झेडपी निवडणुकीतही भाजप-ताराराणी युती 

ZP-Kolhapur
ZP-Kolhapur
Updated on

कोल्हापूर - कोल्हापूर महापालिका, विधान परिषद व नगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पाक्षाची माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा छुपा पाठिंबा असलेल्या ताराराणी आघाडीशी युती जिल्हा परिषद निवडणुकीतही कायम राहणार आहे. या दोघांच्या जोडीला स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य शक्ती यांचीही ताकद असणार आहे. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादीसमोरही या आघाडीचे आव्हान असणार आहे. 

कॉंग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात पक्षांतर्गत मतभेदामुळे पक्ष खिळखिळा झाला आहे. त्याचा फटका विधानसभेत बसला; पण त्यातूनही नेतृत्त्व शहाणे झाले नसल्याचा अनुभव महापालिका, विधान परिषद व नुकत्या झालेल्या नगरपालिका निवडणुकीत आला. एकमेकांचा काटा काढण्याच्या नादात पक्ष संपत आला; पण नेते मात्र अजून हवेतच असल्यासारखी स्थिती आहे. राज्यात व केंद्रातही कॉंग्रेस विरोधी बाकावर असतानाही जिल्ह्यात मात्र कॉंग्रेसमध्येच पक्षाबरोबर कोण आणि विरोधक कोण? हे समजत नाही, अशी स्थिती आहे. 

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ताराराराणी आघाडीने भाजपबरोबर संधान साधले. या आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र स्वरूप महाडिक आहेत, त्यांचे दुसरे पुत्र अमल हे भाजपचे आमदार आहेत. त्यातून ही आघाडी आकाराला आली. विधान परिषद निवडणुकीतही ही आघाडी नुसती कायम राहिली नाही, तर कॉंग्रेसचे उमेदवार आमदार सतेज पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्यात यशस्वी झाली. गेल्या आठवड्यात याच आघाडीने नगरपालिका निवडणुकीतही घवघवीत यश मिळवत दोन्ही कॉंग्रेसला जबर धक्का दिला. हीच परंपरा कायम राखण्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकीतही ही आघाडी कायम राहणार आहे. 
श्री. महाडिक यांची "गोकुळ'वर एकहाती सत्ता आहे. "गोकुळ' म्हणजे जिल्ह्यातील प्रमुख अर्थिक सत्ताकेंद्र, त्यातून प्रत्येक तालुक्‍यात महाडिक यांची कमी-अधिक प्रमाणात ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर ते कोणाला निवडून आणू शकत नसले, तरी पराभूत मात्र नक्की करू शकतात, हे यापूर्वीही अनेकदा सिद्ध झाले आहे. कागलच्या "शाहू' कारखान्याचे समरजितसिंह घाटगे भाजपमध्ये आले आहेत, याच तालुक्‍यातील प्रा. संजय मंडलिक हे पूर्वी कॉंग्रेसच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत आलेले आता शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे या तालुक्‍यात कॉंग्रेसला वाली नाही. 

"गोकुळ'च्या राजकारणामुळे शाहूवाडीतील आमदार सत्यजित पाटील, भुदरगडमधील माजी आमदार बजरंग देसाई व त्यांचा गट, करवीरमधील "गोकुळ'चे संचालक, राधानगरीतील अरुण डोंगळे व त्यांना मानणारा गट अशा काही मातब्बर मंडळींच्या दृष्टीने माजी आमदार महाडिक यांचा "शब्द' प्रमाण असणार आहे. या एकत्रित ताकदीला पन्हाळ्यातून माजी मंत्री विनय कोरे यांच्या "जनसुराज्य'चे बळ मिळणार आहे. शिरोळमधून "स्वाभिमानी'ची रसदही याच आघाडीच्या पारड्यात पडणार आहे. हातकणंगलेचे कॉंग्रेस नेते जयवंतराव आवळे नगरपालिकेच्या निवडणुकीत श्री. महाडिक यांच्यासोबत होते. ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय करणार? हाही महत्त्वाचा प्रश्‍न आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व श्री. महाडिक यांची जिवलग मैत्री असली तरी श्री. पाटील पक्षाच्या विरोधात कदापिही भूमिका घेणार नाहीत, हे स्पष्ट आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भाजप-ताराराणीसह मित्रपक्षांची सूत्रे जमली तर मात्र दोन्ही कॉंग्रेससमोर हे मोठे आव्हान असणार आहे. 

तीन तालुके प्रभावी 
करवीर व हातकणंगले तालुक्‍यांत जिल्हा परिषदेचे प्रत्येकी 11 गट आहेत, शिरोळमध्ये 8 गट आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण 67 जागांपैकी 30 जागा या तीन तालुक्‍यांत आहेत. करवीरमध्ये सद्यस्थितीत कॉंग्रेसचे वर्चस्व आहे; पण पक्षाला अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. हातकणंगलेत आवाडे-आवळे यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, तर शिरोळमध्ये "स्वाभिमानी'चा दबदबा आहे. त्यामुळे या निवडणुकीत या तीन तालुक्‍यांतून कोण जादा जागा जिंकणार तोच जिल्हा परिषदेच्या सत्तेचा मानकरी असेल एवढे निश्‍चित. 

दादांची भूमिका काय 
नगरपालिका निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी कोणीही सोबत आला तर त्याला घेण्याची भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली. पक्षाच्या चिन्हाचा आग्रह न धरता त्यांनी केलेल्या या जोडण्या फारच यशस्वी ठरल्या. जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठीही ते हीच भूमिका घेतील, असे सध्याचे चित्र आहे. त्यात ते यशस्वी किती होतील हे निकालानंतरच स्पष्ट होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.