Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
 
 

आउट ऑफ बॉक्‍स (फास्ट ट्रॅक)
महेश बर्दापूरकर mahesh.bardapurkar@esakal.com
Sunday, March 04, 2012 AT 03:30 AM (IST)

लेखक-दिग्दर्शक सचिन कुंडलकर... त्याला अशीच एकत्र ओळख आवडते. स्वतः लिहिलेल्या कथेवरच दिग्दर्शन करण्याचा त्याचा विचार पक्का आहे. मराठीतील दुसऱ्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार व चार चित्रपटांनंतर हिंदीत पदार्पणाची संधी त्याला मिळाली आहे. आनंद मिळविण्यासाठी चित्रपट तयार करणाऱ्या व प्रत्येक चित्रपटासाठी "आउट ऑफ बॉक्‍स' विचार करीत बॉक्‍स ऑफिसवर नशीब आजमावत शिखराकडे झेपावणाऱ्या सचिनविषयी...

मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये जन्मलेल्या सचिन कुंडलकरनं कायमच भव्य, दर्जेदार करण्याचं स्वप्न पाहिलं. लहानपणापासूनच त्याला चित्रपटांची आवड होती. तो आईवडिलांबरोबर चित्रपट पाहायला जायचा. आईला लिखाणाचं अंगही होतं. आई हिंदी चित्रपटाची, तर वडील इंग्रजी चित्रपटांचे चाहते. त्यामुळं सचिनला दोन्ही सिनेमे भरपूर पाहता आले. त्यामुळंच नववीत असतानाच त्यानं दिग्दर्शक बनण्याचा निर्णय घेऊन टाकला! 'मला लहानपणापासूनच लिहिण्याचा छंद होता. "कोबाल्ट ब्लू' नावाची एक कादंबरीही मी लिहिली. बारावीत असतानाच मी सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरवात केली. चित्रपट बनविण्याच्या प्रत्येक प्रक्रियेचं आकलन मला त्यांच्याबरोबर काम करताना झालं. पुण्यातील नॅशनल फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये मी काही चांगले सिनेमे पाहिले. याचदरम्यान माझे सिनेमे मीच लिहिणार व दिग्दर्शनही करणार असा निर्णय घेतला,'' सचिन आपल्या सुरवातीच्या अनुभवांबद्दल सांगत होता. दिग्दर्शनातील अनुभव घेत असतानाच त्यानं फिल्म इन्स्टिट्यूटमधील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला; मात्र दुसऱ्या वर्षाला असताना त्याला दिग्दर्शनाऐवजी संकलनाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास सांगितलं गेलं. त्यामुळं सचिननं तो अभ्यासक्रमच सोडून दिला. दिग्दर्शक होणं हेच ध्येय असल्यानं दुसरा विचार करणं शक्‍यच नसल्याचं तो सांगतो.

अनुभव पहिल्या चित्रपटाचा
सचिननं "दोघी', "जिंदगी झिंदाबाद', "भैस बराबर' आदी चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्याला 1999 मध्ये फ्रेंच सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व तेथेच त्यानं "वन कॅफे प्लीज' हा लघुपट बनवला. सुमित्रा भावेंबरोबर "दहावी फ' या चित्रपटाचं काम केल्यानंतर त्यातील शिल्लक रिळांतून "आउट ऑफ द बॉक्‍स' हा लघुपटही बनवला. हा सर्व अनुभव गाठीशी आल्यानंतर त्यानं आपला पहिला चित्रपट "रेस्टॉरंट'चं काम सुरू केलं. या अनुभवाबद्दल सचिन सांगतो, 'पहिला चित्रपट बनवताना मला संधीपेक्षा प्रक्रियेचं आव्हान अधिक वाटत होतं. क्रिएटिव्हिटीचा ताण जाणवत होता. पहिला दिवस घाबरवून टाकणारा होता. चित्रपटाच्या निर्मितीतील साध्यातील साधं काम महत्त्वाचं ठरतं. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग अतिशय महत्त्वाचा व अनिवार्य असतो. चित्रपट बनवणं हे अत्यंत अवघड काम आहे, त्यासाठी पूर्ण समर्पणानं काम करावं लागतं. दुर्दैवानं मराठी कलाकारांमध्ये ते कमी आढळतं. हिंदीतील कलाकार एकाग्रतेनं काम करताना दिसतात. शाहरुख खानशी बोलताना मला हे अधिक प्रकर्षानं जाणवलं.''

अडकून पडलो नाही
तू चित्रपटाची कथा लिहिताना व दिग्दर्शन करताना प्रेक्षकांचा विचार करतोस की स्वतःचा, या प्रश्‍नावर तो म्हणतो, 'लेखक-दिग्दर्शक म्हणून कसा चित्रपट करायचा, याचा पूर्ण अधिकार मला आहे. कोणाच्या सांगण्यावरून चित्रपट बनवायला मी टीव्ही चॅनेलची नोकरी करीत नाही. मला आनंद मिळणार असेल, तरच मी चित्रपट बनवतो. तो चित्रपट दर्जेदार व्हावा, निर्मितीमूल्यं चांगली असावीत यासाठी मी मेहनत घेतो. आपल्याला हवा तसा चित्रपट बनविण्याची किंमत मोजावीच लागते व मी त्यालाच "रिस्क' समजतो. अर्थात, कोणताही निर्माता त्याला समाधान मिळत नसल्यास तुमच्या चित्रपटावर पैसा लावत नाही. सुदैवानं असं समाधान शोधणारे निर्मातेही मला मिळाले आहेत. माझा पहिलाच चित्रपट "रेस्टॉरंट' काही चित्रपटगृहांत पंचवीस आठवड्यांपर्यंत चालला. दुसरा चित्रपट "निरोप'ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मात्र त्यानं पुरेसा व्यवसाय केला नाही. "गंध' या चित्रपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटासाठी मी खूप कष्ट घेतले होते, मात्र वितरक मिळण्यात अडचण आल्यानं मला खूप त्रास झाला. हा मोठ्या निराशेचा काळ होता. मला सर्वाचाच कंटाळा आला होता. मात्र, यश असो वा अपयश, अडकून पडायचं नाही हा धडा मी शिकलो व त्यातून लवकरच बाहेर आलो.''

हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण
हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्‍यप यानं सचिनचा "गंध' हा चित्रपट पाहिला व त्याला सचिनची दिग्दर्शनातील हातोटी आवडली. "गंध'च्या अनुभवामुळं निराश झालेल्या सचिनला अनुरागनं नवी उभारी दिली. तुझ्या हिंदीतील पहिल्या चित्रपटाची निर्मिती मीच करणार, असे आश्‍वासन देत त्यानं सचिनला पटकथा लिहिण्यासही सांगितलं. या अनुभवाबद्दल सचिन सांगतो, ""अनुरागनं माझ्या कामाचं कौतुक केलं व पटकथा लिहिण्यास सांगितली. त्याच्या शब्दांमुळं मी निराशेतून बाहेर आलो. काही दिवसांनी तो पुन्हा भेटला व पटकथेची आठवण केली. पुढील काही दिवसांत मी पटकथा लिहून पूर्ण केली व "अय्या' या रोमॅंटिक कॉमेडी चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली. माझ्या पहिल्याच हिंदी चित्रपटाला अनुरागसारखा निर्माता व राणी मुखर्जीसारखी अभिनेत्री मिळाली. राणीनं चार महिने इतर कोणतंही काम न करता खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं गीतकार गुलजार यांच्याबरोबर मी काही काळ घालवला, तो अनुभवही समृद्ध करणारा होता. अतिशय आपुलकीच्या वातावरणात, कामाचा व प्रवासाचा आनंद घेत आम्ही हा चित्रपट पूर्ण केला आहे. मला या चित्रपटाच्या प्रोमोजसाठी देशभर फिरावं लागणार आहे व तो माझ्यासाठी मोठा अनुभव असेल. माझा पुढचा चित्रपट हिंदी असेल व ती प्रेमकथा आहे. या चित्रपटाचा नायक रणबीर कपूर असावा, अशी माझी इच्छा आहे. मी फार मोठं ध्येय ठेवत नाही. मला केवळ पुढचा चित्रपट मिळावा व तो मी चांगल्या प्रकारे पूर्ण करावा एवढंच ध्येय मी ठेवतो...''

सचिनचा गुरुमंत्र
वस्तू, माणूस, जागा आदी कशातही अडकून पडू नका.
यश, अपयश येत राहील; पुढं जाणं महत्त्वाचं.
अपरिमित कष्ट, घरदार विसराल तरच दर्जेदार निर्मिती शक्‍य.
तुमच्या आसपास चांगल्याबरोबर गाळही आहे; चांगलं निवडायला शिका.
प्रतिक्रिया
On 04-03-2012 08:57 AM deendayal.vaidya said:
छान लिहिला आहे लेख.....वस्तू, माणूस, जागा यात अडकून पडू नका हा मंत्र तर मला खूप आवडला. किती खरा आहे तो!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: