मुंबई - यंदा बारावीच्या निकालांना होणाऱ्या दिरंगाईने पालकवर्गात चिंतेचे वातावरण असताना रविवारी सीबीएसई बोर्डाने बारावीचे निकाल जाहीर केले. यंदा सीबीएसई बोर्डाचा निकाल 82.02 टक्के लागला. गेल्या वर्षी सीबीएसई बोर्डाचा निकाल 83.05 टक्के होता.
महाराष्ट्र राज्याचा समावेश असलेला चेन्नई विभागाचा निकाल 92.60 टक्के लागला. देशभरातून रक्षा गोपाल या विद्यार्थिनीने पहिला क्रमांक पटकावला. नोएडातील अमित्य स्कूलमध्ये शिकणाऱ्या रक्षाला 498 गुण (99.6 टक्के) मिळाले. चंडिगडच्या मराठमोळ्या भूमी सावंतचा पहिला क्रमांक अवघ्या एका गुणाने हुकला. ती देशात दुसरी आली, तर तिसऱ्या क्रमांकावर चंडिगडचेच अदित्य जैन आणि मन्नत लुथरा आले. त्यांना 496 गुण मिळाले.
यंदा निवडणुकांमुळे सीबीएसई बारावीच्या परीक्षा तब्बल एक आठवडा पुढे ढकलल्या गेल्या. रविवारी निकालानंतर सीबीएसई काउंन्सिलिंग अकरा जूनपर्यंत सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत उपलब्ध आहे; परंतु उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन होणार नाही, अशी स्पष्ट कल्पना सीबीएसई बोर्डाने दिली आहे; परंतु गुणांची पुनर्तपासणी आणि उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी उपलब्ध होईल.
परदेशातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 92.02 टक्के लागला. यंदा तब्बल 14 हजार 818 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती; परंतु प्रत्यक्षात 14 हजार 743 विद्यार्थी हजर राहिले. एकूण 92.02 टक्के निकाल लागला.
सीबीएसईचा निकाल -
वर्ष -- नोंदी -- परीक्षेला हजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या -- उत्तीर्ण विद्यार्थी -- उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा टक्का --
2016 -- 1 लाख 65 हजार 179 -- 9 लाख 92 हजार 656 -- 8 लाख 24 हजार 355 -- 83.05
2017 -- 1 लाख 76 हजार 761 -- 1 लाख 20 हजार 762 -- 8 लाख 37 हजार 229 -- 82.02
सीबीएसईचा प्रदेशनिहाय निकाल
प्रदेश -- टक्के
त्रिवेंद्रम -- 95.62 %
चेन्नई -- 92.60 %
दिल्ली -- 88.37 %
नव्वद टक्क्यांहून जास्त टक्के असलेले विद्यार्थी - 63 हजार 247
पंच्याण्णव टक्क्यांहून जास्त टक्के असलेले विद्यार्थी - 10 हजार 91
अपंग विद्यार्थ्यांचा निकाल - 86.69 टक्के
तब्बल 125 हून अधिक विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवले, तर 21 विद्यार्थ्यांना 95 टक्क्यांहून अधिक टक्के मिळाले.
अपंग विद्यार्थ्यांमध्ये त्रिवेंद्रमच्या अजय राज या विद्यार्थ्याने पहिला क्रमांक पटकावला. त्याला 490 गुण मिळाले. त्याखालोखाल केरळमधील पालघट लायन्स स्कूल पलक्कड शाळेतील लक्ष्मी पी व्हीला दुसरा क्रमांक, तर कृष्णगिरीतील नालंदा इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमधील दर्शना एम. व्ही. ला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या दोघांना अनुक्रमे 468 आणि 483 गुण मिळालेत.
निकालाबाबत अडचणी असल्यास -
विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी 1800118004 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.
मुलींचा टक्का वाढला
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली. यंदा (2017 साली) 87.50 एवढा आढळून आला. यंदा मुलींनी 9.5 टक्क्यांनी बाजी मारली. गेल्या वर्षी मुलींना 88.58, तर मुलांना 78.85 टक्के मिळाले.
|