हातभट्ट्यांमुळे बालाजीनगरची वाताहत

हातभट्ट्यांमुळे बालाजीनगरची वाताहत
Updated on

भोसरी - येथील बालाजीनगरमधील तरुणांना हातभट्टीची दारू घराजवळच मिळत असल्याने व्यसनाधीन तरुणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दारूमुळे विवाहित तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे बालाजीनगरमध्ये वैधव्य आलेल्या महिलांची संख्या वाढत आहे. हातभट्टी दारूचे गुत्ते बंद करण्यासाठी विविध संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतरही गुत्ते सुरूच असल्याने पोलिसांची लुटुपुटूची कारवाई सुरू असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. झोपडपट्टीमधील तरुणांना व्यसनाधीनतेपासून वाचविण्यासाठी सर्वच हातभट्टीचे गुत्ते बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

एका अठ्ठावीस वर्षे वयाच्या तरुणाचा सोमवारी (ता.२५) दारूच्या व्यसनाने बळी गेल्याने बालाजीनगरमधील हातभट्टी दारूच्या गुत्त्यांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

दहा वर्षांपूर्वी या परिसरात तीन हातभट्टी दारूचे गुत्ते होते. आता त्यांची संख्या पंधरावर गेली आहे. त्यामुळे येथील तरुणांना अगदी घराजवळच हातभट्टीची दारू उपलब्ध होते. तरुणांच्या व्यसनाधीनतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बालाजीनगरमध्ये दारूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २० आहे. त्यामध्ये ३५ वर्षे वयाच्या आतील १२ विवाहित तरुणांचा समावेश आहे. त्यामुळे ३० वर्षे वयाच्या आतील १२ विधवांची भर बालाजीनगरमध्ये पडली आहे. त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. 

आजही सोळा ते एकवीस वयोगटातील सुमारे शंभर तरुणांना दारूचे व्यसन लागल्याचे नागरिक सांगतात. बालाजीनगरमधील १२ ते २० वयोगटातील मुले व्हाइटनरची नशा करतात. त्यांची संख्याही सुमारे ४० च्या आसपास आहे.

हातभट्टीचे गुत्ते बंद करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी), अपना वतन संघटना, महात्मा फुले सामाजिक समता परिषद आदींनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र, आंदोलनानंतर बंद होणारे दारूचे गुत्ते पुन्हा सुरू होत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

माझ्या भावाच्या जावयाचा गेल्या वर्षी वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी दारू व ताडीच्या व्यसनामुळे मृत्यू झाला. दारूच्या व्यसनापासून तरुणांना वाचविणे गरजेचे आहे.
- ईश्‍वर कांबळे, नागरिक, बालाजीनगर

पोलिसांच्या हप्तेखोरींमुळेच बालाजीनगरमध्ये हातभट्टी दारूच्या गुत्त्यांची संख्या वाढत आहे. या प्रश्‍नाकडे प्रशासन आणि स्थानिक नगरसेवकांनीही दुर्लक्ष केल्याने बालाजीनगरमधील नागरिक हतबल झाले आहेत. नागरिकांच्या आंदोलनानंतरही हातभट्टी गुत्त्यांवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही.
- महेंद्र सरवदे, प्रभाग अध्यक्ष,  बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी

भोसरीतील झोपडपट्टीमध्ये सुरू असलेल्या हातभट्टी गुत्त्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे गुत्ते पुन्हा सुरू होणार नाहीत, याचीही खबरदारी घेतली जाईल.
- गणेश शिंदे,  पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.