पदपथ, उद्यानांमध्ये धार्मिक स्थळे

Religious-Place
Religious-Place
Updated on

पिंपरी - शहरातील १९८ पैकी १२४ धार्मिक स्थळे महापालिकेने नियमित केली आहेत; तर काही स्थलांतरित केली असून काही नागरिक वा संबंधित संस्थांनी स्वतः काढून टाकली आहेत. अगदी बोटावर मोजण्याइतक्‍या धार्मिक स्थळांवरच महापालिकेने कारवाई केलेली आहे.

यामुळे धार्मिक स्थळे उभारण्याची स्पर्धाच जणू शहरात सुरू झाली आहे. 
‘पदपथ असो वा चौक, मोकळी जागा अथवा उद्याने, उभारू या धार्मिक स्थळे’, अशी स्थिती आहे. अगदी दोन बाय दोन फूटपासून गुंठ्यापर्यंतची सार्वजनिक जागा धार्मिक स्थळांनी अनधिकृतपणे व्यापलेली आहे.

एकीकडे स्मार्ट सिटीचे गुणगान गात असताना दुसरीकडे धार्मिक व भावनिकतेच्या नावाखाली सार्वजनिक जागा बळकविण्याचा उद्योग काही व्यक्तींकडून केला जात आहे. त्यामुळे शहर सौंदर्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. सुरळीत व सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशस्त रस्ते आणि पदपथ विकसित केले जात असतानाच, पदपथ व चौकांलगत धार्मिक स्थळे उभारली जात आहेत. स्थळाचा वर्धापन दिन असो अथवा श्रावण महिना रस्त्यावरच महापूजा घालून मोठा समारंभ केला जातो. याकडे धार्मिक कार्य म्हणून अनेक जण दुर्लक्ष करतात. मात्र स्वच्छ, सुंदर शहर म्हणून ‘स्मार्ट सिटी’ म्हणून वाटचाल करण्यात अडथळा येत आहे.

महापालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. शहराच्या लौकिकात भर घालणाऱ्या उद्यानांचीही हीच स्थिती आहे. जवळपास प्रत्येक उद्यानात धार्मिक स्थळ उभारले आहे. त्यात काही वेगवेगळ्या समाजघटकांनुसार आहे. अशा धार्मिक स्थळांबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ऑक्‍टोबर २०१७ मध्ये राज्य सरकारला अहवाल पाठविला आहे. त्यानुसार १२४ स्थळे नियमित केल्याचे आढळून येते. त्याचा गैरफायदा काही जण घेत असून, नव्याने धार्मिक स्थळे बांधून जागा बळकावित आहेत.

वेगवेगळ्या उद्देशांनी महापालिकेने उद्याने विकसित केलेली आहेत. त्यांचा शहरातील सर्वच नागरिकांना फायदा होत आहे. धार्मिक स्थळांच्या उभारणीशी उद्यान विभागाचा काहीही संबंध नाही. 
- सुरेश साळुंखे, मुख्य उद्यान अधीक्षक, महापालिका

शहरातील सुमारे १२४ धार्मिक स्थळे नियमित केलेली आहेत. २००९ नंतर धार्मिक स्थळे उभारण्यास परवानगी नाही. तसे निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई केली जात आहे.
- मकरंद निकम, कार्यकारी अभियंता, अनधिकृत बांधकाम विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.