Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

डोकेदुखी
डॉ. ह. वि. सरदेसाई
Friday, March 04, 2011 AT 12:00 AM (IST)
काहींच्या बाबतीत डोके दुखणे हे एखाद्या प्रकारचे लक्षण असू शकते. क्वचित गंभीर आजाराचेदेखील लक्षण असते. जेव्हा डोके दुखण्याच्या जोडीला शरीरास इतरत्रदेखील त्रास होत असतात तेव्हा असे डोके दुखणे शरीरातील गंभीर आजाराचे लक्षण असण्याची शक्‍यता जास्त असते. असे आजार आहेत किंवा कसे, हे प्रथम पाहणे इष्ट असते.

डोके दुखण्याचा अनुभव नसणारी व्यक्ती विरळाच असेल. काहींचे डोके क्वचित दुखते, काहींना त्याचा फारसा त्रास होत नाही, काहींच्या बाबतीत डोके दुखणे हे एखाद्या प्रकारचे लक्षण असू शकते. क्वचित गंभीर आजाराचेदेखील लक्षण असते. जेव्हा डोके दुखण्याच्या जोडीला शरीरास इतरत्रदेखील त्रास होत असतात तेव्हा असे डोके दुखणे शरीरातील गंभीर आजाराचे लक्षण असण्याची शक्‍यता जास्त असते. असे आजार आहेत किंवा कसे, हे प्रथम पाहणे इष्ट असते. या विकारांकडे तातडीने लक्ष देणे जरुरीचे असते. आपल्या मस्तकाच्या बाह्य भागात हाडांची कवटी असते. कवटीला क्रोमियम म्हणतात. कवटीमध्ये मुख्यत्वे मेंदू असतो; शिवाय रक्तवाहिन्या असतात. मेंदूवर अभ्रे असतात आणि आत पाणी असते (सेटेब्रो-स्पायनल फ्लुइड). या पेशींचे व पाण्याचा दाब कवटीच्या आत असतो (इंट्राक्रेनियल प्रेशर). हा दाब प्रमाणाबाहेर वाढणे ही घटना धोक्‍याची असते. रुग्णाचे डोके दुखते. वाचणे किंवा लिहिण्यात दोष येतात. हातापायांच्या हालचाली नीट होत नाहीत. बहुतेक वेळा संपूर्ण मस्तक दुखते. झोपेतून जागे होताना दुखण्याची तीव्रता वाढते. उभे राहिल्यास दुखण्यात थोडाफार उतार पडतो. खोकताना, शिंक आल्यास, कुंथताना किंवा पुढे वाकून उभे राहिल्यास डोके जास्त दुखते. बहुतेकांना उलटीचा त्रास होतो. अशी उलटी सकाळी येण्याची शक्‍यता जास्त असते. डोके दुखण्याचा त्रास वाढू लागतो.

कवटीच्या आतील पाणी वाढल्यास किंवा मेंदूत गाठ झाल्यास असा दाब वाढू लागतो. मेंदूला इजा झाल्यास अथवा मेंदूला प्राणवायूचा पुरवठा खुंटल्यास मेंदूच्या पेशी सुजतात. या सुजेमुळेदेखील पेशींचा आकार वाढून कवटीच्या आत दाब वाढतो. पाण्याचा दाब चटकन वाढू शकतो. काही काळातच गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. मेंदूतील गाठीची वाढ सहसा संथ गतीने होते, त्यामुळे गाठीने झालेला डोके दुखण्याचा त्रास कित्येक दिवस, आठवडे किंवा काही महिने वाढत जातो. कवटीच्या आत दाब वाढलेला असला तर त्याचा उपाय कारणावर अवलंबून असतो. मेंदूत गाठ झाली असावी, अशी शंका आल्यास त्या दृष्टीने पुढील तपास करून शस्त्रक्रिया करणे योग्य ठरते. पाण्याचा दाब वाढला असला तर पाण्याचा निचरा करावा लागतो. असा निचरा करण्याकरिता मेंदूतून पाणी शरीरात दुसरीकडे सोडण्याकरता एक नलिका बसवतात. या नलिकेला "शंट' म्हणतात. काही औषधांच्या वापराने मेंदूची सूज उतरवता येते.

कवटीमधील दाब अकस्मात वाढण्याचे एक कारण म्हणजे मेंदूच्या अभ्रयात रक्तस्राव होणे, हे होय. याला सब ऍटॅकनॉईड हिमरेज म्हणतात. अकस्मात प्रचंड डोकेदुखी सुरू होते. रुग्णाची मान कडक होते. रुग्ण थोड्याच वेळात बेशुद्ध होतो. मेंदूला झाकणाऱ्या अभ्रयातील रक्तवाहिन्यांतून रक्त झिरपण्याने हा आजार होतो. अशा व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात दाखल करून तपास करणे आवश्‍यक असते. ज्या रक्तवाहिनीतून रक्त वाहत असेल त्या रक्तवाहिनीवर शस्त्रक्रिया करून अथवा तेथे "स्टेंट' घालून प्राण वाचू शकतो. याच प्रकारचे आत्यंतिक डोके दुखण्याचे गंभीर कारण म्हणजे मेंदूच्या अभ्रयावर जिवाणूंमुळे आलेली सूज- मेनिंजायटिस. काही तासांत डोकेदुखी असह्य होऊ लागते. रुग्णाला ताप येतो. मान कडक होते, उजेड सहन होत नाही, आवाज नको वाटतो. कधी कधी अंगावर पुरळ उठल्यासारखे लाल चट्टे येतात. काही जिवाणू आणि काही विषाणूंमुळे असा आजार होऊ शकतो.

हे आजार गंभीर असतात. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार करणे आवश्‍यक असते. मेंदूला जाणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या दाहामुळेसुद्धा डोके दुखते. याला "टेंपोटल आर्टरायटिस' म्हणतात. डोळ्यांना रक्त नेणाऱ्या रक्तवाहिनीला सूज आली तर नजर जाते. साधारण एका आठवड्यामध्ये डोके दुखणे वाढत जाते. सध्या डोळ्याची एक बाजू उजवी अगर डावी दुखते, परंतु कधी कधी संपूर्ण डोकेही दुखते. हा आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक प्रमाणात होताना आढळतो. सुरवातीला जबड्याच्या स्नायूंमध्ये वेदना जागवते. अन्न चावताना जबडा दुखतो. पंचवीस टक्के रुग्णांना शरीरातील इतर भागात सांधे व स्नायू दुखतात. रक्ताच्या तपासणीत शंका येऊ शकते; परंतु निश्‍चित निदान करण्यासाठी कवटीच्या बाहेरच्या बाजूच्या त्वचेतील रक्तवाहिन्यांचा एक लहान तुकडा काढून तपासावा लागतो. कॉर्टिकोस्टेरॉइड्‌स आणि इम्युनोसप्रेसंट्स या प्रकारच्या औषधांच्या वापराने आजार ताब्यात आणता येतो. या औषधांना बरेच नको वाटणारे दुष्परिणाम असतात. औषधांची चांगली माहिती असणारे तज्ज्ञ व अनुभवी डॉक्‍टर्स यांच्या नजरेखाली रुग्णालयात हे उपचार करणे इष्ट असते.

प्रत्येक वेळी डोके दुखणे हा गंभीर आजार नसतो, किंबहुना बहुतेक वेळा त्याचा त्रास जरी खूप झाला तरी अपाय फारसा होत नसतो. डोके दुखण्याचे सर्वांत जास्त वेळा असणारे कारण म्हणजे आपल्या कवटीच्या बाहेरच्या बाजूच्या स्नायूंचे सातत्याने होत राहणारे आकुंचन होणे, हे होय. असे आकुंचन होत राहिले की स्नायूंमधील पेशी ताणल्या जाऊ लागतात. त्यामुळे डोक्‍याच्या बाजूने घट्ट दाब आल्यासारखे डोके दुखते. या स्नायूंमधील तणावामुळे अशा प्रकारच्या डोकेदुखीला "तणाव' डोकेदुखी म्हणतात. दुखण्याची भावना दीर्घ काळ चालू राहते.

दुखण्याच्या भागावर दाब दिला तर दुखणे थोडे वाढते. सहसा मळमळ किंवा उलटी होत नाही. प्रकाश सहन होतो. संपूर्ण माथा दुखतो. मानसिक तणाव, आवाज, नाक-घशातून जाणारे धूर, डोळ्यांना ताण किंवा शरीरात पाणी कमी पडण्याने असे तणाव दुखणे होते. अशा डोकेदुखीपासून कोणताही धोका संभवत नाही. डोकेदुखीचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे कवटीच्या बाहेरच्या बाजूच्या रक्तवाहिन्यांचे अतिरेकी स्पंदन होणे, हे होय. या प्रकाराला रक्तवाहिन्यांचे दुखणे म्हणतात. यात नेहमी आढळणारा प्रकार म्हणजे "मायग्रेन' प्रकारची डोकेदुखी. रक्तवाहिन्यांच्या (रोहिणीच्या) स्पंदनाबरोबर ठोके पडण्यासारखे डोके दुखते. सहसा डोक्‍याचा पुढचा किंवा बाजूचा भाग दुखतो. रुग्णाला मळमळते, उलटी होते, कधी डोळ्यांसमोर काजवे चमकतात, हातापायांवर मुंग्या आल्याची भावना होते. अनेक रुग्णांच्या घरात असे डोके दुखणाऱ्या इतर व्यक्ती असतात. मानसिक तणाव आणि आहारातील काही घटक यामुळे या प्रकारची डोकेदुखी येते. चॉकलेट, शेंगदाणे, कॉफी, पुरण असे पदार्थ डोकेदुखीला जबाबदार ठरू शकतात.

प्रकाश सहन होत नसल्याने अंधाऱ्या खोलीत पडून राहणे पसंत केले जाते. नाकाच्या बाजूने कवटीत पोकळ्या असतात, त्यांना सायनस म्हणतात. सर्दीसारखे आजार या सायनसांमध्ये होतात, त्यानेही डोके दुखते. सर्दीबरोबर ताप येणे, डोके दुखणे व नाकाच्या बाजूच्या भागांवर दाब दिल्यास दुखणे, ही लक्षणे सायनसच्या आजारांची असतात. ऐकणे, वाफारा घेणे, काही वेळा प्रतिजैविकांचा वापर, यांनी हे आजार बरे होतात. क्वचित शस्त्रक्रिया लागते.

क्‍लस्टर हेडेक हा डोकेदुखीचा तापदायक प्रकार असतो. हा प्रकार पुरुषांत जास्त प्रमाणात आढळतो. वयाच्या तिसाव्या वर्षी सुरू होतो. बहुतेकांचा पाच-एक वर्षांत जातोही. धूम्रपान किंवा मद्यपान करण्याने त्रास वाढतो. एका डोळ्याभोवती आत्यंतिक वेदना होणे, हे प्रमुख लक्षण असते. डोळे पाणवतात. नाक चोंदते. उलटी होते. दिवसाच्या विशिष्ट वेळी रोज डोके दुखते. रात्री झोपेत डोके दुखण्याने जाग येणे संभवते. 15 मिनिटांपासून तीन तासांपर्यंत वेदना चालू राहतात. काही दिवस किंवा आठवडे त्रास झाल्यावर कित्येक महिने त्रास होत नाही. या आजाराला तज्ज्ञ न्यूरॉलॉजिस्ट यांच्या नजरेखाली उपाय करणे इष्ट होय.

डॉ. ह. वि. सरदेसाई
प्रतिक्रिया
On 02/12/2011 11:11 AM vidya said:
दोन दिवसापासून माझे डोके उजव्या बाजूस कानाच्या दोन इंच मागे दुखत आहे आणि माझ्या उजव्या डोळ्यात सारखी घाण येत आहे. कृपया याचे कारण आणि त्यावर उपाय सांगा. (वय ३५-) धन्यवाद,
On 03/11/2011 01:57 AM JAGDISH said:
मी जगदीश माझे वय २६ वर्ष आहे .सकाळी झोपेतून उठल्या वर ताजे तवाने वाटत नाही .आणि डोके खूप दुखते .त्यामुळे काही सुचत नाही .मला घरातून सांगत आहेत कि पित्त मुळे डोके दुखते .मी मिठाच्या गुळण्या करतो . पण मात्र डोके दुखायचे थांबत नाही .कृपया काहीतरी उपाय सांगा .मी काय करू.
On 21/10/2011 05:00 PM suraj kale said:
मला रोज डोके दुखी होते कृपया मला उपाय सुचवा
On 25/04/2011 06:53 PM manali halde said:
माझ्या आईला कायम डोकेदुखीचा त्रास आहे सर्वप्रकारचे इलाज, कीठीस्कॅन ,क्ष-रे वगैरे झाले तरीही काही फायदा नाही कृपया यावर पर्याय सुचवा.
On 26/03/2011 10:27 AM Ganesh Bombatkar said:
मी कधी उद्विग्न्स झालो किंवा माझ्या मनासारखे काही झाले नाही किंवा कुठल्या गोष्टीचा तणाव आला कि माझे डोके दुखते उलटी,मलमल काही होत नाही कृपया उपाय सांगा.
On 14/03/2011 02:34 PM Vidyul said:
मला डोकेदुखीचा त्रास नेहमी होतो. त्याचबरोबर माझी मानही दुखते. कृपया यावर काही उपाय सांगावा.
On 09/03/2011 01:53 PM nitin gade said:
डोकेदुखी हा प्रोब्लेम दररोज होतो उपाय सांगा
On 09/03/2011 01:25 PM shridhar hari nalawade said:
maaze डोके kadhi तरी खूप दुखत असते mahinyatna तीनदा चारदा काही upaay असेल तर सागा ते पण रात्री झोपताना
On 09/03/2011 08:34 AM pu said:
मला सुद्धा अर्धशीशीचा त्रास होता. बरेच वेगळे वेगळे उपचार केले, परंतु आराम पडला नाही. एका सदगृह्स्ताने मला पुण्यातील हर्बल औषध देणाऱ्या मक्तेवाल्याचे औषध घ्यायला सुचविले. त्या नंतर मला पूर्ण आराम पडला आहे. फडके हौद रस्ता, पोस्ट ऑफिस जवळ हे ठिकाण आहे. नाव लक्षात नाही त्या बद्दल क्षमस्व!
On 08/03/2011 02:29 PM mk said:
Stress Headache हि पण एक प्रकारची डोकेदुखी आहे. डोक्याचा मागचा भाग, मान ई. दुखते.
On 08/03/2011 02:18 PM kiran nehulkar said:
माल काही दिवसांपूर्वी मेंदू मध्ये छोटीसी गाठ झाली होती लगेच हॉस्पिटल मध्ये जावून डॉक्टरांना दाखवल्यामुळे उपाय सुरु झाले आता मला बरे वाटते . पुढे मी काय काळजी घेऊ. सेम ते अनिल सारखे.
On 08/03/2011 11:14 AM sangram said:
दिवसभर ऑफिस मधल्या एसी मध्ये बसल्यामुळे डोके खूप जड होते आणि रात्री घरी आल्यावर डोके खूप दुखते .. याच्यावर कोणीतरी उपचार सांगाल का ?
On 08/03/2011 09:57 AM ANIL PANDIT said:
माल काही दिवसांपूर्वी मेंदू मध्ये छोटीसी गाठ झाली होती लगेच हॉस्पिटल मध्ये जावून डॉक्टरांना दाखवल्यामुळे उपाय सुरु झाले आता मला बरे वाटते . पुढे मी काय काळजी घेऊ.
On 07/03/2011 12:36 PM sunanda said:
माझ वय ४३ आहे majhe अर्धे doke दुखते काही उपाय सांगा
On 06/03/2011 10:49 AM samadhan tandel said:
कामावरून घरी आल्यावर व बाहेरून काम करून आल्यावर संध्याकाळी अचानक कोणत्याही उजव्या किवा डाव्या बाजूचे डोके जड होते व दुखते. एक तास झोपल्यावर नंतर आराम मिळतो. कृपया ह्यावर एखादा घरगुती उपाय सुचवा.
On 05/03/2011 12:18 PM PRASHANT VANMALI said:
मला अर्धशिशीचा खूप त्रास होतो सकाळी उझ्व्या डोक्या ची शीर दुखायला लागतय आणि संध्याकाळी बारा तासांनी कमी होतयं माझा सर्व उपचार करून झाले आहेत तरी मला चागला आयुर्वेदिक उपाय सुचवा माझेय वय सविस वर्ष आहेय .
On 04/03/2011 06:00 PM ravi said:
माझ्या आई ला बर्याच वर्षापासून डोके दुखीचा त्रास आहे. अर्ध्ये डोकं दुखत. कृपया उपचारासाठी एखाद्या चांगल्या डॉक्टर चा पत्ता सुचवाल का?
On 04/03/2011 09:16 AM ani said:
सायनस मध्ये टाळू दुखते का? मला सर्दी झाली कि माझी टाळू खूप दुखते. दमाचा थोडासा त्रास आहे . उपाय सांगा. वय ४२ आहे. और्वेदिक औषधांची सवय आहे.डॉक्टरांनी आजार काही सांगितला नाहीये.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: