मुंबई - ऐन दिवाळीमध्ये संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयानुसार संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी फक्त एक दिवसाचा पगार कपात करण्याचा किंवा संपकाळातील 4 दिवसांसाठी 8 दिवसांची रजा समर्पित केल्यास पगारकपात न करण्याचे ठरवले. मात्र, एसटी महामंडळाने गुरुवारी सायंकाळपर्यंत या संदर्भात परिपत्रकच न काढल्याने कर्मचाऱ्यांनी अद्याप अर्जित रजाच समर्पित केल्या नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातून 4 दिवसांचे वेतन कपात होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी 17 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत संप केला. यामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांचे 36 दिवसांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला. या महिन्यात 4 दिवसांचे वेतन कपात करून उर्वरित 32 दिवसांचे वेतन पुढील 6 महिन्यांत करण्याचे प्रशासनाने ठरवले होते. या निर्णयाला कर्मचारी संघटना न्यायालयात आव्हान देणार असल्याने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी अखेर संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी फक्त एक दिवसाचा पगार कपात करण्याचा किंवा संपकाळातील 4 दिवसांसाठी 8 दिवसांची रजा समर्पित केल्यास पगारकपात न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर महामंडळाने गुरुवारी सायंकाळपर्यंत याबाबतचे परिपत्रक काढलेले नाही.
कर्मचाऱ्यांनीही अर्जित रजाच महामंडळाकडे समर्पित केलेल्या नाहीत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील पगारातून कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांचा पगार 7 तारखेला होतो. यासाठीची तयारी प्रशासनाने सुरू केली असून, कर्मचाऱ्यांनी रजाच समर्पित केल्या नसल्याने कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्यातील 4 दिवसांचे वेतन कपात करण्यात येणार असल्याचे महामंडळातील अधिकाऱ्याने सांगितले.
|