#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'

sakal news esakal news competitive exam news series upsc mpsc IRNSS
sakal news esakal news competitive exam news series upsc mpsc IRNSS
Updated on

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने दि. 28 एप्रिल 2016 रोजी 'इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम' (आयआरएनएसएस - IRNSS) मालिकेतील सातवा उपग्रह श्रीहरिकोटा येथून यशस्वीरीत्या अवकाशात सोडला. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितीदर्शक यंत्रणा (जीपीएस - ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) पूर्णत्वास गेली आहे. या यंत्रणेचे नामकरण पंतप्रधान मोदी यांनी 'नाविक' असे केले आहे. 

  • इस्रोने आयआरएनएसएस 1जी (IRNSS-1G) या उपग्रहाचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक 'पीएसएलव्ही सी-33' (PSLV-C33) द्वारे दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. त्यानंतर सुमारे 20 मिनिटांनी उपग्रह त्याच्या कक्षेत स्थिर करण्यात आला. 
  • सात उपग्रहांच्या मालिकेतील हा शेवटचा उपग्रह होता. हा उपग्रह साधारणतः महिनाभराच्या कालावधीत पूर्णपणे कार्यान्वित होईल. 
  • सात उपग्रहांच्या मालिकेतील पहिला उपग्रह जुलै 2013 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. 
  • 'नाविक'च्या पूर्णत्वामुळे जगभरात स्वतःची 'जीपीएस' यंत्रणा विकसित करणारा भारत हा तिसरा देश ठरला. अमेरिकेशिवाय रशियाची ग्लोनास ही यंत्रणा कार्यान्वित आहे, तर युरोपियन महासंघही गेल्या तीन वर्षांपासून जीपीएस यंत्रणेसाठी प्रयत्नशील आहे. मात्र अद्याप युरोपियन महासंघाची यंत्रणा पूर्णत्वास गेलेली नाही. चीन व जपान या देशांच्या प्रादेशिक पातळीवरील स्थितिदर्शक प्रणाली कार्यान्वित आहे, त्यामुळे जागतिक पातळीवर संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करणारा भारत हा जगभरातील तिसरा देश ठरला आहे. 

अशी आहे यंत्रणा 

  • या यंत्रणेत पृथ्वीभोवती 36 हजार किमी उंचीवरून भ्रमण करणारे सात उपग्रह, भूभागावरील देखरेख आणि नियंत्रण करणारे नेटवर्क आणि लाभार्थींचा प्रत्येकी एक छोटा रिसिव्हर यांचा समावेश होतो. 
  • प्रत्येक उपग्रहाचे वजन सुमारे 1,400 किलो असून त्यावरचे सौर पॅनल 1400 वॅट ऊर्जा पुरवतील. यातील प्रत्येक उपग्रहासाठी 1,500 कोटी, प्रक्षेपकासाठी प्रत्येकी 130 कोटी आणि भूभागावरील यंत्रणेसाठी एकूण 300 कोटी रुपये खर्च आला आहे. 

अशी काम करते यंत्रणा 

  • 'जीपीएस'द्वारे आपल्या ठिकाणांची माहिती अक्षांश, रेखांश व समुद्रसपाटीपासूनची उंची या तीन मितीमध्ये समजते. 
  • उपग्रहाकडून आलेल्या रेडिओ संदेशांचे रिसिव्हरद्वारे विश्‍लेषण केले जाते आणि त्यानुसार ती व्यक्ती जमिनीपासून किती उंचीवर कोणत्या अक्षांश, रेखांशावर आहे हे ठरविले जाते. यासाठी किमान तीन उपग्रहांचे संदेश आवश्‍यक असतात. 
  • अवकाशातील उपग्रहांच्या कक्षांची मांडणी अशी असते की पृथ्वीवरील यंत्रणाव्याप्त प्रदेशाच्या कोणत्याही ठिकाणापासून कोणत्याही क्षणाला या प्रणालीतील चार उपग्रह दिसू शकतात. त्या ठिकाणच्या जीपीएस रिसिव्हरपासून त्या चार उपग्रहांचे अंतर वेगवेगळे असते. उपग्रहांचे स्वतःचे ठिकाण आणि अचूक वेळ ही माहिती आणि प्रकाशाचा वेग यांच्या योगे पृथ्वीवरील रिसिव्हर उपग्रहापासूनचे स्वतःचे अंतर याची गणना करतो. त्या अंतरातल्या फरकाचा उपयोग करून त्याच्यामध्ये असलेल्या संगणकाच्या साह्याने स्वतःच्या स्थानाबद्दल अचूक माहिती आणि वेळ प्राप्त होते. 

यंत्रणेची वैशिष्ट्ये 

  • एकूण सात उपग्रह कार्यान्वित. या उपग्रहांकडून मिळणारी माहिती स्मार्टफोनवर थेटपणे वापरता येणार 
  • 20 मीटर अंतरापर्यंतची अचूक माहिती मिळू शकणार 
  • व्याप्ती - भारताचा संपूर्ण भूभाग तसेच बाहेरील 15 किलोमीटरचा पल्ला 
  • अचूक वेळेसाठी प्रत्येक उपग्रहात आण्विक घड्याळ 
  • 12 महिने 24 तास अखंड सेवा मिळणार. उपयुक्त आयुष्य 12 वर्षे असणार 
  • शेजारी देशांनाही सेवा देणार 

मिळणाऱ्या सेवा 

  • स्थितीदर्शन 
  • मार्गनिरीक्षण 
  • मानचित्रण, नकाशे तयार करणे 
  • दळणवळण 
  • सर्वेक्षण 
  • विमाने, नौका यांना दिशादर्शनासाठी 
  • हायकर किंवा पर्यटकांना दिशा दर्शनासाठी 
  • लष्करी उपयोगासाठीच्या इक्रिप्टेड विशेष सेवा 
  • आपत्ती व्यवस्थापनासाठी 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.