नवी दिल्ली - लंडन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बर्मिंगहॅम येथील एका हॉटेलमध्ये उतरलेल्या भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा अत्यंत कडेकोट करण्यात आली आहे. या हॉटेलजवळील वाहतूकही "नियंत्रित' करण्यात आली आहे.
इंग्लंडमध्ये सध्या "चॅम्पियन्स करंडक' स्पर्धा सुरु असून आज (रविवार) भारत व पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना खेळविला जाणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवरच हे स्फोट घडविण्यात आल्याने येथील वातावरण तणावग्रस्त बनले आहे.
मँचेस्टर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर थेरेसा मे यांनी लंडनमध्ये आणखी काही ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे लंडनमध्ये सुरक्षा यंत्रणा आणखी कडक करण्यात आली होती. मात्र, शनिवारी रात्री तीन ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले. पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ठार मारले आहे. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
लंडनमध्ये सध्या चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा सुरु असून, परदेशातील नागरिक मोठ्या संख्येने आलेले आहे. या पार्श्वभूमीवर हा हल्ला करण्यात आला आहे. लंडनमधील प्रसिद्ध लंडन ब्रिजवर पांढऱ्या रंगाच्या कारने फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांना चिरडण्यात आले. तर दुसरा हल्ला मार्केटमध्ये चाकूने करण्यात आला. तिसरा हल्ला बकसोल येथे झाला आहे. या तिन्ही हल्ल्यात 7 जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भारत व पाकिस्तान यांमध्ये तब्बल दोन वर्षांनी सामना होणार असून या सामन्याविषयी दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये व आंतरराष्ट्रीय पातळीवरही अत्यंत उत्सुकता आहे.
|