Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

माहिती आयोगाचा आयुक्त "पार्टटाइम'
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 28, 2011 AT 03:00 AM (IST)
नागपूर - राज्याच्या मुख्य आयुक्तांना निवृत्त होऊन चार महिने उलटत आले असतानाही राज्य माहिती आयोगाला अद्याप पूर्णवेळ आयुक्त मिळालेला नाही. पुणे विभागाचे मुख्य आयुक्त विजय कुवळेकर यांच्याकडेच या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. याचाच अर्थ आयोगाला अद्याप "पार्टटाइम' आयुक्‍तांवरच आपले काम भागवावे लागत आहे.

माहितीचा अधिकार कायदा आल्यापासून सरकारची अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आली. या कायद्याच्या जनजागृतीकरिताही शासन उदासीन असल्याचे जाणवते. या कायद्याची अंमलबजावणी करणारा तसेच या कायद्याअंतर्गत येणाऱ्या प्रकरणांवर सुनावणी देणारा आयोग म्हणजेच राज्य माहिती आयोग. या आयोगाला गेल्या चार महिन्यांपासून एक पूर्णवेळ आयुक्तदेखील मिळाला नसल्याने या आयोगाबाबत शासन किती उदासीन आहे, याची प्रचिती येते.
आयोगाचे माजी आयुक्त विलास पाटील यांना निवृत्त होऊन आज चार महिन्यांचा कालावधी होत आला. या पदाची जबाबदारी विजय कुवळेकर यांच्याकडे सोपविण्यात आली. मात्र, पुणे विभागाचा कारभार सांभाळून या पदाची जबाबदारी त्यांना सांभाळावी लागत आहे. त्यामुळे या पदाकरिता ते एकप्रकारे "पार्टटाइम जॉब'च करीत आहेत.

संकेतस्थळ अद्याप अद्ययावत नाही
राज्य माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर माजी आयुक्त विलास पाटील यांचीच माहिती व त्यांचाच संदेश दाखविण्यात येत आहे. माहिती अधिकाराच्या कलम चारअंतर्गत विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती त्यांच्या कार्यालयांचा पत्ता व दूरध्वनी क्रमांकासह देणे बंधनकारक असते. त्यामुळे ही माहिती संकेतस्थळावरील कलम चार या पानावर जाहीर करण्यात आली; मात्र मुख्य पानावरील माहिती अद्याप जुनीच आहे. सर्व शासकीय विभागांनी आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत ठेवावी, याची जबाबदारी या विभागाकडे असते. मात्र, याच विभागाची ही दुर्दशा असल्याने दिव्याखाली अंधार असा हा मामला झाला आहे. याबाबत "सकाळ'ने याआधी एक वृत्तदेखील प्रकाशित केले होते; मात्र तरीही निर्ढावलेल्या प्रशासनाला दखल घ्यावीशी वाटली नाही. एवढेच काय, तर आयोगाचे अतिरिक्त आयुक्त विजय कुवळेकर यांनी याबाबत अनेकवेळा सूचना देऊनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

आयोगाच्या संकेतस्थळावरील मुख्य पानावरील माहिती अद्ययावत करण्याची जबाबदारी केंद्र शासनाची असते; मात्र अनेकदा सूचना देऊनही शासनाने अद्याप ही माहिती अद्ययावत केलेली नाही.
-विजय कुवळेकर, मुख्य माहिती आयुक्त, पुणे विभाग


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: