औरंगाबादमध्ये विसर्जनाच्या दिवशी करणार सुरक्षा
औरंगाबाद - नागरिक-पोलिस सहभागाची अभिनव संकल्पना औरंगाबाद शहर पोलिसांकडून प्रत्यक्षात साकारली जात आहे.
नागरिकांतूनच निवडलेले एक हजार विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) गणेश विसर्जनाच्या दिवशी रस्त्यावर उतरणार आहेत. हातात काठी, शिट्टी व रिफ्लेक्टर जॅकेट घालून ते पोलिसांच्या बरोबरीने बंदोबस्तावर राहणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यात मोठी मदत मिळणार आहे.
पोलिस व नागरिक यांच्यात समन्वय साधण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी ही नवी योजना आखली आहे. पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम साकार झाला आहे. शांतता, सौहार्दतेशिवाय सुरक्षेसाठी "एसपीओ' नेमले आले. या पदासाठी दोन महिन्यांपूर्वी अर्ज मागविले होते. सुमारे वीस हजार नागरिकांनी अर्ज केले होते. त्यात चारित्र्यशील, गुन्हे नोंद नसलेले, तसेच सामाजिक भान राखणाऱ्या एक हजार जणांची निवड पोलिस आयुक्त यादव यांनी केली. हा उपक्रमाचा पहिला टप्पा असून, यानंतरही अशाच नागरिकांची निवड केली जाणार आहे. गणेश विसर्जनावेळी व त्यानंतरही "एसपीओ' शहराची सुरक्षा व पोलिसांना मदत करणार आहेत. नागरिकांना एकप्रकारे पोलिस प्रशासनाने अधिकारच दिले असून, पोलिस दल व त्यांच्या कार्यपद्धतीचा परिचयही होणार आहे.
|