चौथ्या प्रयत्नात मिळविले हवे ते पद!
सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. आई-वडील दोघेही शिक्षक. लहानपणापासूनच शिक्षणात हुशार. अधिकारी होण्याचा महाविद्यालयीन जीवनात आलेला विचार. जिद्द, चिकाटी अन् कठोर मेहनतीच्या जोरावर केलेली स्वप्नपूर्ती. ही कहाणी आहे नाशिकच्या भूषण अहिरे यांची. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत थेट राज्यात अव्वल क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारीपदाला गवसणी घातली आहे. उपजिल्हाधिकारीपदाच्या खुर्चीवरून कामकाज पाहताना शासनाच्या योजना जनसामान्यांपर्यंत पोचवत प्रशासन अन् प्रजा यांच्यातील दरी कमी करण्याचा मानस भूषण अहिरे यांनी व्यक्त केलाय. यशाचा धडाका इथवर न थांबू देता, शासकीय नोकरी करतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देत आयएएस होण्याचा ध्यास असल्याचेही त्यांनी सांगितले.
मूळचे गोराणे (ता. बागलाण) येथील भूषण अहिरे शेतकरी कुटुंबातील असून, आजही त्यांची गावाकडे शेती आहे. वडील अशोक व आई सुनीता अहिरे दोन्ही जिल्हा परिषद शाळेतून ज्ञानदानाचे काम करत असताना एकुलत्या भूषणलाही लहानपणापासून चांगले संस्कार दिले. अगदी शालेय जीवनापासूनच हुशार असलेल्या भूषण अहिरे यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण भगूर येथील नूतन विद्यामंदिर येथून पूर्ण केले. दहावीत 82 टक्के गुण मिळवत मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयात विज्ञान शाखेतून प्रवेश घेतला. अभ्यासात सातत्य ठेवत बारावीला विज्ञान शाखेतून 78 टक्के गुण मिळवत अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. पदवी अभ्यासक्रमासाठी मेट भुजबळ नॉलेज सिटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय निवडत 61 टक्के गुणांनी बी.ई. ही अभियांत्रिकी पदवी मिळविली. चांगले गुण असल्याने कॅम्पस ड्राइव्हमध्ये नामांकित कॉर्पोरेट कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजची नोकरी अगदी सहज मिळू शकली असती. पण अंतिम वर्षात असताना शासकीय अधिकाऱ्यांविषयी वाटलेल्या आकर्षणापोटी आपणही अधिकारी व्हायचे, असा विचार भूषण अहिरे यांच्या मनात आला. हा विचार पदवी शिक्षण होईपर्यंत दृढ संकल्पात रूपांतरित झाल्याने नोकरीचा मार्ग निवडण्यापेक्षा स्पर्धा परीक्षांचीच तयारी करायची असे भूषण अहिरे यांनी ठरविले.
डीवायएसपीपद हुकले एका गुणाने, थेट अव्वल क्रमांकाने काढली कसर
2012 पासून स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरवात केली. अधिकारी व्हायचंच आहे, असा पक्का निर्धार असल्याने घरापासून लांब राहून अभ्यास करायचे ठरविले. त्यासाठी पुणे गाठले. युनिक ऍकॅडमीमध्ये मनोहर घोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तयारीला सुरवात केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पहिल्या प्रयत्नात अपेक्षित यश मिळू शकले नाही. दुसऱ्या प्रयत्नात यश आले, पण अवघ्या एक गुणाने डीवायएसपी हे पद हुकले. द्वितीय श्रेणीचे मंत्रालयात डेस्क ऑफिसर हे पद मिळाले. पण त्यावर समाधानी नसल्याने एक वर्षाचे एक्स्टेंशन घेत, पुन्हा एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय भूषण अहिरे यांनी घेतला. मिळालेली नोकरी करावी असा कुटुंबीयांचा आग्रह असल्याने दडपण आलेले होते. पण मार्गदर्शकांच्या सांगण्यावरून प्रयत्न करण्याचा निर्धार केला. तिसऱ्या प्रयत्नात फार काही हाती लागू शकले नाही; परंतु चौथ्यांदा दिलेल्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. त्यात भूषण अहिरे यांनी थेट राज्यात अव्वल क्रमांक मिळवत मागील प्रयत्नातील अपयशाची कसर भरून काढली.
योग्य नियोजन, पुस्तकांची निवड अन् ध्येयात स्पष्टता महत्त्वाची
स्पर्धा परीक्षांच्या तयारीविषयी भूषण अहिरे म्हणाले, की तयारी करताना तीन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरवात करण्यापूर्वी योग्य नियोजन असणे महत्त्वाचे ठरते. नियोजनानुसार तयारी होते की नाही, याचाही आढावा घ्यायला हवा. किती वाचता, यापेक्षा काय वाचता हे महत्त्वाचे असल्याने पुस्तकांची निवडदेखील महत्त्वाची ठरते. चांगल्या मार्गावर चालल्यास यश मिळू शकते, हे लक्षात घेऊन ध्येयातही स्पष्टता असणे महत्त्वाचे असते.
शेतीत काम करण्यापासून तर नियमित ट्रेकिंगचा जोपासला छंद
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना आठवड्यातील एक दिवस सक्तीने स्वत:साठी राखून ठेवायचो. पुणे परिसरातील अनेक ठिकाणे हिंडून झाली. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश सर्वच ट्रेकिंगची ठिकाणे फिरून झाली. कितीही व्यस्त असलो तरी ट्रेकिंगचा आनंद घ्यायचो. यामुळे व्यायाम होत असल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. यातून अभ्यासात एकाग्रता मिळते, असे भूषण अहिरे सांगतात. शेतकरी कुटुंबातील असल्याने श्री. अहिरे यांनी आजही शेतीशी आपली नाळ जोडून ठेवलेली आहे. महिना-दीड महिन्यात आपल्या काकांकडे शेतीत जाऊन तेथेही रमायला आवडत असल्याचे ते सांगतात.
युवकांना भूषण अहिरे यांचा यशाचा मूलमंत्र
स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची अनेकांमध्ये क्षमता असते; परंतु युवकांना जडलेले व्यसन त्यांना ध्येयापासून लांब नेते. म्हणून युवकांनी व्यसनांपासून दूर राहायला हवे. यातून त्यांना ध्येयपूर्तीसाठी मदत होईल. अभ्यास चांगला व्हावा, यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे असते. त्यामुळे अभ्यासाच्या व्यस्ततेत स्वत:साठी वेळ काढावा. आपला कुठलाही छंद असेल, तो जोपासावा. व्यायाम करावा. यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल व अभ्यासात मन लागेल. आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची आहे, असा विचार न करता स्पर्धा परीक्षा देताना आपल्याला पहिल्या दहामध्ये उत्तीर्ण व्हायचे आहे, असे ध्येय बाळगावे. यामुळे सकारात्मकता निर्माण होते व त्याचा फायदा आपल्यालाच होतो, असे श्री. अहिरे युवकांना सांगतात. अधिकारी होण्यात यशस्वी झाल्यास ज्या समाजातून आपण आलेलो आहोत, त्याची जाणीव ठेवावी. दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
प्रशासन व प्रजा यांच्यातील दरी कमी करण्यास सज्ज
उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना प्रशासन आणि जनता यांच्यात समन्वय साधायचाय. शासनाच्या भरपूर योजना समाजातील विविध घटकांसाठी फायदेशीर आहेत. या योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोचवायच्या आहेत. प्रशासन व प्रजा यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भूषण अहिरे यांनी सांगितले. सुसंवादातून अधिकारीपदावरून सामाजिक प्रश्न सोडविण्यावर भर असेल, असे ते म्हणाले. तसेच अधिकारीपदावर काम करत असताना पुढील ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय लोकसेवा आयोगा (यूपीएससी)च्या तयारीला लागणार असल्याने आयएएस अधिकारी होण्याचे पुढील ध्येय असल्याचे भूषण अहिरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.