आळंदी : प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करू शकत नसाल तर तुम्ही महापालिका चालविण्यासाठी नालायक आहात. पिंपरी महापालिकेबरोबर लोणावळा आणि तळेगाव नगरपालिका हद्दीतूनही प्रक्रिया न करताच इंद्रायणीत सोडलेले सांडपाणी तत्काळ थांबवले नाही तर गेली दोन वर्षांपासून कार्यरत अधिकारी आणि नगराध्यक्षांवर सदोष मनुष्यवधाचा विनाजामिन गुन्हा दाखल करून तत्काळ अटकेच्या कारवाईस भाग पाडू. वेळप्रसंगी तुमच्याविरोधात नदीप्रदुषणाचा विषय नागपूर अधिवेशनात मांडू अशा शब्दात संतप्त झालेल्या पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम आज आळंदीतील शासकिय विश्रामगृहात इंद्रायणी प्रदुषणाबाबत आणि एसटीपी प्लँटबाबत पिंपरी महापालिका, लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी, देहू ग्रामपंचायतीचा आढावा घेतला. यावेळी कदम बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगल, आमदार सुरेश गोरे, प्रदुषण नियंत्रण उपप्रादेशिक अधिकारी एच.डी.गंधे, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, सेनेचे जिल्हाप्रमुख राम गावडे आदी उपस्थीत होते.
पुढे बोलताना कदम म्हणाले, गेली दहा वर्षांपासून आळंदी आणि आळंदीत येणारे लाखो भाविकांसह पुढील गावांना प्रदुषित पाणी प्यावे लागत आहे. अनेकांनी याबाबत लेखी तक्रारी अर्ज आणि निवेदने दिले. आजपासून नदीपात्रात प्रदुषित पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तुम्ही निविदा काढता आणि वेळ लागेल असे सांगता. जनाची नाही किमान मनाची तरी लाज बाळगा. नद्या प्रदुषित करता महापालिका, पालिका चालविण्यासाठी तुम्ही नालायक आहात. महापालिका असो पालिका नदीप्रदुषण करणारे चौदा एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता थेट सोडले जाते.
जादाचा एसटीपी प्रकल्प पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल. पण प्रदुषण करणाऱ्या कारखान्यांवर महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याची माहिती यावेळी पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रविण अष्टेकर यांनी दिली. यावेळी मंत्री कदम संतप्त झाले आणि तुम्ही महापालिका चालविण्यास नालायक आहात. कारखान्यांवर कारवाई करण्यास तुमचे हात बांधलेत का. कारवाई करण्यात अडचण काय. मी दोन दिवस थांबू का. लोकांनी तुमचे चौदा एमएलडी सांडपाणी प्यायचे का अशा शब्दात अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत झापले. त्यानंतर सहा महिन्याची मुदत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी महापालिकेला दिली. पण त्याआधी सांडपाणी नदीत सोडले जाणार नाही याची तत्काळ दक्षता घेण्याच्याही आदेश दिला.
लोणावळा पालिका मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांडपाण्यासाठीचा निधी घनकचरा व्यवस्थापनासाठी वापरल्याचे सांगितले. यावर कदम यांनी पालिकेला तत्काळ नोटीस काढण्यास सांगून नगराध्यक्ष मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास सांगतले. आमचे पैसे घनकचऱ्यासाठी का वापरले. कायदा धाब्यावर बसवता का अशा शब्दात मुख्याधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तळेगावचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी पालिका हद्दीतील तिन ठिकाणाहून सांडपाणी नदीत सोडले जात असून एसटीपीसाठी जागा संपादित केली. मात्र सहा महिने एसटीपीसाठी वेळ लागल्याचे सांगितले. यावेळी कदम यांनी सध्या नदीत सोडले जाणारे सांडपाणी दुसरीकडे वळवा असे सांगितले.
इंद्रायणी प्रदुषण करणाऱ्या पिंपरी महापालिका, लोणावळा, तळेगाव पालिका आणि देहू ग्रामपंचायतीच्या अधिकाऱयांची बैठक मंगळवारी (ता.३)मंत्रालयात ठेवण्यात आली आहे. बैठकीला येताना एसटीपी, घनकचरा व्यवस्थापन आणि त्यावरिल कारवाईबाबतची संपूर्ण संपूर्ण माहिती घेवून येण्यास सांगितले. तर आषाढी वारीत पावसापासून संरक्षण करण्यासाठी वारकरी अंगावर घोंगटे म्हणून घेण्यात येणारे प्लॅस्टिकचे कापडाच्या वापरास बंदी नसुन त्याबाबत शिथीलता दिली असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.