टेम्पो भरून चला पिक्‍चरला...!

टेम्पो भरून चला पिक्‍चरला...!
Updated on

कोल्हापूर - सुधाकर जोशी नगर परिसर म्हणजे श्रमगंगेला प्रसन्न करीत मोलमजुरी करणाऱ्यांची दाटीवाटीची वस्ती... ही दाटीवाटी इतकी की परिसरात गेल्यानंतर कुठून आलो आणि कुठे जायचे हे नवख्या माणसाला कळणारही नाही. संवेदनशील भाग म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर असणारा हा परिसर, मात्र याच झोपडपट्टीतील तरुणाईने आता एक अनोखा उपक्रम सुरू केला असून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी इथले तरुण वर्गणी काढतात आणि टेम्पोमध्ये परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन शाहू स्मारक भवन गाठतात. महिन्याला या मुलांना या निमित्ताने एक चांगला बालचित्रपट बघण्याची संधी मिळते. 

येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे महिन्यातून एकदा शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही शुल्काशिवाय एक जागतिक सिनेमा शाहू स्मारक भवनात दाखवला जातो. गेली कैक वर्षे हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. याच चळवळीचा एक भाग म्हणून दोन वर्षे महापालिका शाळा आणि झोपडपट्टीतील मुलांसाठी खास फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन झाले. प्रत्येक महिन्याच्या उपक्रमात सजग पालक त्यांची मुले घेऊन आवर्जुन येतात, मात्र असे चित्रपट सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांनीही पाहिले पाहिजेत आणि त्यावर त्यांनी मनमोकळा संवाद साधला पाहिजे, हा त्यामागील हेतू होता. फिल्म फेस्टिव्हलपुरता हा उद्देश साध्यही झाला, मात्र प्रत्येक महिन्याच्या उपक्रमात पुन्हा अशा विद्यार्थ्यांची कमतरता जाणवू लागली. या पार्श्‍वभूमीवर चंद्रशेखर तुदीगाल, ओंकार कांबळे, महेश शिंगे, विठ्ठल लगळी, अनिकेत कांबळे या तरुणांनी वर्गणी काढून आपल्या परिसरातील  मुलांना हे चित्रपट दाखवायचा संकल्प केला. सुरवातीला त्यांनाही काही जणांनी वेड्यात काढले. एक-दोन वेळा करतील आणि नंतर आपणहून गप्प बसतील, अशी खिल्ली उडवली गेली. मात्र त्यातूनच त्यांची हिंमत आणखी वाढली. मित्राचाच एक टेम्पो त्यांनी कायमस्वरूपी ठरवून टाकला. त्याचे माफक भाडे ठरवून ते स्वतः वर्गणी काढून देण्याचे ठरले. उपक्रम सुरू झाला आणि एका टेम्पोतून तीस ते पस्तीस मुलांना घेऊन ही मंडळी चित्रपट पाहण्यासाठी घेऊन येऊ लागली. 

चळवळीचा भाग बनले विद्यार्थी
आता हे सारे विद्यार्थी या चळवळीचा भाग बनून गेले असून ते आल्याशिवाय चित्रपटच सुरू होत नाही. ही मुले चित्रपटाला येतात. त्यानंतरच्या चर्चेत सहभागी होतात आणि पुढच्या महिन्यात कोणता चित्रपट दाखवणार, असेही आवर्जुन विचारतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.