दारूची झिंग अन् पाच जिवांची तडफड... (व्हिडिओ)

Ruinpada
Ruinpada
Updated on

राईनपाडा (धुळे) : भिंतीवर महापुरुषांची छायाचित्रे, रक्ताच्या चिळकांड्या, फरशीवर गोठलेले रक्त अन् त्याचा कुबट वास. मारहाण करून तुटलेल्या काठ्या, टेबल, कपाटं, पत्रे अन् बरच काही... हे चित्र आहे राईनपाडा (ता. साक्री) येथील ग्रामपंचायत कार्यालयामधील. दारूची झिंग चढलेले गावकरी अन् मारहाण करून रक्तातळेलेल्या पाच जीवांचा तडफडीचा व्हिडिओ पाहून मन सुन्न होऊन जाते.

राईनपाडा आणि परिसर हा आदिवासी पाड्यांचा भाग. गावची लोकसंख्या हजारच्या आसपास असून गावात अवघी 169 घरं. गेल्या काही दिवसांपासून या भागात मुले चोरणारी टोळी फिरत असल्याची अफवा होती. रविवारी (ता. 1) राईनपाडा येथे आठवड्याचा बाजार होता. हा बाजारही नुकताच सुरू झाला आहे. बाजारासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक गोंधळ सुरू झाला अन् मारहाण व किंचाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागल्याने सर्वजण ग्रामपंचायत कार्यालयाकडे पळाले, असे स्थानिक विक्रेता गुलाब पवार सांगतो. 

महापुरुषांची छायाचित्रे असलेल्या व न्याय देणाऱया ग्रामपंचायत कार्यालयामध्येच पाच जणांची तीक्ष्ण हत्याराने ठेचून हत्या केली गेली. या कार्यालयामध्ये रक्ताच्या चिळकांड्या व गोठलेले रक्त आठवडाभरानंतरही दिसून येते. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या काठ्या, पत्रे, लाकड सर्व काही रक्तानी माखलेले अद्यापही दिसत आहे. हत्या झालेल्या पाच जणांच्या फिरून-फिरून झिजलेल्या चपला इतरत्र विस्तरलेल्या व रक्ताने भिजलेल्या पाहून मन सुन्न होऊन जाते. हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत असून, पाच जिवांनी विनवणी करण्यासाठी जोडलेले हात... रक्ताळलेले देह व मारहाणीनंतर किंचाळण्याचा आवाज असह्य करणारा आहे.

गावात हत्यासत्र घडल्यानंतर संपूर्ण गाव रिकामे झाले आहे. घरांना कुलुपे दिसतात. गावभर जणू अघोषित संचारबंदीचे वातावरण आहे. बकऱ्या, कोंबड्यांव्यतिरिक्त गल्लीत चितपाखरूही दिसून येत नाही. गावात बोटावर मोजण्याइतपत व जागेवरून हलताही न येणारे वयोवृद्धच फक्त दिसतात. त्यांच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, घटनास्थळी असलेले पोलिस या वृद्धांना आपल्या डब्यातील दोन घास देताना दिसतात. एक टपरीसमोर पंक्चरसाठी ठेवलेली दुचाकी आहे त्या अवस्थेत दिसून येते. आदिवासी भागात असलेल्या राईनपाडा गावाचे नाव विचारल्यानंतर बाजूला निघून जातात एवढी भिती परिसरात पहायला मिळते.

आदिवासी दारूची झिंग...
गावाचा बाजार असल्यामुळे परिसरातून विक्रेते व खरेदी करण्यासाठी नागरिक आले होते. वस्तूंची विक्री झाल्यानंतर व हातात पैसा आल्यानंतर काहींनी आदिवासींनी अति झिंग येणाऱया दारूचे सेवन केले होते. परिसरात अगोदरच अफवा अन् दारूची झिंगेत टर्र झालेल्यांनी भिक्षा मागण्यासाठी आलेल्या सात पैकी पाच जणांना पकडले अन् अक्षरशः ठेचून मारले. दोघे जण जीवाच्या आकांताने पळाल्यामुळे वाचले गेले.

पाकिस्तानमधील व्हिडिओ परिसरात व्हायरल...
अफवेचा व्हिडिओ मुळात पाकिस्‍तानमधील आहे. मुलांच्‍या अपहरणाविषयी पालकांमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍यासाठी 'रोशनी' नावाच्‍या संस्‍थेने या व्हिडिओची निर्मिती केली होती. परंतु, त्‍याचा अर्धाच भाग भारतात व्‍हायरल होत आहे. शिवाय, परिसरातील एका कथित यू ट्यूब चॅनलने घटनेपूर्वी मुले पळवणाऱ्यांबद्दल वृत्त दिले होते. व्हिडिओ खरा असल्याचे समजून नागरिकांमध्ये भीती पसरली. जमावाने केवळ संशयावरून भिक्षा मागून गुजरान करणाऱया पाच जणांची निर्घृण हत्‍या केली.

आठवडा बाजार अन् एसटी...
गावात एसटी येत असून त्या एसटीचा शेवटचा थांबा हा राईनपाडा आहे. या एसटीने नाथपंथीय डवरी समाजातील हे भिक्षेकरी सकाळी गावात उतरले होते. दुपारपर्यंत भिक्षा मागून दुपारच्या एसटीने ते परतणार होते. त्यांच्याकडे पोलिस परवानगी, आधारकार्ड व स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेतल्याची कागदपत्रे होती. परंतु, यावर कोणीही विश्वास न ठेवता त्यांना ठेचून मारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.