Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन

गप्पांतून उलगडलं पडद्यामागचं भावविश्‍व
- सकाळ वृत्तसेवा
Sunday, February 05, 2012 AT 12:00 AM (IST)
पुणे - समाजाचं चित्र जसंच्या तसं चित्रपटात मांडता येत असल्याने ते चित्रपटाकडं वळले... कोणाला जीवनातील अनुभवातून मिळालेली प्रेरणा चित्रपटाकडे घेऊन आली, तर कुणी चित्रपट पाहण्याच्या आवडीने चित्रपट बनवायचं ठरवलं... काहींना आपलं जगणं चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेऊ शकतो, असंही वाटलं...!

अनेक दिग्दर्शकांनी त्यांचे कार्यविश्‍व उलगडले, तेव्हा फर्ग्युसन महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना चंदेरी दुनियेची अनोखी सफर घडली. "मुक्तछंद'मधील "फिल्मियाना' कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी "दिग्दर्शकांशी गप्पा' मारल्या. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, सचिन कुंडलकर व उमेश कुलकर्णी यांनी चित्रपटमाध्यमाशी असणारे बंध या निमित्ताने उलगडले. ज्ञानेश झोटी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

भावे म्हणाल्या, ""चित्रपट हे जीवनाच्या अबोध जागा समजून घेण्याचे माध्यम आहे. जीवनाच्या अंतर्मनाच्या पदरांचा चित्रपट बनविताना उपयोग होतो. या नवीन मुलांचे दिग्दर्शनाचे काम पाहून अभिमान वाटतो. त्यांच्यातील प्रगल्भता वाखाणण्याजोगी आहे.''

कुंडलकर म्हणाले, ""दिग्दर्शनाच्या भूमिकेत भावनिक व आर्थिक बंध गुंतलेले असतात. या सगळ्यातून पुढे जात मनातील चित्र तुम्हाला चित्रपटात मांडायचे असते. हे माध्यम फक्त पैसे व तंत्राचे नाही, तर माणुसकी हा त्यातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. चित्रपट ही चित्रांची हलती भाषा आहे. ती संवादाच्या आधारे पुढे सरकवत नेणे अत्यंत अवघड काम आहे. मनातील चित्र व पडद्यावरील चित्र यात खूप फरक असतो. मनातील चित्र जसंच्या तसं पडद्यावर कधीच उतरू शकत नाही. त्यातील अंतर फक्त कमी होत असते.''

सुकथनकर म्हणाले, ""मनोरंजन, कला व आशय या तीनही गोष्टी एकाच चित्रपटातून मांडण्याची गरज आहे. दिग्दर्शन करताना कलाकारांकडून हवे ते काढून घेताना अभिनयाची मजा अनुभवता येते.''

कुलकर्णी म्हणाले, ""आवडणाऱ्या सर्व गोष्टी करून पाहायच्या असं सुरवातीला चालू होतं; परंतु पुढे जाऊन चित्रपट बनवण्याचा कधी विचार केला नव्हता. पहिला चित्रपट बनविताना अनेक निर्मात्यांनी निराश केले. त्यामुळे स्वतः चित्रपट बनवायचे ठरवले.''


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: