बीआरटी पुन्हा अडचणीत

BRT
BRT
Updated on

पिंपरी - निगडी दापोडी रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चून लवकरच मार्गस्थ होण्याच्या तयारीत असलेली बीआरटी बससेवा आता मेट्रो प्रकल्पाने पुन्हा अडचणीत आली आहे. महापालिका भवनासमोर पदपथावरून असलेला मेट्रोचा नियोजित मार्ग बदलून तो आता बीआरटी मार्गातून जाणार आहे.

बीआरटी मार्गावर मेट्रोच्या खांबांसाठी पाया खणण्याचे काम सुरू झाले.
बीआरटी बससेवेची गेले नऊ वर्षे प्रतीक्षा सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरक्षिततेची सर्व काळजी महापालिकेने घेतली. गेले वर्षभर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर त्यासाठी प्रयत्नशील आहेत.

महापालिकेचा अहवाल मार्चमध्ये उच्च न्यायालयात सादर केला असून, त्यांची मान्यता मिळताच स्वतंत्र मार्गातून बीआरटी बससेवा सुरू होईल. मात्र, महापालिका भवनासमोर मेट्रोचा नियोजित मार्ग बदलल्याने तेथील बीआरटीची डेडीकेटेड लेन राहण्याची शक्‍यता मावळली. तेथे अन्य वाहनांच्या सोबतच बीआरटी गाड्या धावतील, असा अंदाज आहे. तेथे डेडीकेटेड लेन केल्यास अन्य वाहनांना कमी जागा उपलब्ध होईल.

खराळवाडीपर्यंत रस्त्याच्या मधल्या दुभाजकावरून आलेली मेट्रो डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे जाताना बीआरटी मार्गाकडे वळाली. तेथे एका ठिकाणी पाया घेऊन खांबांचे काँक्रिटीकरण एक-दोन दिवसांत सुरू होईल.

मोरवाडीत सात ठिकाणी पाया घेण्यासाठी बीआरटीचा स्वतंत्र मार्ग खणला आहे. ग्रेड सेपरेटरमधून मेट्रोचे खांब उभारता येणार नाहीत. त्यामुळे त्याच्या संरक्षक भिंतीपासून पाया खणण्यास सुरवात झाली. पायाचा भाग विस्तृत असल्याने त्यांच्या मध्यभागी असलेला खांब संरक्षक भिंतीपासून अडीच मीटरवर असेल. त्यामुळे बीआरटी व सेवा रस्त्याची सुमारे दहा-बारा फूट जागा मेट्रोने व्यापली जाईल. 

पिंपरीपासून निगडीपर्यंत सहा किलोमीटर अंतरात मेट्रोचा आराखडा तयार होत आहे. तेथेही बीआरटीच्या स्वतंत्र मार्गातूनच मेट्रो गेल्यास मेट्रोच्या खांबांमध्ये बीआरटीचे थांबे उभे केले जातील. बसथांब्यांवर प्रवाशांची चढउतार होईल. पिंपरीपासून बीआरटी स्वतंत्र मार्गातून पुढे पुण्याकडे जाईल. पुणे महापालिकेतर्फे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून बोपोडीपर्यंत बीआरटी मार्ग करण्यात येणार आहे.

बीआरटी बससेवेला आम्ही डिस्टर्ब करणार नाही. महापालिका भवनासमोरील पदपथाच्या खाली बारा प्रकारच्या सेवा वाहिन्या आहेत. त्या सर्व बदलणे अडचणीचे आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरच्या संरक्षण भिंतीजवळून मेट्रो नेण्यात येईल. भिंतीपासून मेट्रोचा खांब अडीच ते तीन मीटर अंतरावर असेल. मेट्रो स्थानक व बीआरटी बसथांबे जोडण्यात येतील. त्याचा फायदा प्रवाशांना होईल. बसथांबे हलविण्याची वेळ पडल्यास ते व्यवस्थित करून देण्यात येतील. त्यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे.
- रामनाथ सुब्रमण्यम, कार्यकारी संचालक, महामेट्रो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.