योग ‘ऊर्जा’ : श्‍वसनसंस्थेचे स्वरूप 

Devyani-M
Devyani-M

जन्मापासून शेवटचा ‘श्‍वास’ घेईपर्यंत अविरत सुरू असलेली, आपल्याला जिवंत ठेवणारी श्‍वसनसंस्था आज थोडक्यात पाहू. बहुतांश वेळा आपोआप सुरू राहणारी ही क्रिया आपण थोडा वेळ तरी नियंत्रणात ठेवून, जागरूकतेने करू शकतो, ते प्राणायामात! एरवी कितीही बिझी असलो, झोपेत असलो तरी श्‍वास मात्र आपले काम सुरूच ठेवतो. श्‍वसन आपल्या प्रत्येक पेशीच्या कार्याशी निगडित असते, शरीरातील सर्व पेशींच्या कार्यासाठीची आवश्यक ऊर्जा व पोषक द्रव्ये मिळविण्यासाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो. तसेच मनाचे आणि श्‍वासाचे अतूट नाते आहे. काही आठवड्यांपूर्वी प्राणायामावरील लेखात याची सविस्तर माहिती दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्‍वसन प्रक्रियेत नाक (nose) व तोंडापासून (mouth) श्‍वसनमार्ग सुरू होऊन पुढे घसा (pharynx), ग्रसनी (larynx), श्‍वास नलिका (trachea), श्‍वसनी (bronchi), फुप्फुसे (lungs) व त्यातील वायुकोश (alveoli) असे भाग क्रियाशील असतात. याशिवाय मान (neck), छातीचे स्नायू (intercostal muscles), श्‍वासपटल (diaphragm), छातीचा पिंजरा (thoracic cage), पोटाचे स्नायू (abdominal muscles) व श्‍वसनक्रियेवर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील केंद्र यांचा श्‍वसनसंस्थेत समावेश असतो.

श्‍वास घेताना श्‍वासपटल व छातीच्या स्नायूंचे आकुंचन होते, छातीचा पिंजरा बाहेरच्या बाजूला ताणला जातो व श्‍वासपटल खालच्या बाजूला दाबले जाते. अशा प्रकारे छातीतील पोकळी सर्व बाजूंनी वाढते व फुप्फुसांचा विस्तार होतो. श्‍वास सोडताना हेच सर्व स्नायू शिथिल होतात कारण छातीचा पिंजरा व श्‍वासपटल पूर्व स्थितीत आपल्या जागी परत येतात. यामुळे छातीतील पोकळी कमी होऊन फुफ्फुसांचे आकुंचन होते. श्‍वसन संस्थेच्या उत्तम आरोग्यासाठी श्‍वासपटल व छातीच्या स्नायूंचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे, त्यासाठीचे विशेष प्रयत्न म्हणजे योगासने करायला हवी. वायुकोश व त्यावरील रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचे विसरण (diffusion) ही प्रक्रिया होते. फुफ्फुसातील ऑक्सिजन रक्तात मिसळल्यानंतर त्याचे वाहन लाल रक्तपेशी करतात व शरीरातील सर्व पेशींपर्यंत हा ऑक्सिजन व पोषक द्रव्ये पोचवली जातात.

श्‍वसनासंबंधी काही महत्वाचे मुद्दे... 
1) विश्रांत अवस्थेत मिनिटास १२ श्‍वास, सर्वसामान्य हालचालींमध्ये मिनिटास १४-१५ व व्यायाम करताना किंवा तणावाखाली असल्यास श्‍वासाची गती १६ पेक्षा अधिक असते. गाढ झोपेत श्‍वासाची गती संथ होऊन ६-८ अशी प्रती मिनीट होते. प्राणायामात मिनिटास ३-५ श्‍वास किंवा अगदी १-२ पर्यंतही कमी होऊ शकतात.

2) नेहमीच्या श्‍वसनात २५ टक्के छातीचे स्नायू, तर ७५ टक्के श्‍वासपटल वापरले जाते. श्‍वासपटलाचे कार्य खूप मोठे असल्याने फुफ्फुसांचा खालचा भाग अधिक कार्यरत असतो. सर्वसाधारण श्‍वसन कार्यात फुफ्फुसांचा वरचा व मधला भाग त्याप्रमाणात कमी वापरला जातो. त्यामुळे जे व्यायाम करत नाहीत त्यांचा तर फुफ्फुसांचा वरचा आणि मधला भाग कित्येक महिने फारसा वापरलाच जात नाही. अशाने ते अशक्त राहतात व त्यांची प्रतिकार शक्ती कमकुवत राहते.

3) आपला स्टॅमिना हा फुफ्फुसांच्या क्षमतेवर अवलंबून असतो. आपल्याला स्टॅमिना पुरत नाही अशी तक्रार असेल. तर याचा अर्थ आपल्या फुफ्फुसांचे टिशू थकलेले आहेत. यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहे. धावणे, दोरीच्या उड्या, जॉगिंगसारखे व्यायाम हे श्‍वसनसंस्थेसाठी महत्त्वाचे आहेत.

4) आपल्या फुफ्फुसांची हवा धारण करण्याची क्षमता ६ लिटर इतकी आहे, जी फक्त प्राणायाम व दीर्घ श्‍वसनाने पूर्णपणे वापरली जाते. एरवी आपण ५०० मिलि इतपतच श्‍वास घेतो व सोडतो.

5) छातीचा पिंजरा बाहेर, वर, खाली व मागे अशा चारही बाजूंनी प्रसरण करत असल्याने, ताठ बसण्याची सवय कायम असावी. दीर्घ काळ बसून काम करणाऱ्यांनी तर हे ध्यानात ठेवावेच. पुढील लेखात श्‍वसनसंस्थेच्या आरोग्यासाठी आसने, प्राणायाम, शुद्धीक्रिया व बंध यांचे महत्त्व समजून घेऊ!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com