यामुळे पाठिंबा मागे घेण्यावाचून पर्यायच राहिला
नाही. अणुकरारच नव्हे, तर सरकारच्या अमेरिकेबरोबरच्या धोरणात्मक भागीदारीलाही
डाव्यांचा विरोध आहे.
पाठिंबा काढण्याचे दुसरे कारण म्हणजे महागाईला लगाम घालण्यात हे सरकार पूर्ण अपयशी
ठरले आहे, असे सांगून कारत म्हणतात, की जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या
किमती भडकण्याची चिन्हे दिसत होती तेव्हा सरकार गाफील राहिले. मग महागाईने तडाखा
दिला. अणुकरारासाठी उतावीळ झालेल्या या सरकारला गरिबांना रेशनवर धान्य मिळत नाही,
याची काडीची पर्वा नाही. रिलायन्ससारख्या नफेखोर उद्योगांवर "नफा कर' लावण्यास हे
सरकार कचरते. यातच त्याचे "चारित्र्य' दिसते, मग पाठिंबा काढून घ्यायचा नाही तर
काय, असा सवाल कारत यांनी केला.
अणुकरारावरून डावे पक्ष एकाकी पडल्याने त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता
त्यांनी फेटाळून लावली. "आज भाजपही डाव्यांचे मुद्दे वापरून कराराला विरोध करीत
आहे,' याकडे कारत यांनी लक्ष वेधले. महागाईचा मुद्दाही आम्ही विसरलो नाही. तिसऱ्या
आघाडीची निर्मिती लवकरच होईल. ही आघाडी लोकांना पर्याय देईल, असेही त्यांनी स्पष्ट
केले. |