थर्टी फर्स्टसाठी पर्यटकांची लोणावळ्याला पसंती

थर्टी फर्स्टसाठी पर्यटकांची लोणावळ्याला पसंती

लोणावळा - सरत्या वर्षातील कोरोना महामारीच्या कटू आठवणी विसरत नव्या वर्षाच्या स्वागतास मावळवासीय सज्ज झाले आहेत. नाताळ आणि थर्टीफर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर मावळात वीकेंडला पर्यटकांची गर्दी होण्याची शक्‍यता आहे. पुणे आणि मुंबई महापालिका हद्दीत रात्री संचारबंदी लागू असल्याने या शहरांतील पर्यटकांनी थर्टीफर्स्टला लोणावळा-खंडाळ्याला पसंती दिली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगून पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोणावळा-खंडाळा आकर्षण
लोणावळा व खंडाळा ही ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रे राहिली आहे. पवन मावळ, अंदर मावळ, नाणे मावळातील अपरिचित स्थळांकडेही पर्यटकांची पावले वळत आहेत. पवना, भुशी, तुंगार्ली, शिरवता, उकसाण आदी धरणक्षेत्र, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगड, कार्ला, भाजे, बेडसे लेणी, समुहांसह, मंदिरे, लोणावळ्यातील विशेषतः लायन्स पॉइंट, खंडाळा येथील सनसेट पॉइंट येथे पर्यटकांची पसंती मिळत आहे. 

हॉटेल्स, रिसॉर्टस्‌ ‘हाउसफुल्ल’
नववर्षाच्या पूर्वसंध्येसाठी पर्यटकांची पसंती मिळत असल्याने लोणावळा-खंडाळ्यासह परिसरातील हॉटेल्स, रिसॉर्ट, अनेक सेकंडहोम हाउसफुल्ल झाले आहेत. अनेक रिसॉर्टमध्ये दरवर्षी संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. कोरोनाच्या संकटानंतरही मावळात पर्यटकांची गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान कायम असताना येथील काही हॉटेलांमध्ये खास व्यवस्था करण्यात आल्याचे हॉटेल व्यावसायिक अतुल जोशी यांनी सांगितले. एमटीडीसीचे नाताळ तसेच ३१ डिसेंबरपर्यंतचे शंभर टक्के बुकिंग झाले असल्याची माहिती व्यवस्थापक महादेव हिरवे यांनी दिली. पर्यटकांच्या स्वागतासाठीच्या कार्यक्रमांना मात्र कात्री लावल्याचे त्यांनी सांगितले.

उल्लंघन केल्यास कारवाई
कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असून, गर्दीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिले. पवना धरण परिसर, लायन्स पॉइंट येथे अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या, वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लायन्स पॉइंट सातनंतर बंद
पर्यटनस्थळांवर कोरोनाबाबतच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. लायन्स पॉइंट येथे पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होत असते. त्यामुळे लायन्स पॉइंट सायंकाळी सातनंतर बंद करण्यात येणार असल्याची माहिती वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले यांनी दिली. 

‘दक्षता घ्यावी’
‘‘कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पर्यटकांबरोबर स्थानिक नागरिक, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक तसेच कर्मचाऱ्यांनी खबरदारी घ्यावी,’’ अशा सूचना नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी दिल्या.

पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत नागरिकांना रात्री संचारबंदी करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणच्या हद्दीत अद्याप आदेश प्राप्त झाले नसून, गर्दी टाळण्याचे सरकारचे आदेश आहेत. लोणावळा शहरातही चेक पॉइंट उभे करण्यात येणार आहेत.
- संदीप घोरपडे, पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com