स्वाभिमानी किसान संघटनेची घोषणा; दसऱ्याच्या दिवशी इचलकरंजीत मेळावा
मुंबई - स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आज अखेर फूट करत बंडखोर नेते व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वत:ची नवीन "स्वाभिमानी किसान संघटना' स्थापन करण्याची घोषणा करत राजकारणात "सवतासुभा' मांडला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत या नव्या संघटनेची घोषणा केली. दसऱ्याच्या मुहूर्तावर इचलकरंजी येथे औपचारिकपणे या संघटनेचा पहिला मेळावा आयोजित करून स्थापनेचा नारळ फोडण्यात येणार आहे.
खासदार राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्यात असलेली चाळीस वर्षांची मैत्री आज अखेर राजकारणाच्या ईर्षेनं मोडीत निघाली. शेट्टी यांनी भाजपला असलेला पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज लगेचच सदाभाऊ यांनी स्वत:च्या नव्या पक्षाची घोषणा करताना राजू शेट्टी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. मी युतीचा मंत्री आहे.
शेट्टीदेखील युतीचेच खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी अगोदर खासदारकीचा राजीनामा द्यावा, त्यानंतर मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो, असे आव्हानही त्यांनी केले. मात्र शेट्टी स्वत:चे मत कायम करण्यासाठी टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत असे त्यांचे प्रामाणिक मत नाही. या सरकारने शेतकऱ्यांच्या सोबत संवाद ठेवला असून हा संवाद त्यांना नको असल्याचा आरोप खोत यांनी केला. अनेक वर्षे स्वाभिमानी शेतकरी चळवळीत काम करत असताना मला साधी शाबासकी तर दिलीच नाही पण सतत माझे पाय ओढण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोपही खोत यांनी केला.
'कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात संघर्ष केला. आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांवर लाठ्या गोळ्या घालत होते. तर भाजपचे सरकार संवाद साधत आहे. संघर्ष आणि संवाद यावरच नव्या संघटनेची भूमिका आधारित असेल.''
- सदाभाऊ खोत, राज्यमंत्री
|