पुणे - भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पंधरा दिवसांत विभागीय आयुक्तांबरोबर उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार जगदीश मुळीक यांनी दिले.
भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाची पाहणी आमदार मुळीक यांनी केली. या वेळी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, समिती सदस्य, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी चालू असलेल्या कामांचा आढावा घेतला. जॅकवेलच्या कामाची गती संथ आहे. या कामाची गती वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, सुट्ट्यांचे नियोजन करा, तिन्ही पाळ्यांत काम सुरू करा, अशा सूचना मुळीक यांनी दिल्या.
चऱ्होलीपर्यंत 42 किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याच्या कामापैकी 36 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. दोन किलोमीटर अंतराचे काम सध्या सुरू आहे. पिंपरी-चिंचवडमधील दीड किलोमीटरचा रस्ता ताब्यात घेण्याची प्रकिया सुरू आहे. चिमळी-केडगाव परिसरातील दीड किलोमीटर अंतराचे आणि शेतकऱ्यांनी आसखेड येथे रोखलेले काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले.
मेदनकरवाडी, चाकण येथे दहा एकर जागेत जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी सुरू असून, 60 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये शुद्ध पाण्याच्या चारही टाक्यांची कामे पूर्ण झाली असून फिल्टर हाऊस, प्रशासकीय इमारत, केमिकल हाउस आदींची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी दिली.
|