Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  Download Font  |  लॉग-इन
| | |

गर्भाधान संस्कार

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, March 15, 2013 AT 12:45 AM (IST)
गर्भधारणेचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व गर्भाधानालाही आहे. गर्भाधानासाठी तयारी केल्यानंतर परमेश्‍वरी इच्छेने व योजनेने अपत्यप्राप्ती होते. होणारे अपत्य सुंदर, कर्तृत्ववान, निरोगी, उत्तम शरीरसौष्ठव असणारे, आई-वडिलांना मान देणारे, ज्ञानाची महती ओळखणारे, समाजासाठी व एकूणच सर्वांसाठी खास काही करण्याची इच्छा असणारे असावे, अशी मनोमन समजूत असावी, तशी चर्चा व्हावी, तशी प्रार्थना व्हावी व मगच गर्भाधानासाठी प्रवृत्त व्हावे.

"गर्भ' व "आधान' या दोन शब्दांपासून "गर्भाधान' हा शब्द तयार झालेला आहे. आधान म्हणजे ठेवणे, धारण करणे, गर्भवती होणे. गर्भाधानाची तयारी म्हणून आपण यापूर्वी प्रेमसंस्कार व बीजसंस्कार पाहिले. प्रेमसंस्कार म्हणजे पुरुष व स्त्रीने एकमेकांमध्ये आपल्यातीलच अर्धा अंश पाहणे आणि एकमेकांवाचून जगण्याला अर्थ येणार नाही किंवा जीवनाची परमप्राप्ती, शांती वा परमस्वरूपाचे आत्मज्ञान मिळणार नाही, हे निसर्गचक्र चालू ठेवण्यासाठी लागणारे अपत्य देता येणार नाही, तसेच, समाजधारणेसाठी आवश्‍यक असलेले कुटुंब समाजाला पुरवता येणार नाही, अशा सर्व दृष्टिकोनातून एकमेकांविषयी आदर, प्रेम वाढवणे व त्या प्रेमाचे रूपांतर सरतेशेवटी परमेश्‍वरभक्‍तीत करणे. कुठल्याही प्रकारे वीर्यनाश होऊ न देणे, ज्या स्त्रीला गर्भाधान करायचे आहे तिच्या व्यतिरिक्‍त दुसऱ्या स्त्रीशी संबंध न ठेवणे वा तसे चिंतन न करणे आणि ज्या पुरुषाकडून गर्भाधानाची अपेक्षा आहे त्या पुरुषाव्यतिरिक्‍त दुसऱ्या कोणाचे चिंतन न करणे या गोष्टीही प्रेमसंस्कारात अपेक्षित असतात. गर्भाधान होत असताना वृत्ती सैरभैर झालेल्या असतील, तर जन्माला येणाऱ्या अपत्यामध्ये वेगवेगळी व्यक्‍तिमत्त्वे येण्याचा किंवा वातप्रकृतीची मुले होण्याचा संभव असतो. खरे पाहता, या सर्व गोष्टींची समज आई-वडिलांनी मुलीला-मुलाला देणे आवश्‍यक असते, असे भारतीय परंपरेने व आयुर्वेदशास्त्राने सांगितले आहे. ती दिलेली असली तरी उत्तम गर्भधारणेसाठी आवश्‍यक असणारी सर्व माहिती व संस्कार गर्भाधान या विधीद्वारा केले जातात. स्त्री-पुरुषांच्या मनात चुकून-माकून विकल्प वा विकृती आलेली असली, तर ती दुरुस्त व्हावी व मेंदू स्व-संतुलन (सेल्फ करेक्‍टिंग मोड) अवस्थेत जावा, यासाठी मंत्रोच्चार, हवन वगैरे सुचविलेले आहेत. अशा प्रकारे गर्भाधान होण्याच्या दृष्टीने वातावरणनिर्मिती, घरच्यांना माहिती व गर्भधारणा जाणीवपूर्वक व्हावी व गर्भाधान झाल्यावर त्या जिवाची काळजी घेतली जावी, यासाठी सुंदर विधी सुचविलेले दिसतात.

गर्भाधान व गर्भधारणा या जरी वेगवेगळ्या गोष्टी म्हटल्या तरी त्या एकाच वेळी होत असतात. स्त्री-पुरुषांचे मिलन झाले की त्या ठिकाणी गर्भधारणा होते, त्यामुळे गर्भधारणेचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व गर्भाधानालाही आहे. स्त्री-पुरुषाचे मिलन त्यांच्यातील नैसर्गिक आकर्षणामुळे होत असते, कामशक्‍ती कार्यान्वित असते. त्या ठिकाणी जी शक्‍ती अस्तित्वात असते त्यामध्ये कामदेव व रती या दोन्ही देवतांची उपस्थिती असते. म्हणून हा एक देवतापूजनाचा पवित्र विधी आहे असे समजून गर्भधारणा व्हावी. एरवी स्त्री-पुरुषांमधील आकर्षण, त्यांच्यामध्ये असलेले लैंगिक संबंध किंवा त्यांच्या अनुषंगाने येणारे शृंगार व इतर माहिती म्हणून, गंमत म्हणून, आकर्षण म्हणून आधी झालेले असले तरी गर्भधारणा करण्याचे वेळी या सर्व विषयांना व कल्पनांना बाजूला ठेवून गर्भधारणेसाठी प्रवृत्त व्हायचे यासाठी आयुर्वेदाने विशेष मार्गदर्शन केलेले असते. कुठल्याही प्रकारे मानसिक, शारीरिक तयारी नसताना आणि कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण असताना, इच्छा नसताना गर्भधारणा झाली तर अपत्य आरोग्यवान न होण्याचीच शक्‍यता अधिक असते. गर्भाधान होण्यापूर्वी पंचकर्म वगैरे करून घ्यावे, असे जरी सुचविलेले असले तरी त्या पंचकर्माचा उपयोग झालेला आहे आणि शरीर आरोग्यपूर्ण आहे, वीर्य आयुर्वेदात सांगितल्या परीक्षानुसार उत्तम आहे, स्त्रीचा मासिक धर्म पाहिजे तसा व्यवस्थित आहे हे सर्व तपासून घेणे आवश्‍यक असते. पंचकर्मानंतर ते गर्भाधान दरम्यानच्या काळात केलेल्या रसायनसेवनासाठी किंवा इतर काही कारणामुळे काही काळ गेला असल्यास प्रत्यक्ष गर्भाधान होण्यापूर्वी आपले शरीर संतुलित आहे की नाही हे पुन्हा एकदा पाहणे आवश्‍यक असते. या दृष्टीने पुरुषाने पुन्हा एकदा पोट साफ करून घेण्याने, स्त्रीने एखादी उत्तरबस्ती वगैरे करून घेण्याने गर्भाधानासाठी उत्तम परिस्थिती तयार होऊन चांगल्या अपत्याची प्राप्ती होऊ शकेल.

गर्भाधानासाठी निवडलेली जागा स्वतःची नेहमीची राहण्याची असावी. जागेविषयी कुठल्याही प्रकारे मानसिक ताण वा भीती नसावी. गर्भाधानापूर्वी दोन-तीन दिवस तरी दोघांनी एकमेकांच्या मर्जीत राहून, विश्रांती घेऊन, खाणे-पिणे सांभाळून विशिष्ट प्रकारची मानसिकता तयार करून, खोली सुशोभित व सुगंधित करून त्या ठिकाणी रती-कामदेवांचे पूजन होणार आहे, त्यांना आमंत्रण देणार आहे, अशा पवित्र भावनेने गर्भधारणा व्हावी. गर्भाधान होण्यापूर्वी मुलगाच व्हावा, मुलगीच व्हावी, आपल्याला एकच अपत्य पुरे अशा प्रकारची मानसिकता नसावी. गर्भाधानासाठी तयारी केल्यानंतर परमेश्‍वरी इच्छेने व योजनेने अपत्यप्राप्ती होते. होणारे अपत्य सुंदर, कर्तृत्ववान, निरोगी, उत्तम शरीरसौष्ठव असणारे, आई-वडिलांना मान देणारे, ज्ञानाची महती ओळखणारे, समाजासाठी व एकूणच सर्वांसाठी खास काही करण्याची इच्छा असणारे असावे, अशी मनोमन समजूत असावी, तशी चर्चा व्हावी, तशी प्रार्थना व्हावी व मगच गर्भाधानासाठी प्रवृत्त व्हावे. असे केल्याने जन्माला येणारे अपत्य समाजामध्ये एक सुसंस्कृत व समाजोपयोगी असेल.

असेही म्हणता येईल, की आपल्या आवडीप्रमाणे श्रीकृष्ण, ज्ञानेश्‍वर, राणा प्रताप, शिवाजी महाराज, विवेकानंद, एखादा वैज्ञानिक किंवा मीराबाई, अहिल्याबाई होळकर, जिजामाता, झाशीची राणी यासारखा मुलगा वा मुलगी व्हावी, अशा तऱ्हेची कल्पना मनात रुजवावी. गर्भाधानाच्या ठिकाणी गोंगाट नसावा, आजूबाजूला भांडण चाललेले नसावे, कुत्री-मांजर रडण्याचे आवाज नसावेत. जमल्यास मंत्र संगीत वा मनपसंत वाद्यसंगीत ऐकावे. या सर्वांमुळे व्यवस्थित गर्भाधान होऊन उत्तम अपत्यप्राप्ती होईल.

गर्भ राहू नये या हेतूने काही गोळ्या, औषधे पूर्वी घेतली असल्यास ती बंद केल्यावर सहा महिने तरी मध्ये जावेत, पंचकर्म, उत्तरबस्ती वगैरे क्रिया करून रसायने सेवन केल्यानंतरच गर्भाधानाची वेळ ठरवावी. मूल होऊ नये म्हणून चार-सहा वर्षे संततिनियमनाच्या घेतलेल्या गोळ्या थांबवून लगेच पुढच्या महिन्यात गर्भधारणा झाली, तर जन्मणाऱ्या मुलांमध्ये विशिष्ट स्वभाव दिसून येतो, असे लक्षात आलेले आहे. अशा गोळ्या घेतल्यामुळे शरीरात होणाऱ्या हॉर्मोन्सच्या बदलामुळे अपत्यावर परिणाम झालेला दिसतो.

स्त्रीला दिवस राहिले म्हणजे घरात एक नवीन अडचण येणार, ज्या महिन्यात बाळंतपण येणार आहे, त्याच महिन्यात नेमक्‍या मुलांच्या परीक्षा आहेत, अशी दूषणे उत्पन्न केली गेल्यास अपत्यावर परिणाम होतो, त्यामुळे घरात गर्भवती स्त्री असताना योग्य, आनंदी वातावरण राहील याकडे लक्ष असावे. घरात प्रार्थना, पूजा होत राहावी. यामुळे देवाला काही मिळते असे नाही, तर यामुळे वातावरणात मांगल्य उत्पन्न होते, आत्मविश्‍वास व श्रद्धा वाढते आणि चांगल्या वातावरणात चांगल्या अपत्याचा जन्म होतो.

गर्भाधान होते स्त्रीच्या शरीरात; पण पुढचे नऊ महिने तिच्या पतीने, कुटुंबीयांनी स्त्रीला आश्‍वस्त करणे आवश्‍यक असते. तिचे मन कुठल्याही प्रकारे दुखविले जाणार नाही, तिची पूर्णपणे काळजी घेतली जाईल, तिला पूर्णपणे प्रतिष्ठा लाभेल याकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. हे साधण्यासाठीच जणू सातव्या महिन्यात गर्भवतीला नटवून थटवून तिचा मान वाढवण्यासाठी, तिला मोठेपणा देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने डोहाळ जेवणासारखे कार्यक्रम आयोजित केलेले असतात.

www.balajitambe.com
संबंधित बातम्या
प्रतिक्रिया
On 21/03/2013 07:33 PM RAJESH said:
vary गुड INFORMATION
On 20/03/2013 10:05 AM काकासाहेब घुले said:
नवीन लग्न झाल्यांना हे खुप फायद्याचे आहे त्यांनी याचे अनुकरन करुन गर्भधारना करुन घ्यावी
आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2013 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: