मिरज - कुष्ठरोगी म्हटलं की, अजूनही समाज त्यांना झिडकारू पाहतो. रेल्वे स्थानके आणि मंदिरांत भीक मागणारे कुष्ठरोगी पाहून नाके मुरडली जातात. काही सेवाभावी संस्थांनी त्यांना आपलेसे केले आहे; पुनर्वसनासाठी प्रकल्प राबवले आहेत. तरीही त्यांच्या शारीरिक आणि मानसिक जखमा अद्याप पुरत्या भरलेल्या नाहीत. त्यावर फुंकर मारण्यासाठी जगप्रसिद्ध सर्च इंजिन गुगल पुढे सरसावले आहे. "गुगल'ने कुष्ठरुग्णांसाठीची पादत्राणे बनवणारा दक्षिण-मध्य भारतातला पहिला प्रकल्प मिरजेत सुरू केला आहे.
लेप्रसी मिशन आणि "गुगल'ने हातात हात घालून साकारलेल्या या प्रकल्पातून गेल्या दोन महिन्यांत सव्वादोनशे रुग्णांना पादत्राणे मिळाली आहेत; त्यांच्या जखमा सुसह्य झाल्या आहेत. जगातील हरेक प्रश्नाचे उत्तर निमिषार्धात पुढ्यात आणून ठेवणाऱ्या "गुगल'ने कुष्ठरुग्णांच्या जखमांवरही जणू यशस्वी उत्तर शोधले आहे.
तंत्रज्ञानाच्या थक्क करणाऱ्या आविष्कारासह "गुगल'ने जगाच्या प्रवासाची अवघी दिशाच बदलून टाकली. त्यातून करोडो-अरबोंची संपत्ती जमवली. यातून अनेक समाजोपयोगी प्रकल्प जगभरात सुरू केले. मिरजेतील पादत्राणांचा प्रकल्प त्यापैकीच एक आहे.
कुष्ठरुग्णांसाठी बाजारात विशेष तंत्राने बनवलेली पादत्राणे किंवा सोल उपलब्ध नाहीत. सर्वसामान्यांसाठी मिळणारी पादत्राणेच वापरावी लागतात. रोगामुळे बोटे झडलेली; पायाचे आकार बदललेले; ठिकठिकाणी जखमा झालेल्या. त्यामुळे बाजारातील चपला त्यांना अनुरूप नसतात. अनेकदा पायाला प्लास्टीकचा कागद किंवा अन्य काहीतरी गुंडाळून जखमा सांभाळाव्या लागतात. जखमा चिघळू नयेत किंवा इन्फेक्शन होऊ नये म्हणून चपलांच्या आत चिंध्या किंवा कागद भरून संरक्षण करावे लागते. पावलांचा अर्धाच भाग शिल्लक असणाऱ्या कुष्ठरुग्णांना चक्क लहान मुलांच्या मापाच्या चपला वापराव्या लागतात.
लेप्रसी मिशनने ही ससेहोलपट जाणली. पायांना फिट बसतील अशी पादत्राणे बनवण्याचा प्रवास सुरू झाला. परदेशात असे तंत्रज्ञान उपलब्ध आहे; भारतात मात्र यावर गांभीर्याने विचारच झालेला नव्हता. मिशनने भारतात प्रकल्पासाठी "गुगल'ला मदतीचे आवाहन केले. "गुगल'ने प्रस्तावाचा अभ्यास केला; तो स्वीकारला आणि पाहता पाहता मिरजेत सांगली रस्त्यावरील रिचर्डसन लेप्रसी मिशनच्या कॅंपस्मध्ये प्रकल्प आकाराला आला. काही दिवसांपूर्वीच कार्यकारी संचालक सुनील आनंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याचे सर्व तंत्रज्ञान, यंत्रसामग्री स्पेनमधून आयात केली आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व कच्चा माल यासाठीही स्पेनमधूनच मदत झाली.
अशी होते निर्मिती
रुग्णाच्या वेड्यावाकड्या किंवा झडलेल्या पायाची त्रिमितीय प्रतिमा संगणकावर स्कॅन केली जाते. ती सॉफ्टवेअरला पुरवली जाते. आरेखनाच्या कॅड प्रणालीद्वारे ही माहिती मशिनला मिळते. मशिनमध्ये ईथाईल व्हेनाईल ऍसीटेट या पदार्थाचा ठोकळा बसवलेला असतो (फुलांच्या बुकेमध्ये फुले खोवण्यासाठी वापरतात तसा ठोकळा). त्यामध्ये मशिनद्वारा कोरून त्रिमितीय सोलची निर्मिती होते. सुमारे सोळा मिनिटांत एक सोल तयार होतो. नको असणारे अवशेष ग्राईंडरच्या मदतीने काढून टाकले जातात. फिनिश स्वरूपातील सोल पायात वापरण्यासाठी तयार होतो.
रुग्णाच्या पायाच्या जखमा, झडलेला भाग, उंचवटे व सखल भाग, वेडेवाकडे आकार याचा विचार सोलमध्ये केलेला असतो; त्यामुळे तो पायात फिट बसतो. चप्पल किवा बुटाच्या आत बसवला की चालणे सुसह्य होते. जखमांमुळे वेडीवाकडी होणारी चालही सरळ होण्यास मदत होते.
पहिलाच प्रकल्प
रिचर्डसन लेप्रसी मिशनचे संचालक शिरीष शेगावकर आणि प्रकल्पाचे निर्मिती व्यवस्थापक सूर्यकांत सावंत यांनी सांगितले, की मध्य आणि दक्षिण भारतातील हा पहिलाच प्रकल्प आहे. तो "गुगल'च्या सहकार्याने प्रत्यक्षात आला. देशभरात लेप्रसी मिशनचे चौदा प्रकल्प (इस्पितळे) आहेत; त्यापैकी मिरज, मुजफ्फरनगर (बिहार) आणि शहादरा (दिल्ली) या तीन इस्पितळांमध्ये प्रकल्प राबवला आहे. यापैकी फक्त मिरजेतच सोलची निर्मिती होते. वर्षाकाठी दोन हजार जोड बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
खेळाडू, मधुमेही यांनाही उपयुक्त
विविध क्रीडाप्रकारांतील खेळाडू, मधुमेही रुग्ण, अपघातात पायाची मोडतोड झालेल्या व्यक्ती, कर्करोग किंवा तत्सम विकारामुळे पाऊल बाधित झालेले रुग्ण यांच्यासाठी हा प्रकल्प उपकारक आहे. मधुमेहींना पायांना जखमांपासून सांभाळावे लागते. बाजारातील चपलांमुळे जखमा होण्याची शक्यताच अधिक असते. त्यांना हे सोल उपयुक्त ठरतात. खेळाडूंसाठीही विशिष्ट दर्जाचे सोल तयार करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.
|