Ganesh Festival : ढोल-ताशा वादनाचा अनोखा प्रवास

Dhol-Tasha
Dhol-Tasha
Updated on

पुरातन काळाशी नाते सांगणाऱ्या ढोल-ताशा, शंख-झांजा आणि ध्वजाशी घट्ट नाळ असणाऱ्या ढोल-ताशा पथकांनी आपल्या वादनातून एका अर्थाने आपली सांस्कृतिक ओळख निर्माण केली आहे. अशा पथकांचे श्री गणेशापुढील लयबद्ध-तालबद्ध वादन ऐकणे ही जणू पर्वणीच. १८९४ मध्ये निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत १२० गणपती होते. लेझीम, घुंगरू, चौघडे अशा मंगलमय सूरांमध्ये गणपतींचे विसर्जन झाले. १९०९ च्या मिरवणुकीत मेळ्यांचा सहभाग हे मोठे आकर्षण होते. मेळ्यांची पदे ऐकण्यात आणि कवायत पाहण्यास मिरवणूक मार्गात गर्दी होत असे. बरीच वर्षे बंद पडलेली लेझीम खेळण्याची प्रथाही १९०९ मध्ये सुरू झाली. 

ब्रिटिश राजवटीच्या काळात विजयादशमी, शिवजयंती आणि गणेशोत्सवात वाद्ये वाजविण्याची परवानगी डॉ. एम. बी. वेलकर यांनी १९१६ मध्ये मिळवली. मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी दिलेली ही परवानगी हे लोकमान्यांनी केलेल्या प्रयत्नांचे फलित होते. पुढे काळाच्या ओघात उत्सवाचे महत्त्वाचे अंग असलेले मेळे बंद झाले. वाद्ये मात्र राहिली.

गणपतीपुढे ढोल-लेझीमच्या ताफ्यांमुळे मिरवणुकीचा वेग मंदावला असे १९६४ च्या वर्तमानपत्रांत वाचायला मिळते. १९६५ च्या उत्सवाला युद्ध आणि दंगलींनी ग्रासले होते. त्या वर्षी मात्र मिरवणुकीत ढोल-लेझीमला बंदी होती.

याच काळात पुण्याच्या आसपासच्या मावळ-मुळशी भागांतील तरुणांनी स्थापन केलेली ग्रामीण ढोल-ताशा-झांज पथके गणेशभक्तांना आकर्षित करायला लागली होती. नेमक्‍या याच काळात उत्सवात अनिष्ट प्रथांचाही शिरकाव होऊ लागला.  या नव्या प्रथांनी अस्वस्थ होऊन ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कै. अप्पासाहेब पेंडसे यांनी कोंढणपूरच्या गुलाबराव कांबळे या ताशावादकाला जत्रे-यात्रेत हेरले. अशा कसबी कलाकाराला बरोबर घेऊन त्याला शिस्तबद्ध शालेय पथकांची जोड दिल्यास मिरवणुका ताल-सुरांत तर रंगतीलच, पण त्याला शिस्तबद्ध अनुशासनाचीही जोड मिळेल, याची पेंडसे यांना खात्री होती आणि यातूनच १९६५ च्या सुमारास ज्ञानप्रबोधिनीच्या ‘बर्ची-भाला-ध्वज’ पथकांचा प्रारंभ झाला आणि त्यांचे शिस्तबद्ध संचलन विविध मानांच्या गणपतींसमोर सुरू झाले. हीच खऱ्या अर्थाने शहरी ढोल-ताशा-पथकांची सुरवात होती. त्याचे अनुकरण स्व-रूपवर्धिनी, विमलाबाई गरवारे प्रशाला, नूमवि, रमणबाग अशांसारख्या शाळांनी केले. पण, अर्थातच याची मुहूर्तमेढ रोवली होती ती मुळशी-मावळातील ग्रामीण पथकांनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.