कर्जमाफीसाठी राज्य सरकार सज्ज - मुख्यमंत्री

कर्जमाफीसाठी राज्य सरकार सज्ज -  मुख्यमंत्री
Updated on

मुंबई - ""राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेच एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. विरोधकांमध्ये एकमत नाही, आम्ही फूट पाडलेली नाही. आम्हीसुद्धा विरोधात होतो; पण अशी वेळ कधी आली नव्हती. आमच्यातही मतभेत होते; पण आम्ही एकत्रितपणे पत्रकार परिषदांना सामोरे जात होतो. विरोधकांकडून दोन निवेदने प्राप्त झाली आहेत. दोन्ही पत्रातील मुद्दे जुनेच आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कोणताही नवीन मुद्दा पुढे आणलेला नाही,'' असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना लगावला. 

सह्याद्री राज्य अतिथिगृहात पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी भाजप आणि शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते. 

शेतकरी कर्जमाफीसंदर्भात ते म्हणाले, ""राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. देशाच्या आणि राज्याच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कर्जमाफी ठरणार आहे. राज्य सरकारने या योजनेची सर्वतोपरी तयारी केली आहे. योजनेसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यासाठी राज्यभरात पंचवीस हजार केंद्रे सुरू केली जाणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीत किमान एक केंद्र सुरू केले जाईल. हा अर्ज भरून घेताना फक्त चार ते पाच प्रकारची माहिती भरून घेतली जाईल. शेतकऱ्याचे बॅंक खाते, आधार क्रमांक, कुटुंबात अज्ञान मुले असतील, तर त्यांचे बॅंक खाते क्रमांक आणि कर्जमाफीतून वगळलेल्या प्रवर्गात नसल्याचे प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांकडून घेतले जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांना आधारशी लिंक केल्यामुळे मागच्या कर्जमाफीत जे बोगस प्रकार झाले ते होणार नाहीत. आधार नसलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब आधार कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने छाननी गतीने करता येणार आहे.'' 

""गेल्या वेळी मोठ्या प्रमाणावर बोगस खाती दाखवून कर्जमाफी लाटली गेली होती. "कॅग'च्या अहवालातही याबद्दल ताशेरे ओढण्यात आले होते. सरकार अजूनही त्या वेळची वसुली करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या पावसाळी अधिवेशनात 14 विधेयके प्रस्तावित आहेत. तसेच विधान परिषदेत 7 विधेयके प्रलंबित आहेत. अशा एकंदर 21 विधेयकांवर अधिवेशनात चर्चा होईल. अधिवेशनात पुरवणी मागण्याही मांडण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एसआरएमधील गैरव्यवहार आणि मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू असून, योग्यवेळी कारवाई केली जाईल. 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मते फुटल्याबद्दल विचारले असतान मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे मतदान गोपनीय असल्यामुळे मते फुटल्याची तपासणी करता येणार नसल्याचे सांगितले. 

बाळासाहेबांबद्दल आदरच... 
विधीमंडळात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा ठराव आणला नसल्याकडे लक्ष वेधता मुख्यमंत्री म्हणाले, ""शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सरकारचे सर्वोच्च मार्गदर्शक आहेत. दोन्ही पक्षात त्यांच्याबद्दल मोठा सन्मान आहे. राज्याच्या विरोधी पक्षाच्या राजकारणाला ज्यांनी सुरवात केली आणि स्थान मिळवून दिले असे ते आहेत. विधीमंडळात आता जो प्रस्ताव आहे. तो ज्यांच्या संसदीय कारकीर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ज्यांच्या जयंतीला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत, अशांचा आहे.'' आधी कुणाच्या प्रस्तावावर चर्चा करायची या वादावरही सामंजस्याने मार्ग काढला जाईल. कोणताही वाद होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. एका व्यक्तीची तुलना दुसऱ्या व्यक्तीशी होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्तीचा सन्मान कायम ठेवून यातून मार्ग काढू, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.