उद्योजक आंदोलनाच्या पवित्र्यात

Industry
Industry
Updated on

खंडित वीजपुरवठ्यामुळे उत्पादनात घट; मोठा आर्थिक फटका
पिंपरी - सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरातील लघुउद्योजक अडचणीत सापडले आहेत. महावितरणकडून या प्रकाराची दखल घेतली जात नसल्याने उद्योजक तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. 

पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून देखभाल- दुरुस्तीची कामे केली जातात. मात्र, यंदा ही कामे न झाल्याने वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. तळवडे, कुदळवाडी, भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉक, सेक्‍टर दहा या ठिकाणी दररोज वीज गायब होत असल्याचे पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले. 

या समस्येमुळे उद्योगांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. आतापर्यंत महावितरणकडे अनेक तक्रारी केल्या. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे समस्येमध्ये भर पडत आहे. त्याचा थेट उत्पादनावरही परिणाम झाला आहे. कामगारांना ओव्हरटाईम देऊन काम करून घ्यावे लागत आहे. काहीवेळा बाहेरून काम करून घ्यावे लागत असल्याचे बेलसरे यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी ट्रान्स्फॉर्मरची तपासणी, खांबावरील तारांची तपासणी, डीपी बॉक्‍स, फिडर तपासणे आदी कामे अपेक्षित होती. मात्र, ती झाली नाही. एमआयडीसीमधील यंत्रणा ४० वर्षे जुनी आहे. येथील वीजयंत्रणेसाठी सेक्‍शन इंजिनिअरची आवश्‍यकता आहे. मात्र, अनेक दिवसांपासून येथील दोन पदे रिक्‍त आहेत, असे ते म्हणाले.

उद्योगांची संख्या- १०,०००
लघुउद्योगांना दररोज लागणारी वीज - ५०० मेगावॉट
औद्योगिक परिसर - तळवडे, कुदळवाडी, चिखली, भोसरी, मोशी 
एमआयडीसीमधील यंत्रणा ४० वर्षे जुनी

पावसाळ्यापूर्वीची देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. वीजपुरवठा करणाऱ्या लाइनमध्ये दोष दूर केले आहेत. या विभागासाठी आवश्‍यक सेक्‍शन इंजिनिअर उपलब्ध करून देण्याबाबत महावितरणच्या मुख्य अभियंत्याबरोबर चर्चा झाली आहे. 
- शेवाळे, कार्यकारी अभियंता, महावितरण 

तळेगाव, लोणावळा औद्योगिक परिसरात विजेचा लपंडाव
तळेगाव स्टेशन - शनिवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका तळेगाव, चाकणसह लोणावळा परिसरातील उद्योगजगतालाही बसला. विजेच्या लपंडावामुळे बहुतांशी कंपन्यांचे उत्पादन घटले असून, मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये जनरेटर लावून उत्पादन करण्यात येत आहे.

मावळ आणि खेड तालुक्‍यांत शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. विजेअभावी चाकण- तळेगाव एमआयडीसी, टाकवे औद्योगिक वसाहत, लोणावळा तसेच उर्से परिसरातील बहुतांशी कंपन्यांची उत्पादनक्षमता खालावली आहे. विद्युतदाबही कमी-जास्त असल्याने उद्योजक हैराण झाले आहेत. जनरेटरवर उत्पादन घ्यावे लागत असल्याने दिवसाला लाखो रुपयांचे डिझेल खर्ची पडत आहे.

परिणामी, कंपन्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
एक विद्युतवाहिनी खोपोली स्टॅंडबायवर सुरू असून, अन्य वाहिन्यांमध्ये कुठलाही बिघाड नाही. संततधार पावसामुळे फिडर पिलरवर बाष्प जमा होऊन ते वारंवार बंद पडून वीजपुरवठा खंडित होत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

तळेगाव महावितरणचे अधिकारी व कर्मचारी रविवारपासून बाष्प साफ करण्याचे काम करीत आहेत. बहुतांश काम पूर्ण झाले आहे. बुधवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल.
- राजेंद्र गोरे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, तळेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.