नगर - जवखेडे हत्याकांडातील मृताचे कपडे घरामागे जाळले आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे एका विहिरीत धुतल्याचे दोन्ही आरोपींनी पंचनाम्यात सांगितल्याचे पंच साक्षीदाराने आज न्यायालयात सांगितले.
जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्रकाश माळी यांच्यासमोर सुरू आहे. खटल्यात आज सरकारी पंच साक्षीदार तलाठी भास्कर मोरे यांची सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण झाली. विशेष सरकारी वकील ऍड. उमेशचंद्र यादव घेतलेल्या सरतपासणीत भास्कर मोरे यांनी सांगितले, 'आरोपी अशोक जाधवने मृताचे कपडे उकिरड्यावर जाळल्याचे सांगितले. आरोपींसह पोलिस पथकाने 16 डिसेंबर रोजी सकाळी जवखेडे येथे ते ठिकाण पाहिले. तेथे फावड्याने खोदले असता, जळालेले राखमिश्रित कपडे आढळून आले. त्यात मृत सुनील जाधवच्या टी-शर्टचा तुकडा सापडला. तो "सील'बंद करून न्यायवैद्यकीय चाचणीसाठी पाठविला.''
नंतर आरोपी प्रशांत जाधव याने पोलिस पथकासमोर जवखेडे येथील विहिरीत हत्यारे धुतल्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मृत संजय जाधव यांच्या शेताजवळ सिम कार्ड आणि मोबाईलची बॅटरी टाकल्याचे त्याने सांगितले; मात्र या वस्तू तेथे सापडल्या नाही. नंतर प्रशांत जाधवने मृत सुनीलचा मोबाईल मृतांच्या चितेवर कसा टाकला, याचे प्रात्यक्षिक दाखविले.'' पंच साक्षीदाराने संपूर्ण घटनाक्रम आज न्यायालयात उभा केला.
आरोपीचे वकील ऍड. सुनील मगरे यांनी उलटतपासणी घेतली. पंचनाम्यासाठी पोलिसांचे लेखी आदेश होते का? पोलिसदफ्तरी नोंदी घेतल्या का? तलाठी असल्याने जवखेडे गावाच्या नकाशाची माहिती होती का, असे प्रश्न विचारले. दोन दिवस खटल्याचे कामकाज चालले. पुढील सुनावणी 22 व 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
|