शापूरजी पालनजी व एल अँड टीच्या निविदांची चौकशी
मुंबई - अरबी समुद्रातील जगविख्यात शिवस्मारकाच्या उभारणीत कंपन्यांनी निविदांमध्ये दिलेल्या वाढीव रकमेमुळे नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे या कंपन्यांनी दिलेल्या रकमा सरकारी अंदाजापेक्षा दीड ते दोनपट असल्याने फेरतपासणी सुरू झाली आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या स्मारकासाठी रिलायन्स, शापूरजी पालनजी व एल अँड टी या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. यापैकी रिलायन्सची निविदा तांत्रिक कारणामुळे रद्द झाली, तर शापूरजी पालनजी या जगविख्यात कंपनीने 4790 कोटी रुपयांची निविदा भरली. एल अँड टी कंपनीनेदेखील 3826 कोटी रुपयांची निविदा सादर केली; मात्र सरकारने या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 2600 कोटी रुपये इतकी किंमत निश्चित केली होती. सरकारची किंमत व कंपन्याची किंमत यामध्ये एवढी मोठी तफावत असल्याने त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही, अशी माहिती देतानाच या दोन्ही किमतीची फेरतपासणी सुरू करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे, असे मेटे यांनी स्पष्ट केले.
शिवस्मारकाचा आराखडा व अंदाजित प्रकल्प किंमत निश्चित करताना सरकारी यंत्रणनेने कोणत्या आधारे 2600 कोटी रुपये निश्चित केले, तर खासगी विकसक कंपन्यांनी एवढ्या मोठ्या रकमेचा अंदाज करत निविदा टाकताना कोणता आधार घेतला याबाबतची माहिती काढण्यात येत आहे. यामुळे अद्याप निविदा अंतिम करण्यात आलेली नसून तपासणीनंतर किंमत अधिक आहे असे निष्पन्न झाले, तर ई-टेंडरिंग करण्याशिवाय पर्याय नाही, असेही मेटे यांनी स्पष्ट केले.
सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या सुरवातीला शिवस्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
|