पॅन सिटीसाठी ६५० कोटींची निविदा

pcmc
pcmc
Updated on

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पॅन सिटी प्रकल्पासाठी सुमारे ६५० कोटींची निविदा काढण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज दिली.

या प्रकल्पात शहराच्या विविध भागांत फायबर ऑप्टिक केबलद्वारे इंटरनेटचे जाळे उभारण्यात येणार आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी खड्डे (डक्‍ट) घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

स्मार्ट सिटी प्रकल्प हा विभागनिहाय विकास आणि पॅन सिटी सोल्युशन्स या दोन घटकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पॅन सिटीतून इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी, वायफाय सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, घनकचरा नियोजन आणि ऑपरेटिंग सिस्टिम यांसारख्या गोष्टींवर भर दिला जाणार आहे. पॅन सिटीतून फायबर ऑप्टिक केबलचे जाळे, ३०० वायफाय स्पॉट करणे, नागरिकांसाठी स्मार्ट किऑक्‍स, सीसीटीव्ही, इंटरनेटद्वारे वाहतूक नियोजन, स्मार्ट सार्वजनिक वाहतूक, शहरात स्मार्ट पार्किंगची सोय, स्मार्ट पाणीपुरवठा सुविधा, स्मार्ट जलनि:सारण सुविधा, स्मार्ट घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट दिवाबत्ती व्यवस्था, पर्यावरणपूरक सुविधा आणि नियंत्रण, कमांड आणि कंट्रोल सेंटर उभारणे, जीआयएस ट्रॅकिंग सिस्टिम, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि स्मार्ट सिटी मोबाइल ॲप या सुविधा संपूर्ण शहराला मिळणार आहेत.

शहराच्या विविध भागांत फायबर ऑप्टिक केबलद्वारे इंटरनेटचे जाळे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक ठिकाणी खड्डे (डक्‍ट) घेण्यात येणार आहेत. भविष्यात नवीन वाहिनी अथवा केबल टाकताना हे डक्‍ट भाड्याने देऊन महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे. या फायबरच्या केबल रस्त्याच्या बाजूला उभारण्यात येणाऱ्या खांबाशी संलग्न ठेवणार आहेत.

त्यातून वायफायची सुविधा शहरात विविध ठिकाणी उपलब्ध करणे सोपे होईल. साधारण ७५० किलोमीटर लांबीचे फायबर नेटवर्क उभारण्यात येणार आहे. याशिवाय नागरी सेवांसाठी किऑस सेंटरमधून माहितीची सुविधा देण्यात येणार आहे. प्रमुख चौक व महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्हीचे जाळे उभारणार आहे. त्याचा उपयोग पालिका प्रशासनासह वाहतूक पोलिस व गुन्हेगारी नियंत्रणासाठी होईल, असेही हर्डीकर यांनी सांगितले.

या कामांसाठी ६५० कोटींची निविदा काढण्यात येत आहे. निविदा अंतिम टप्प्यात असून लवकरच ती काढली जाईल. त्यानंतर ठेकेदाराला काम दिल्यानंतर स्मार्टअंतर्गत ही कामे शहरात वेगाने सुरू होतील, असेही आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. स्मार्ट सिटीत सहभागी झालेल्या इतर शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराने वर्षभरात चांगले काम केले आहे. स्मार्ट सिटीच्या १०० शहरांच्या यादीत पिंपरीचा २८ वा क्रमांक आहे. शहरात अतिशय नियोजनपूर्वक काम सुरू आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.