पिंपरी - आळंदीला बाह्यवळण ठरणाऱ्या चऱ्होलीतील दाभाडे वस्ती येथील नियोजित रस्त्याला काही शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे सुमारे 650 मीटर लांबीचा हा रस्ता चार वर्षांपासून रखडला असून, आळंदीतील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. भूसंपादन विभागाच्या चुकीमुळे रस्त्याचे काम थांबवावे लागल्याचे काही शेतकऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
आळंदीपासून सुमारे एक किलोमीटर असलेल्या चऱ्होली खुर्द (ता. खेड) आणि चऱ्होली बुद्रुक (ता. हवेली) यांना दाभाडे वस्ती येथील रस्त्याने जोडले जाणार आहे. या दोन्ही गावांच्या मध्ये इंद्रायणी नदीवर दोन वर्षांपूर्वी पूलही उभारला आहे. आळंदी-मरकळ रस्त्यापासून चऱ्होली खुर्दच्या बाजूने पुलापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे. हा रस्ता चौपदरी आहे. मात्र, पुलापासून दाभाडे वस्तीपर्यंत (चऱ्होली फाटा ते चऱ्होलीगाव रस्ता) रस्त्याचे काम रखडले आहे. या टप्प्यात एके ठिकाणी नाला असून, चार-पाच शेतकऱ्यांनी हरकत घेतली आहे. काहींनी न्यायालयात धाव घेतली आहे. भूसंपादन विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा शेतकऱ्यांनी सांगितले.
दाभाडे वस्तीतील रस्त्याचे फायदे
- आळंदी-मरकळ रस्त्यावरून वाहतूक वळविता येणार
- आळंदीतील रहदारी कमी होऊन वाहतूक कोंडी टळणार
- मरकळ, धानोरे, सोळू व भोसरी एमआयडीसी जोडणार
- चऱ्होली खुर्द व बुद्रुक या गावांचा विकास होणार
दृष्टिक्षेपात दाभाडे वस्ती रस्ता
एकूण लांबी - 650 मीटर
ताब्यातील रस्ता - 400 मीटर
शेतकऱ्यांची हरकत - 250 मीटर
सध्या काम सुरू - 120 मीटर
संपूर्ण रस्त्याची रुंदी - 45 मीटर
""रस्त्याला आमची काहीच हरकत नाही. हा रस्ता लवकर झाला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच रहिवाशांचाही फायदा होणार आहे. रस्ता झाल्यानंतर नागरिकरण वाढेल. व्यवसाय वाढतील. चांगल्या सुविधा मिळतील.''
- शंकर दाभाडे, बाधित शेतकरी
""रस्त्यात आमची जमीन जात आहे. आणखी चार-पाच शेतकऱ्यांचीही अशीच स्थिती आहे. रस्त्यामुळे परिसराचा विकास होणार असल्याने त्याला आमचा विरोध नाही. पण, सरकार व प्रशासनाने लक्ष घालून हा प्रश्न सोडविला पाहिजे.''
- बाजीराव दाभाडे, बाधित शेतकरी
""शेतकऱ्यांची अडचण होती. काही शेतकरी भूमिहीन होणार होते. त्यांना पर्यायी जागा दिली आहे. काही शेतकऱ्यांचा भावकीचा वाद होता. तोही आता मिटला आहे. काही दिवसांत शेतकऱ्यांना मोबदला मिळणार असल्याने रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.''
- नितीन काळजे, स्थानिक नगरसेवक व महापौर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.