गणेशाची व्रते 

गणेशाची व्रते 
Updated on

संकष्ट चतुर्थी : प्रत्येक मराठी महिन्यात किंवा हिंदू कालगणनेच्या महिन्यात संकष्टी चतुर्थी येते. तिलाच संकष्ट चतुर्थी असेही म्हणतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत अनेक जण करतात. या दिवशी उपवास करून गणेशाची मनोभावे पूजा केली जाते. या व्रताबाबत असे सांगितले जाते की, प्रत्येक जिवाला अर्थात प्राणिमात्राला चार प्रकारच्या अवस्थांमधून जावे लागते. या अवस्था म्हणजे गर्भज, देहज, अंतिम आणि याम्यज. प्रत्येक अवस्थेमध्ये अनेक संकटांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. या अवस्थांचा शब्दश: अर्थ बघितल्यास लक्षात येते, की गर्भज म्हणजे प्रसूतिजन्य अवस्था. देहज म्हणजे जन्मानंतरची अवस्था. अंतिम म्हणजे मृत्यूसमयीची अवस्था आणि साम्यज म्हणजे मृत्यूनंतरची अवस्था. साधारणत: मृत्यूनंतर व्यक्ती यमलोकात जातो, असे म्हणतात. त्या ठिकाणी गेल्यानंतरची अवस्था म्हणजे याम्यज अवस्था होय. या चार प्रकारच्या अवस्थांमधील संकटांचा नाश करणारे व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थी व्रत होय. याला चतुर्विध पुरुषार्थ प्राप्त करणारे व्रत, असेही म्हटले जाते. संकष्ट या शब्दाचा अर्थ बघितल्यास असे लक्षात येते, की 'सं' म्हणजे सकारात्मक किंवा चांगले आणि कष्ट म्हणजे मेहनत किंवा श्रम. म्हणजेच चांगले कार्य करण्यासाठी करावे लागणारे श्रम किंवा कष्ट म्हणजे संकष्ट होय. हे व्रत करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. ते म्हणजे, संकष्ट चतुर्थी व्रत करायचे असल्यास पांढरे तीळ पाण्यात घालायचे. त्या पाण्याने स्नान करायचे. संकल्प सोडायचा आणि गणपतीचे ध्यान करायचे. उपवास करायचा. गायीच्या शेणाने जमिनीवर गणेशपीठ काढायचे. तिथे पंचरत्नयुक्त कलशाची प्रतिष्ठापना करायची. त्यावर एक पात्र म्हणजे भांडे ठेवायचे. त्यावर एक कापड टाकायचे. त्या कापडावर गणेशमूर्ती ठेवायची. पुरुष सूक्त म्हणायचे. पूजा करायची. गणपतीच्या नावांचा उल्लेख करायचा. त्यानुसार एक-एक दूर्वा वाहायची. आरती म्हणायची. मंत्रपुष्पांजली वाहायची. एकवीस प्रदक्षिणा घालायची. अर्घ्य प्रदान करायचे. महाप्रसाद करायचा. चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडायचा. महाप्रसाद वाटायचा की, झाले संकष्ट चतुर्थी व्रत. मात्र, संकष्ट चतुर्थी मंगळवारी आल्यास तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. अनेक जण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी उपवास करतात. त्याला अंगारकी चतुर्थी व्रत असे म्हणतात. या दिवशीही संकष्ट चतुर्थी व्रताप्रमाणचेच सर्व विधी करायच्या असतात. 

दूर्वा गणपती व्रत : प्रत्येक महिन्यात संकष्ट आणि विनायकी चतुर्थी या तिथी असतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्‍ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीस विनायकी आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्टी किंवा संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. यापैकी विनायकी चतुर्थीशी संबंधित व्रतांपैकी दूर्वा गणपती हे एक व्रत आहे. विनायकी चतुर्थी रविवारी आल्यास दूर्वा गणपती व्रत करायचे असते. विनायकी चतुर्थी असलेल्या रविवारपासून पुढील सहा महिने किंवा श्रावण महिन्यातील शुद्ध चतुर्थीपर्यंत दूर्वा गणपती व्रत केले जाते. म्हणजे रविवारी येणाऱ्या विनायकी चतुर्थीपासून पुढील सहा महिने किंवा श्रावण शुद्ध चतुर्थीपर्यंत प्रत्येक विनायकी चतुर्थीला दूर्वा गणपती व्रत करायचे. या दिवशी उपवास करायचा. या व्रताच्या दिवशी गणपतीची पूजा करून एकवीस किंवा एकवीसशे किंवा 21 हजार दूर्वा गणपतीला वाहाव्यात, असे सांगितले जाते. काही जण केवळ दूर्वाच नव्हे तर, दूर्वांच्या जुड्यासुद्धा वाहतात. त्याही एकवीस, एकवीसशे किंवा 21 हजार या प्रमाणात दूर्वांच्या जुड्या गणपतीला वाहिल्या जातात. 

सिद्धिविनायक व्रत : सर्वसाधारणपणे गणपतीचे वर्णन दोन प्रकारे केले जाते. ते म्हणजे एक डाव्या सोंडेचा गणपती आणि दुसरा म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती. उजव्या सोंडेच्या गणपतीचे व्रत खूप कडक असते, असे अनेक जण सांगतात. यामुळे गणेशोत्सवात डाव्या सोंडेच्या गणपतीचीच प्रतिष्ठापना केली जाते. पण, डावे म्हणजे सोपे आणि उजवे म्हणजे खडतर असे काही नसते. पण, गणपतीच्या मूर्तीकडे बारकाईने बघितल्यास किंवा त्याचा सरळ साधा मथितार्थ लक्षात घेतल्यास, असे दिसते की, गणपती आपल्याला उजव्या हाताने आशीर्वाद देतो आहे. त्यामुळेच त्याचा उजवा हात नेहमी आशीर्वाद देण्यासारख्या मुद्रेत दाखवलेला असतो. गणपतीच्या डाव्या हातात मोदक दाखविलेले असतात. ते खाणे सुलभ व्हावे, यासाठी गणपतीची शुंड म्हणजे सोंड डाव्या बाजूला दाखवलेली असावी. हा तर्क विचारात घेतल्यास डाव्या सोंडेचा गणपती किंवा त्याचे व्रत सोपे, साधे, सरळ आणि उजव्या सोंडेच्या गणपतीचे व्रत खडतर, कठीण असते, हा समज-गैरसमज दूर झाल्याशिवाय राहणार नाही. पण एक मात्र खरे की, उजव्या सोंडेच्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात. त्याची उपासना, आराधना करणे म्हणजेच सिद्धिविनायक व्रत होय. हे व्रत करताना कोणत्याही महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थीला म्हणजे विनायकी चतुर्थीला तीळ घातलेल्या पाण्याने स्नान करावे. सोने किंवा चांदीच्या गणेशमूर्तीचे पूजन करावे. पूजन करताना गणपतीच्या नावांचा उच्चार करावा. एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. त्यातील दहा मोदक पौराहित्य करणाऱ्या गुरुजींना द्यावेत. उरलेले व्रत करणारे सेवन करावेत. इतरांना प्रसाद म्हणून देण्यासाठी नैवेद्यासाठी केलेल्या मोदकांव्यतिरिक्त मोदक करावेत. नैवेद्याव्यतिरिक्त केलेले मोदक प्रसाद म्हणून वाटावेत. या व्रतामुळे लक्ष्मी, विद्या आणि यशश्री प्राप्त होते, असे म्हणतात. 

कपर्दी विनायक व्रत : कपर्दी म्हणजे कवडी. कपर्दी गणेशाचे मंदिर काशी येथे आहे. कपर्दी विनायक व्रत हे श्रावण महिन्यातील शुद्ध चतुर्थीपासून केले जाते, असे जाणकार सांगतात. 

वरद व्रत : गणपतीचे वरद विनायक नाव सर्वांना माहिती आहे. अष्टविनायकांपैकी महडच्या गणपतीला वरद विनायक असे म्हणतात. त्याची उपासना करण्याचे व्रत म्हणजे वरद व्रत होय. हे व्रत श्रावण महिन्यातील शुद्ध चतुर्थीला केले जाते. त्याची उद्यापन किंवा सांगता भाद्रपद शुद्ध पंचमीला केली जाते. 

गणपती व्रत : अनेक जण गणपतीचे व्रत 21 दिवसांचे करतात. मात्र, काही जाणकारांच्या मते, गणपती व्रताचा प्रारंभ श्रावण शुद्ध चतुर्थीला करावयाचा असतो. त्याचे उध्यापन श्रावण वद्य दशमीला करायचे असते. 

गणेश पार्थिव पूजा व्रत : श्री गणेशाच्या अनेक तत्त्वांपैकी पृथ्वी हे एक तत्त्व आहे. गणेश उपासनेमध्ये पार्थिवपूजा व्रत सांगितलेले आहे. या व्रताचा प्रारंभ श्रावण शुद्ध चतुर्थीला करायचा असतो. त्याचे उध्यापन अर्थात समारोप भाद्रपद शुद्ध चतुर्थीला केला जातो. हे व्रत पार्वतीनेही केले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, एकदा श्रीशंकर आणि त्रिपुरासूर यांच्यात युद्ध झाले. शंकरजींनी त्रिपुरासुराचा वध केला. त्या दिवशी कार्तिक शुद्ध पौर्णिमा होती. मात्र, त्रिपुरासुराच्या वधापूर्वीस पार्वती गुप्त झाली होती. त्रिपुरासुराच्या वधाचे वृत्त पार्वतीला समजले. त्या वेळी पार्वती हिमालय पर्वताच्या एका गुहेतून प्रकट झाली. त्या वेळी तिने आपल्याला शंकरजी मिळावेत, अशी विनंती तिच्या पित्याकडे अर्थात हिमालयाकडे केली. इच्छापूर्तीसाठी हिमालयाने पार्वतीस गणेशाच्या पार्थिव पूजनाचे व्रत करायला सांगितले. पार्वतीने पार्थिव गणेश पूजन व्रत केले. त्यानंतर तिला शंकरजी प्राप्त झाले. 

मृण्मय चतुर्थी व्रत : श्रीगणेशाचे मृण्मय चतुर्थी हे एक व्रत आहे. ते करण्यासाठी पार्थिव गणेशाचे पूजन केले जाते. श्रावण शुक्‍ल चतुर्थीपासून मृण्मय चतुर्थी व्रताचा प्रारंभ केला जातो. भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीपर्यंत हे व्रत केले जाते. हे व्रत करण्यासाठी काही नियम सांगितले आहेत. ते असे, मृण्मय चतुर्थी व्रत सुरू करण्यापूर्वी सकाळी नदी, तलाव किंवा विहिरीवर जाऊन संकल्प करावा. स्नान करावे. पांढरे कपडे परिधान करावे. त्यानंतर घरी यावे. गणपतीची मूर्ती घ्यावी. चित्त स्थिर ठेवावे. मूर्तीची षोड्‌शोपचारे पूजा करावी. स्वत: एकान्न-भक्षण करावे. भाद्रपद शुक्‍ल चतुर्थीस उपवास करावा. 

करक चतुर्थी व्रत : करक चतुर्थी व्रत हे केवळ स्त्रियांनीच करावे, अशी परंपरा आहे. हे व्रत कार्तिक शुद्ध चतुर्थीला करायचे असते. 

वट गणेश व्रत : कार्तिक शुद्ध चतुर्थीला केल्या जाणाऱ्या व्रताला वट गणेश व्रत असे म्हणतात. या व्रताचा समारोप माघ शुद्ध चतुर्थीला करायचा असतो. 

सत्यविनायक व्रत : श्रीगणेशाच्या अवतारांपैकी एक अवतार म्हणजे विनायक होय. या विनायकाचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता. त्याची उपासना करण्याचे व्रत म्हणजे सत्य विनायक व्रत. ब्रह्मांड पुराणामध्ये सत्यविनायकाची आख्यायिका सांगितलेली आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी, सोमवार आणि शुक्रवारीसुद्धा हे व्रत केले जाते. सत्यनारायणाच्या पूजेप्रमाणे सत्यविनायकाच्या पूजेची मांडणी करायची असते. 

श्रीगणेश यज्ञ : श्री गणपतीची आराधना करण्याचा एक प्रकार म्हणजे गणेश यज्ञ. यालाच गणेश याग असेही म्हणतात. गणेशाच्या जन्माच्या दिवशी गणेश याग केला जातो. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांनुसार त्याच्या जन्मतिथीही वेगवेगळ्या आहेत. त्या म्हणजे वैशाख पौर्णिमा, ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी, भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी. यापैकी कोणत्याही तिथीला आपण गणेश यज्ञ करून शकतो. हे व्रत करताना होमकुंडामध्ये दूर्वा, मोदक, शमीच्या समीधा, साळीच्या लाह्या आणि तीळ यांची आहुती दिली जाते. ब्रह्मणस्पती सूक्त व अथर्वशीर्ष पठण केले जाते. 

अनंत चतुर्दशी व्रत : दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव आपण साजरा करतो. त्याची सुरवात आजपासून होत आहे. गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करायचे असते. भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी असे म्हणतात. म्हणजेच आपल्या लाडक्‍या गणरायाला निरोप देण्याचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. चतुर्दशी म्हणजे चौदावी तिथी होय. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा कालावधी म्हणजे गणेशोत्सवाचा काळ होय. याचा आपण सूक्ष्मपणे विचार केल्यास, असे जाणवते, की गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात काहीतरी रहस्य आहे. पण, ते कळायला अगदी सोपे आहे. त्यासाठी हवी फक्त सूक्ष्म निरीक्षणशक्ती. सखोल विचारशक्ती. जसे, की आपण, गणेशाला 'आद्य' म्हणतो. आद्य म्हणजे सर्वप्रथम. संत ज्ञानेश्‍वर माउलींनी सुद्धा गणपतीचे वर्णन 'ओम नमोजी आद्या' असे केलेले आहे. म्हणजे या सृष्टीत जो सर्वांत आधी आहे, 'आद्य' आहे तो श्रीगणेश. त्याचाच उत्सव आजपासून सुरू होत आहे आणि त्याचा समारोप अनंत चतुर्दशीला होणार आहे. म्हणजे आद्यापासून अनंतापर्यंत हा उत्सव चालणार आहे. म्हणजेच हा उत्सव 'अनादिअनंत' आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अनादिअनंत म्हणजे ज्याला आरंभही नाही आणि अंतही नाही असा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. त्याचा करता, करविता म्हणजे श्रीगणेश. म्हणजेच गणेशाला आरंभही नाही आणि अंतही नाही. तो अनादिअनंत आहे. अशा गणेशाचा उत्सव आपण आजपासून सुरू करीत आहोत. हा उत्सव साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी, हो ना!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.