मुंबई - भाजप सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त होत असतानाच सत्तेतील भागीदार शिवसेना यापासून दूर आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुखांची बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. भाजपने केलेल्या गैरव्यवहारांची माहिती गावोगावी पोहचवण्याचे आदेश ठाकरे यांनी या वेळी दिले. या वेळी पदाधिकाऱ्यांना एक पुस्तिकाही देण्यात आली.
पक्षबांधणीवर भर देण्याचे आदेशही ठाकरे यांनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिले. पदाची गुर्मी बाजूला ठेवून स्वत:च्या कुटुंबाप्रमाणे कार्यकर्त्याला जपा. बूथ स्तरापर्यंत गावागावात पक्षाची बांधणी करा. कोणत्याही निवडणुका कधीही येतील. त्यासाठी तयारीला लागा, असे आदेश त्यांनी दिले. भाजपच्या गैरव्यवहारांविषयीची ही पुस्तिका घेऊन गावागावात आतापासूनच प्रचार सुरू करा, असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला शिवसेनेने विरोध केला आहे. त्यांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाल्यास शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक आणि पुस्तिका महत्त्वाची ठरते. काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या शहरी भागातील आमदारांनी सत्तेतून बाहेर पडण्यास संमती दर्शवली होती. ग्रामीण भागातील आमदारांनी आताच्या परिस्थितीत निवडणुका लढवणे अवघड असल्याचे ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले होती. त्यानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची चर्चा मागे पडली. आता ठाकरे यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
काय आहे पुस्तिकेत?
मंत्र्यांच्या कथित गैरव्यवहारांची माहिती या पुस्तिकेत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जमीन प्रकरण, विनोद तावडे यांची अग्निशमन यंत्रणा खरेदी, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची चिक्की खरेदी, खासदार दिलीप गांधी यांचे कर्जतारण आणि सोने गैरव्यवहार आदींचा उल्लेख प्रामुख्याने यात आहे.
|