पिंपरी - इंडो सायकलिस्ट क्लब (आयसीसी)तर्फे आयोजित यंदाच्या तिसऱ्या ‘पुणे-पंढरपूर-पुणे’ सायकलवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे सव्वादोनशे सायकलपटूंनी दोन दिवसांत ४७० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. तसेच, विठ्ठलाचे मनोभावे दर्शनही घेतले.
श्री क्षेत्र देहू येथून पहाटे चार वाजता सायकलवारीला सुरवात झाली. जोरदार पाऊस असूनही कोणाचाही उत्साह कमी झाला नव्हता. उलट, मस्त पावसात भिजत मगरपट्टा पुलाखाली सर्व सायकलपटू शनिवारी एकत्र झाले. सर्वांच्या गाठीभेटी आणि ओळखी करून पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
सोलापूर महामार्गावरून मगरपट्टा चौक ते चौफुल्यापर्यंत ५० किलोमीटर न थांबता सर्व सायकलपटू गेले. तिथे हॉटेलमध्ये सगळ्यांनी चहा व वडापाववर ताव मारला आणि पुढे प्रवास सुरू केला. पुणे सायकल प्रतिष्ठानचे जुगल राठी यांनी तिथपर्यंत येऊन पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. पंढरपूरची ओढ लागल्याने कुठेही थकवा जाणवत नव्हता. ऊन-सावलीचा खेळ सारखं पाणी पिण्यास भाग पडत होता. भिगवण, इंदापूर मार्गे पुढे टेंभुर्णीच्या दिशेने पंढरपूरकडे शेवटचा प्रवास सुरू झाला. मधला थोडासा टप्पा खराबच होता.
पण, न थांबता सायकलस्वार पुढे निघाले. पंढरपूर फक्त ३० किलोमीटरवर होते. परंतु, रस्ता संपत नव्हता. संध्याकाळी सर्वांनी सायकलींचे दिवे सुरू केले होते आणि पायडल मारत होते. शेवटी पायडल मारता मारता सर्व पंढरपूरला पोचले आणि पुणे-पंढरपूर असा एक प्रवास पूर्ण झाला. पंढरपूर देवस्थान समितीतर्फे सायकलपटूंचा सत्कार करण्यात आला. अनेक जणांचे स्वप्न पूर्ण झाल्याने खुशीत होते. परंतु, काही जणांचे ४७० किलोमीटरच्या अंतराचे ध्येय असल्याने त्यांनी परतीच्या तयारीला लागले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता १३० सायकलपटू परतीच्या प्रवासाला निघाले. बाकी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. विरुद्ध दिशेने येणारा वारा खूपच जोरात वाहत होता. त्यामुळे अंतर कापणे खूपच अवघड जात होते. पण, जबरदस्त इच्छाशक्तीमुळे मजल दर मजल चालू होती. नातेपुते, माळशिरस, फलटण मार्गे लोणंद येथे जेवण करून पुढे नीरा, जेजुरी - सासवड, हडपसर असा प्रवास पूर्ण झाला.
‘आयसीसी’चे कोअर समितीचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ , विश्वकांत उपाध्याय, यतिश भट यांचे संयोजनात महत्त्वपूर्ण योगदान राहिले. याखेरीज, अन्य सायकलपटूंनीही सायकलवारी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.