पिंपरी - पीएमपीची बस चौकातच बीआरटी मार्गात बंद पडल्याने, त्या मार्गात पीएमपीच्या सात-आठ गाड्या पाठोपाठ रांगेत अडकल्या. बीआरटी मार्गात असलेली अन्य वाहनेही अडकून पडली. निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर मोरवाडी येथे अहिल्यादेवी होळकर चौकात सोमवारी दुपारी चार वाजून २५ मिनिटांनी ही घटना घडली.
निगडी-दापोडी मार्गावर बीआरटी बससेवा अत्यंत घाईघाईत गेल्या शुक्रवारी सुरू करण्यात आली. या मार्गावर सुमारे २७३ गाड्यांचे नियोजन करण्यात आले. मात्र, पहिल्या दिवसापासूनच बीआरटी बससेवेत प्रवाशांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. जुन्या गाड्या दुरुस्त करून मार्गावर पाठविण्यासाठी पीएमपी प्रशासनाने शिकस्त केली. मात्र, मार्गावर रोज शंभरपेक्षा जास्त गाड्या बंद पडत असल्यामुळे पीएमपी प्रशासनाचीही पंचाईत झाली आहे. नादुरुस्त गाड्यांचे प्रमाण वाढतच आहे.
हडपसर येथून निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात जाणारी मार्ग क्रमांक १३९ ही बस मोरवाडी येथील चौकात बीआरटी मार्गात थांबली. वाहतूक नियंत्रक दिवा ‘हिरवा’ झाला. बसचालक गाडी पुढे नेण्यासाठी ॲक्सिलरेटर देत होता; मात्र तांत्रिक दोषामुळे गाडी जागेवरून पुढे हालतच नव्हती. वाहकाने प्रवाशांना गाडीतून उतरण्यास सांगितले. त्या वेळी चौकातून अन्य वाहने पुढे वेगाने मार्गस्थ होत होती. त्यामुळे प्रवाशांनाही गाडीतून उतरल्यानंतर चौकात थांबण्यास जागा नव्हती. त्यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त होती. त्यामुळे, महिला प्रवासी त्रागा व्यक्त करीत त्यांची चिडचिड वाहकाकडे व्यक्त करीत होत्या. चौकातच गाडी अडकल्यामुळे, महापालिका भवनासमोरील त्या बीआरटी मार्गावर पाठीमागे सात-आठ बीआरटी गाड्या अडकून पडल्या. काही दुचाकी वाहनेही त्या गाडीपाठोपाठ होती.
लोखंडी रेलिंगमुळे पाठीमागील वाहनांना पुढे मार्गस्थ होता येत नव्हते. त्या गाड्यांतील चालकही नादुरुस्त झालेल्या बसचालकाच्या मदतीला धावले. मात्र, त्या गाडीतील तांत्रिक दोष दूर होत नव्हते. गाडी जोरात आवाज करीत जागेवरच थांबून राहिली. अशा स्थितीत पावसाची जोरदार सर आल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. काही वेळाने गाडी मार्गातून बाहेर काढण्यात आली.
बीआरटीसाठी जास्तीत जास्त चांगल्या गाड्या पाठविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. होळकर चौकात बंद पडलेल्या गाडीबाबत संबंधित डेपोत चौकशी केली जाईल. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- विलास बांदल, वाहतूक महाव्यवस्थापक, पीएमपी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.