Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

टक...टक... (सचिन कुंडलकर)
सचिन कुंडलकर (kundalkar@gmail.com)
Sunday, June 26, 2011 AT 09:33 AM (IST)

टक..टक...
"कोण आहे?'
"जरा दार उघडता का? आम्ही एक चित्रपट बनवत आहोत...'
"मग मी काय त्यात शिरून नाचू ?'
"नाही, तसं नाही. आम्हाला एका जुन्या वाड्यात शूटिंग करायचंय. तुमचा वाडा मी शनिवार पेठेत माझ्या मामांकडे येताना नेहमी पाहतो; म्हणून आज जरा आतून पाहावा, यासाठी आलो.'
"मग तुमच्या मामांच्या घरीच शूटिंग का नाही करत?'
"मामांचा वाडा पडला. ते बिल्डिंगमध्ये राहतात.'
"कसली साली दुपारची झोपमोड. हां, बोला कसले शूटिंग आहे? आंत येता येणार नाही. काय जो वाडा पाहायचाय तो आहे तो उंबऱ्यात उभे राहून पाहा.'
"अहो, पण...'
"तुम्ही इथे बाया आणून नाचावाव्यात म्हणून मी इथे जुन्या लाकडांना तेल-पाणी करत आणि गळकी कौले शाकारत बसलेलो नाही. आमच्या वाड्यात पेशवेकालीन विहीर आहे. शिवाय वाड्यातून दोन भुयारे जातात. एक जाते पर्वतीवार आणि दुसरे निघते थेट कोकणात. आमचा वाडा होता म्हणून वाचलात नाही तर बलुचिस्तानातील गुलामांच्या बाजारात विकले गेले असते तुमचे पूर्वज. रमाबाई यायच्या इथे प्राजक्ताची फुले गोळा करायला. हं, आत या. कसले शूटिंग आहे? कोणती serial ?
"सीरिअल नाही; चित्रपट आहे. सिनेमा...सिनेमा. आम्हाला भिंतीत कोनाडे असलेली जुनी घरे हवी आहेत.'

"काय हो ? मला एक सांगा, तुम्ही काही सूर्यनमस्कार वगैरे घालता की नाही ? काय नाव तुमचे ?
"कुंडलकर'
"केवढे ते पोट सुटले आहे. हां. आत या. पाहा काय कोनाडे पाहायचे आहेत ते. कधी आहे शूटिंग?'
"ऑक्‍टोबरमध्ये'
"पुण्यातच का करायचं?'
"कारण कथा पुण्यात घडते.'
"अहो ते काय मला सांगता? तुम्ही सिनेमावाले चोर असता. दिल्लीत शूटिंग करून, पुणे आहे असे सांगितलेत तरी आमच्या बायका शेपटे उडवत जातील तुमचा सिनेमा पाहायला. व्यसनी, चोर आणि फसवी जात.'
"अं?'
"सिनेमावाल्यांची. मी आजपर्यंत एकही चित्रपट पाहिलेला नाही. अगदी "संत तुकाराम'सुद्धा नाही.' "पाहिलेत कोनाडे? या आता.'
"अहो, पण ?

"कोण काम करतंय?'
"र'
"काय सांगताय काय? या नं या. बसा. कार्तिकेय सकाळी आठला एकदा offficebm गेला की, एकदम रात्री आठला येतो. माझा नवरा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या शूटिंग.'
"अहो, तसं नाही हो. पूर्ण चार दिवस लागतील आम्हाला. खूप मोठा लवाजमा असतो.'
"बरं मी बघते. कार्तिकेय वीक वरूी ना जरा restless असतो. वीक ends ना तो romantic  होतो.' प्रोजेक्‍ट ारपरसशी आहे ना तो. आणि सध्या हिंजवडीला traffic असते. मी बोलते त्याच्याशी. त्याला सलील-संदीपच्या कार्यक्रमाला नेते. तिथे बोलते; पण तुम्ही काही काळजी करू नका.'
"Thanks'
"a आणि A चा break up   झालाय की .. म्हणजे ?'
"मला माहीत नाही'
"मला पण "माई भिडे' मिळालाय...'
"माई भिडे ? कोण ?'
" "पुरुषोत्तम' कारायच्ची ना मी. मी "वाडा', "यकृत', "मादी' सगळं केलाय...'
" "वाडा,' "यकृत,' "मादी' ?'
"हो आणि दुबेजींची दोन वर्कशॉप्सपण केली आहेत; पण मग कार्तिकेय म्हणाला मुंबईला जाऊन कशाला दगदग करतेस, म्हणून मग पुढं काही नाही केलं. मी पालेकरांच्या "पाऊलखुणा'तपण होते. चंपूची मैत्रीण'
"Amoh great '
"a  आणि तुम्ही ? म्हणजे तुम्ही भेटलायात तिला ?'
"हो'
"wow '
"तो समोरच्या भिंतीवरचा  wall paper   काढून शूटिंगनंतर लावला तर चालेल ?'
"हो हो.. काहीच प्रॉब्लेम नाही. काय अजून तयारी करायचीये शूटिंगची ते तुम्ही मला सांगून ठेवा. आमच्या गल्लीत गणेशोत्सवाची तयारी सगळी मीच करते.'
"नाही, तयारी करणारे वेगळे लोक असतात. तुम्ही घरात फार काही मौल्यवान गोष्टी ठेवू नका. आम्ही तुमची हॉटेलमध्ये राहण्याची सोय करू.'
"माझा अजूनही विश्‍वास बसत नाहीए र येणार या गोष्टीवर. तिचं घर असणार आहे का हे?'
"अं नाही, तिच्या मैत्रिणीचं'
"पण मग र तिच्या मैत्रिणीकडं येते की नाही ?'
"अं ? म्हणजे अजून ते ठरतंय'
"मैत्रिणीचं काम कोण करतंय?'

"इथं तुमच्या अंगणात शूटिंग करायचं होतं. ते चाफ्याचं मोठं झाड आहे तिथं.'
"स्टोरी काय आहे?'
"अं ? म्हणजे एक पुण्यातली मुलगी असते. महाविद्यालयात शिकत असते.'
"हं, म्हणजे शैक्षणिक चित्रपट आहे.'
"हो. तसं म्हणता येईल. ती एका मुलाबरोबर घर सोडून पळून जाते; पण मग काही दिवसांत तिला त्या मुलामधले दुर्गुण दिसू लागतात आणि ती त्याला सोडून परत आई-वडिलांकडं येते'
"अरेच्चा, म्हणजे स्त्रीवादी चित्रपट आहे तर. वा, वा ! स्त्रीवादाला आपला पाठिंबा आहे. छान छान.
"हो, तसे म्हणता येईल. आम्हाला दोन दिवस इथे तुमच्या चाफ्याच्या झाडाजवळ शूटिंग करता येयील का?'
"चित्रपटाचा संदेश काय आहे? message ?
"तसा काही message नाही'
"असं कसं? final scene  ध्ये तुम्ही प्रेक्षकांना काय सांगणार?'
"अं? कुणी कुणाशी भांडू नये. पळून जाऊन लग्न करण्यापेक्षा आई-वडिलांना विचारून लग्न करावे.'
"वा, वा... बेस, बेस. कराच तुम्ही हा चित्रपट. आमचे तुम्हाला सहकार्य आहे. फुले तोडली जात नाहीत ना आमच्या चाफ्याची, तेवढे पाहा. आमचं झाड आता म्हातारं झालं हो. त्याची काळजी घ्या.. तुमच्यामुळे शूटिंग पाहायला मिळणार आमच्या झाडाला.'

"ठीक आहे. तुम्ही मला दोन दिवस आधी कळवा. मग शूटिंगला या. मी पुरणपोळ्यांच्या  order घेते. मला माझे सामान दुसरीकडं हलवावं लागेल.'
"त्याची काळजी तुम्ही करू नका आज्जी. आम्ही सामान हलवायला आदल्या दिवशी येऊ. तुम्ही एकही प्रश्‍न ना विचारता एवढ्या विश्‍वासानं जागा देताय.'
"चांगला चित्रपट काढा. आमचे हे चित्रपटांचे फार वेडे होते. तुम्ही खूप कामात असाल. माझं सामान मी घेऊन जाईन आणि तुमचं सर्व झालं की मी माझी माझी परत येईन. माझे आशीर्वाद आहेत. यशस्वी व्हा. तुम्हाला आम्ही मदत नाही केली तर चागले चित्रपट कसे बघायला मिळणार आम्हाला? थांबा चहा घेऊन जा...'

"कुंडलकर ना रे तू? 10वी अ ? 1992ना ? दाढी कशाला रे वाढवता? वाईट दिसतेय तुला.'
"तुम्ही कशी काय एवढ्या मुलांची नावं लक्षात ठेवता?'
"काय करणार? न पुसता येणाऱ्या दिव्य स्मृती तुम्ही कार्टी मागे ठेवून जाता. कशी विसरणार नावं ? बोल, काय काम काढलंस ? शाळेची बरी आठवण झाली आज ? तो "वळू'वाला कुलकर्णी तुझ्याच वर्गातला ना रे ? तू का नाही त्याच्यासारखा जरा विनोदी सिनेमा काढत? काय बाई आम्ही restaurant पाहिला. काही कळलाच नाही मला. जोशीबाईंना कळला; पण जोशीचे काही खरे नाही . तू आता एक विनोदी सिनेमा काढ . लग्न वगरै झालं की नाही तुझं ?
"बाई, मी एक विनोदी चित्रपटच बनवतोय.
"वा वा. नशीब. पुढं बोल'
"बाई, मला आपल्या शाळेच्या गच्चीत शूटिंग करायचं होतं. चालेल का? मला प्रशस्त अशी दगडी भिंतीची गच्ची हवी आहे.' रात्रीचं शूटिंग आहे. दोन रात्री शूटिंग करायची परवानगी मिळेल का ?'
"मिळेल की. एक गणित घालते. ते सोडवून दाखव; मग देते परवानगी. गणितातले नववीतले मार्क आठवतायत का ? हा हा हा'

"बोला काय काम आहे ?'
"आम्हाला तुमचे घर शूटिंगसाठी हवं होतं.
"मिळणार नाही. पुढं बोला.'
"अं? अं?'

"हीरो कोण आहे?'
"चं'
"मग तर आम्ही अजिबातच घर देणार नाही.'
"अहो पण का? आताच तर तुम्ही म्हणालात शूटिंग करा.'
"चं आहे म्हणून देणार नाही . अहो, तो काय माणूस आहे की नराधम ? "अवघाचि संसार'मध्ये तो बायकोशी इतका वाईट वागतो. दारात उभा राहून तहानेने मेला तरी भांडंभर पाणी द्यायची नाही मी त्याला.'
"अहो, पण ती सीरिअल आहे. हा सिनेमा आहे. ते वेगळं हे वेगळं.'
"सीरिअल असेल नाहीतर सिनेमा पाहायला आम्हाला लागते. रडायला आम्हाला येतं. सहन आम्ही करतो. इतका दुष्ट माणूस आहे तो. आम्ही बायका सहन करतो म्हणून आमच्याशी इतकं वाईट वागायचं? नाही. तुम्ही त्या चं ला बदला. मग आमच्याच बंगल्यात काय सगळ्या प्रभात रोडवर शूटिंगची मोकळीक देते मी तुम्हाला.'

"काय काम आहे बाळा?'
"काका आम्हाला एका चित्रपटाचं शूटिंग करायचं होतं. तुमच्या घराला बाहेरून तारेचं कुंपण आहे. तसंच घर आणि अंगण आम्हाला हवं होतं.'
"हो का ? वा, वा. शूटिंगची परवानगी तू आमच्या मुलाकडे माग. आता तोच सगळं ठरवतो. काय रे, मला एक सांग, तो जब्बार पटेल भेटतो का रे तुला?'
"हो भेटतात की. गेल्या महिन्यात सोमाली बेटांवर एका चित्रपट महोत्सवात ते भेटले. त्याच्या आधी मॉस्कोत भेटले होते. त्या आधी मला वाटतं भूतानमध्ये. ते भेटले की फार मौज वाटते आम्हाला.'
"अच्छा, अच्छा मौज येते काय? वा, वा. बरं, तू काय कर, तो भेटला की, तू त्याला एकदा जरा आमच्या घरी घेऊन ये. माझे नाव ना सांगता तसंच आण.'
मंग पुढचे मी बघतो .
"चालेल. मी विचारतो पटेलांना. काय काम आहे तुमचं त्यांच्याकडं? "अरे, तुला नाही कळणार. जुने हिशेब आहेत. काय आहे "उंबरठा'चं शूटिंग त्यानं आमच्या गच्चीत केले होतं. तेव्हाचे काही बोलाचालीचं राहून गेलं आहे. तू त्याला घेऊन तर ये. आधी मी जब्बारशी सामना करतो. मंग तुझ्या शूटिंगचं बघू .

"ते "सकाळ' मध्ये घाणेरडे लेख लिहितात ते कुंडलकर ?'
"तो माझा सावत्रभाऊ'
"असं का?'
"तो फार आगाऊ आणि मूर्ख आहे.'
"अगदी. कसं बोललात? घ्या चहा घ्या. आता शूटिंगचा विषय काढलात म्हणून सांगतो. आमच्या घरात तुम्ही जरूर शूटिंग करा. त्याचं काही नाही; पण आमचे एक काका आहेत 72 वय आहे त्यांचं. त्यांच्यात गजाननमहाराजांचा अंश आहे. दर भाद्रपदात सबंध महिना महाराज त्यांच्या अंगी वास करून असतात . त्यांचं तेवढे एक शूटिंग करून आम्हाला द्या.'

"आजी, घरात कुणी आहे का?'
"घरात मी आहे मेल्यांनो. "Salesman ना प्रवेश नाही,' ही पाटी वाचता येत नाही का? जाता की कुत्री सोडू अंगावर?'

"आम्हाला तुमच्या सायकलच्या दुकानात एक shot घ्यायचाय'
"मराठी चित्रपट आहे की हिंदी?'
"का?'
"विचारतो ते सांगा.'
"हिंदी. पण मी मराठी आहे.'
"मंग चित्रपट हिंदी का आहे?'
"आपली माणसं हिंदी बनवायला लागल्यावर मंग आपल्या मातृभाषेचे पांग कोण फेडेल?'
"मी तीन वेळा फेडले आहेत पांग.'
"हो का?'

टक टक टक टक टक टक ...!

'फेसबुक'वरील सप्तरंगच्या पेजला भेट देण्यासाठी इथे क्‍लिक करा.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 03/07/2011 03:34 PM sidhesh said:
खूपच छान आणि विनोदी
On 02/07/2011 03:51 PM jayshri said:
सूर्यनमस्कार घाला हो ..................
On 02/07/2011 08:47 AM मयूर said:
भारीच!!
On 27/06/2011 07:38 PM asmita said:
मजा आली वाचून. तुम्हाला असे बरेच अनुभव येत असतील .मग फक्त पुण्यातीलच उदाहरणे का दिलीत ?
On 27/06/2011 06:51 PM abhyasu said:
अशक्य आहे लेख. फार हसले.
On 27/06/2011 05:25 PM Sarang said:
हाहा... छान च! गणिताच्या बाईन ना शाळा संपल्यानंतर सुद्धा भेटण्याचं धाडस दाखवलंत ह्यातच अभिनंदन :D आणि "सूर्यनमस्कार घालायला पाहिजेत " ह्या बाबतीत माझे हि दुमत :)
On 27/06/2011 12:03 PM धनुष्का said:
छान विनोदी लेखय....! "सलील-संदीप"अन "जब्बार-सामना" चा पंच जबरदस्त..! पण सूर्यनमस्कार घालायला पाहिजेत याला अनुमोदन ....टक...टक... !


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: