पुणे - लाल आणि हिरव्या दिव्यांतच काउंटडाउन टायमर बसवा म्हणजे वेगळा खर्च करण्याची गरज नाही, हॉर्न वाजवून उतावीळपणा करणाऱ्यांना टायमर दाखवून शांत करता येईल, शहरातील वर्दळीच्या किमान ६० चौकांत तरी सर्व बाजूच्या सिग्नलवर टायमर असावेत, असे अनेक उपाय सुचवीत वाहतूक नियंत्रक दिव्यांवर काउंटडाउन टायमर हवेच, असे पुणेकरांनी म्हटले आहे.
वाहतूक नियंत्रक दिव्यांवरील काउंटडाउन टायमरला घरघर लागल्याचे वृत्त ‘सकाळ’ने शनिवारी (ता. ७) प्रसिद्ध केले. त्याबाबतची मते मांडण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. पुणेकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अन् केवळ मत प्रदर्शन न करता वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी व्हॉट्सॲपवरून उपायही सुचविले. त्यातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे. अतुल कानेटकर म्हणाले, ‘‘सिग्नलला टायमर असणे ही उपयुक्त आणि आवश्यक सुविधा आहे. केवळ प्रमुख नव्हे, तर सर्वच चौकांत ही सुविधा हवी. हॉर्न वाजवून उतावीळपणा दाखविणाऱ्या वाहनचालकांना टायमर दाखवून शांत करता येईल.’’
डॉ. गोपीनाथ वाडेकर म्हणाले, ‘‘टायमर असेल, तर सिग्नलच्या वेळी गाडी एकाने बंद केली, तर इतरही वाहनचालक त्याचे अनुकरण करतात. प्रदूषणामुळे डोळे चुरचुरतात. गाड्या बंद केल्यामुळे ते कमी होईल आणि इंधनबचतही होईल.’’ संजीव आगाशे म्हणाले, ‘‘हिरवा सिग्नल लागताना तीन सेकंद उशिरा व लाल होताना पाच सेकंद लवकर लागावा. त्यामुळे हिरव्या सिग्नलच्या वेळी शेवटची वाहने भरधाव जाणे कमी होईल.’’ विश्वजित घाडगे म्हणाले, ‘‘टायमरची आवश्यकता आहेच. परंतु, सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ या गर्दीच्या वेळात वाहतूक नियंत्रक दिव्यांपेक्षा वाहतुकीच्या गरजेनुसार पोलिसांनी स्वतः नियमन करावे.’’ किशोर गराला म्हणाले, ‘‘टायमरमुळे किमान २५ टक्के वाहने बंद होतात. त्यामुळे ते हवेतच.’’ नितीन परळे म्हणाले, ‘‘शेवटचे दहा सेकंद ‘रेडी’ असा मेसेज यावा आणि त्यानंतर हिरवा दिवा लागला पाहिजे.’’
प्रशांत पितळिया म्हणाले, ‘‘काउंटडाउन टायमरमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे शक्य होईल आणि चौकांमध्ये पोलिस असतील, तर सिग्नल तोडून जाणाऱ्यांवर कारवाई होऊ शकेल.’’ सचिन सुपेकर यांनी सिग्नल तोडण्याची अधीरता कमी होईल आणि वाहनचालक तयार राहतील, असे मत व्यक्त केले.
काउंटडाउन टायमर हवेतच
भारतीय वाहन खरेदी-विक्री संघटनेचे शहराध्यक्ष सुनील गंगावणे, सुहासिनी बिवलकर, अविनाश कोरे, बालाजी कानडे, रामेश्वर खेनट, माधव परांजपे, आनंद ताडला, अक्षय खिंवसरा, जितेंद्र मालू, शिशिर कुलकर्णी, मिलिंद छत्रे, विश्वनाथ गोसावी, शफीक मणियार, विनोद चव्हाण, अरविंद प्रभुदेसाई (निवृत्त कर्नल), दर्शन आवटे, प्रसाद शिंदे यांनीही काउंटडाउन टायमर पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
महापालिका दखल घेणार?
सिग्नलवर टायमर हवेत, असे बहुसंख्य पुणेकरांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून सुचविले आहे. वाहतूक पोलिसही त्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. आता महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन त्याबाबत काय निर्णय घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.