अतिक्रमणांची साफसफाई

अतिक्रमणांची साफसफाई
Updated on

पिंपरी - वाहतूक पोलिसांनी हिंजवडीत सुरू केलेला एकेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी शिवाजी चौक परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे शनिवारी (ता. ८) काढण्यात आली. पोलिस, एमआयडीसी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्‍त प्रयत्नांतून ही कारवाई करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेली मोहीम संध्याकाळपर्यंत सुरू होती. यामध्ये या परिसरातील ४०० अतिक्रमणे काढून टाकण्यात आली. पुढील तीन दिवस ही कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे. 

गेल्या आठवड्यामध्ये वाहतूक पोलिसांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शिवाजी चौकामध्ये प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबविण्यास सुरवात केली. आयटी कंपनीमध्ये जाणाऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे. दरम्यान, रस्त्यालगत असणारी अतिक्रमणे, रस्त्यावरील खड्डे, अशा समस्या ‘सकाळ’ने (ता. ७) मांडल्या होत्या. प्रशासनाने तत्काळ त्याची दखल घेत हा रस्ता अतिक्रमणांतून मुक्‍त केला. 

शिवाजी चौकातून जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बऱ्याच ठिकाणी अतिक्रमणे झाली होती. एकेरी वाहतुकीचा प्रयोग सुरू झाल्यानंतर रस्त्यावर काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत होता. पोलिस आयुक्‍तांनी या भागाची पाहणी केली होती. त्या वेळी ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर या तिन्ही यंत्रणांनी आराखडा तयार करून ही कारवाई केली. 

आयटी कंपन्यांना सुटी असल्यामुळे कारवाई करताना कोणतीही अडचण आली नाही. याखेरीज आयटी पार्कमधील फेज वन आणि फेज टूमधील कंपन्यांच्या बाहेरील पदपथ, मोकळ्या जागांमध्ये लावण्यात आलेल्या हातगाड्यांवर कारवाई करण्यात आल्याने आयटी पार्कची अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटका झाली. अतिक्रमणांवर कारवाई सुरू होण्याअगोदर अनेक जणांनी भीतीपोटी ती काढून टाकली. अतिक्रमणे काढण्यासाठी पथक येणार असल्याची माहिती समजताच अनेकांच्या गाड्या गायब झाल्या होत्या. 

फेरीवाल्यांवरही कारवाई 
शिवाजी चौक परिसरात रस्त्यालगत बसणाऱ्या फेरीवाल्यांवरही कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यापासून आतापर्यंत ४० फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. 

पीएमपीसोबत पत्रव्यवहार 
आयटी पार्कमध्ये ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपी बस मार्गात योग्य बदल करावा, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी पीएमपी व्यवस्थापकांना केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बसमार्गात कोणते बदल करणे अपेक्षित आहे, याची माहिती त्यांनी कळवली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.