पुण्यात मेट्रो स्थानकांवरही "सायकल शेअरिंग' 

metro.jpg
metro.jpg
Updated on

पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाच्या सर्वच म्हणजे 30 स्थानकांवरून प्रवाशांना माफक दरात भाडेतत्त्वावर "पब्लिक बायसिकल शेअरिंग' योजनेंतर्गत सायकली उपलब्ध होणार आहेत. याबाबतच्या महापालिकेच्या प्रस्तावाला महामेट्रोने नुकतीच मंजुरी दिली आहे. 

पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या दोन मेट्रो मार्गांचे काम सध्या शहरात सुरू आहे. या सुमारे 31 किलोमीटरच्या अंतरात अनुक्रमे 14 आणि 16 स्थानके होणार आहेत. त्यातील सुमारे बारा स्थानकांचे काम सध्या सुरू आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडल्यावर जवळच्या ठिकाणावरील सायकलद्वारे प्रवास करून मेट्रो स्थानकाजवळ ती सोडायची अन्‌ मेट्रोनी प्रवास करायचा. मेट्रोतून उतरल्यावरही त्यांना स्थानकावरूनच सायकल घेऊन हव्या त्या ठिकाणी जाता येईल, अशा प्रकारचे नियोजन महापालिका आणि महामेट्रोने केले आहे. त्यासाठी प्रत्येक स्थानकावर सायकलींसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

स्थानकाच्या आकारानुसार आणि प्रवाशांच्या संख्येनुसार 10 ते 50 सायकली तेथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिकेने त्यासाठीची निविदाप्रक्रिया पूर्ण केली आहे. येत्या तीन वर्षांत मागणीनुसार सायकलींची संख्या सुमारे दीड लाखांवर जाऊ शकते. शहरात 800 ठिकाणांवरून सायकली उपलब्ध करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. 

सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम करण्याच्या उपायांचाच "पब्लिक बायसिकल शेअरिंग' हा एक भाग आहे. प्रत्येक स्थानकावरून प्रवाशांना सायकली उपलब्ध होतील, यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबत महापालिकेबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे. पुढील टप्प्यात ई-वाहनांना चार्जिंगची सुविधा मेट्रोच्या स्थानकांवरून उपलब्ध करून देता येईल का, या बाबतही विचार सुरू आहे. 
- रामनाथ सुब्रह्मण्यम, कार्यकारी संचालक, महामेट्रो 

पादचारी धोरणाचा एक भाग म्हणून सायकल आराखड्याची अंमलबजावणी करीत आहोत. सायकल योजना विविध प्रभागांत राबविण्यात यावी, अशी मागणी वाढत आहे. तसेच, सायकलींचा वापर करणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. पुढील टप्प्यात मेट्रोबरोबरच बीआरटी स्थानकांनाही सायकल सुविधा संलग्न करण्याचे नियोजन सुरू आहे. 
- श्रीनिवास बोनाला, अतिरिक्त नगर अभियंता 

मेट्रोची नियोजित स्थानके 
पिंपरी-स्वारगेट : पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, खडकी, रेंजहिल्स, शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट 
वनाज-रामवाडी : वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन, संभाजी पार्क, महापालिका, शिवाजीनगर न्यायालय, आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल क्‍लिनिक, बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी 

सायकलींची सध्याची संख्या : 5800 (युलु 1300, मोबाईक 2500, पेडल 200) 

येथे उपलब्ध आहेत सायकली : सिंहगड रस्ता, नांदेड सिटी, एमआयटी कोथरूड, कर्वेनगर, बीटी कवडे रस्ता, अमनोरा- हडपसर, शिवाजीनगर, कोथरूड, लॉ कॉलेज रोड, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, औंध, शिवाजीनगर. 

सायकलींचा वापर करणाऱ्यांची संख्या : रोज सुमारे 27 ते 30 हजार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.