मुंबईः मी निर्दोषच आहे.. मला माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी परमेश्वराने आयुष्य द्यावे, अशी भावना आज (सोमवार) माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपती निवडणूकीला मतदान करण्यासाठी छगन भुजबळ यांना परवानगी मिळाली होती.
मार्च 2016 ला अटक झाल्यानंतर आज पहिल्यांदाच भुजबळ विधान भवन आणि या परिसरात आले होते. 12.30 च्या सुमारास अँबुलन्स मधून पोलिसांच्या बंदोबस्तात भुजबळ विधानभवनात मतदानासाठी आले. अँबुलन्समधून बाहेर पडलेले भुजबळ काहीसे थकलेले वाटत होते. जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी आमदारांनी भुजबळांना गेट पासून धरूनच आत नेले. काहीवेळ सभापतीच्या दालनात बसल्या नंतर पंकज भुजबळ सह ते मतदान करायला सभागृहात आले. सभागृहात येताना त्यांच्या हातात असलेल्या मोबाईलबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. मात्र, त्यावर कुणी आक्षेप घेतला नाही. मतदान झाल्यावर पुन्हा सभापतीच्या दालनात बसलेल्या भुजबळांना भेटायला अनेकांची रिघ लागली होती. यामध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिवसेना आमदार अनिल परब होते.
पत्रकारांसोबत बोलत असताना भुजबळ यांनी माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नाही. या कंपन्यांमध्ये माझा शेअर अजिबात नाही, अस सांगत उदाहरणदाखल हेक्स वर्ल्ड बाबत न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्याचं सांगितले. मी थोडा वेळ जरी बाहेर मिळाला तर माझे निर्दोषत्व सिद्ध करेन, अस ते म्हणाले. मला कॅन्सर सोडून सर्व आजार झाले आहेत. रक्तदाब, शुगर... वगैरे. माझी देवाकडे एवढीच इच्छा आहे की, मला माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आयुष्य द्यावे, असे भुजबळांनी बोलून दाखवले.
दीड तासानंतर भुजबळ परत जायला निघाले त्यावेळीही राष्ट्रवादीचे अनेक नेते सोबत होते. या दीड तासात विधान भवनात ते मंत्री असताना, त्यांच्या सोबत काम केलेल्या अनेकांनी त्यांना नमस्कार करत काळजी घ्या म्हटले. भुजबळ हात जोडून सगळ्याना प्रतिसाद देत होते. दुपारी दोनच्या सुमारास अँबुलन्स मधून भुजबळ परत आर्थर रोडच्या दिशेने जात असताना बाहेर जमलेल्या त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, रमेश कदम देखील विधान भवनात मतदानासाठी आले होते. अडीच तास विधानभवनात असताना सभापती दालनातच अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. या वेळात कदम यांनी दुपारचं जेवणही विधानभवनात घेतले आणि 2 च्या सुमारास त्यांनाही पोलिसांनी परत तुरुंगात नेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.