जीएसटीने घोटला औषधांचा गळा 

medicine
medicine
Updated on

पिंपरी - चिंचवड येथील 78 वर्षांचे अंकुश वाळुंज वायसीएम रुग्णालयात उपचार घेताहेत. पण त्यांच्यावरील उपचारांसाठी असलेली औषधीच वायसीएममध्ये उपलब्ध नाहीत. डॉक्‍टरांनी लिहून दिलेली चारपैकी तीन औषधे बाहेरून खरेदी केल्याने त्यांना आठशे रुपयांचा खर्च आला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने वाळुंज यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याचे ठरविले होते. मात्र, येथेही खासगी रुग्णालयामधीलच परिस्थिती असल्याने ते हतबल झाले आहेत. हीच परिस्थिती वायसीएममधील अनेक रुग्णांची आहे. 

महापालिकेला औषध पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी हात आखडता घेतल्यामुळे रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जवळपास 75 टक्‍के औषधे उपलब्ध नाहीत. याचे कारण आहे, जीएसटी. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने औषध खरेदीसाठी निविदा काढल्या होत्या. त्या वेळी सहा टक्‍के व्हॅटच्या किमतींसह ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यानंतर केंद्र सरकारने करप्रणालीमध्ये बदल करून औषधांवर 12 आणि 18 टक्‍के जीएसटी लागू केला. वाढलेला सहा आणि बारा टक्‍के जीएसटी कोणी भरायचा, यावरून सध्या महापालिका आणि ठेकेदार यांच्यात वाद सुरू आहे. ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार मुंबई आणि पुण्यामध्ये जीएसटीची वाढीव रक्‍कम महापालिकेने भरण्याची तयारी दर्शविली असून, त्याबाबतचा ठरावही मंजूर झाला आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने याबाबत उदासीनता दाखविली आहे. सध्या हा वाद विकोपाला गेला आहे. यामुळे काही ठेकेदारांनी औषधपुरवठा बंद केला आहे. तर काहींनी पुरवठा उशिराने करण्याचे धोरण अवलंबिले आहे. 

यामुळे रुग्णालयातील औषधांपैकी 75 टक्‍के औषधांचा तुटवडा जाणवत आहे. औषध उपलब्ध नाहीत, तुम्ही बाहेरून खरेदी करा, असा सल्ला रुग्णांना दिला जात आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्वस्त आणि दर्जेदार रुग्णसेवा मिळत असल्याने शहरातील गोरगरीब नागरिक महापालिकेच्या दवाखान्याची किंवा थेट वायसीएम रुग्णालयाची वाट धरतात. मात्र, वायसीएममधील ही परिस्थिती पाहून गरिबांनी जायचे कुठे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

""जीएसटी कोणी भरायचा याबाबत ठेकेदारांसोबत मतभेद झाले आहेत. परिणामी औषधांचा पुरवठा विस्कळित झाला आहे. जवळपास 75 टक्‍के औषधे भांडारामध्येच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.'' 
- डॉ. मनोज देशमुख, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय 

बाह्यरुग्ण विभागातील वर्षभरातील रुग्ण - 4,30,137 
आंतररुग्ण विभागातील वर्षभरात रुग्ण - 2,04,870 
शस्त्रक्रिया -39,606 
महापालिकेची अन्य रुग्णालये - तालेरा, भोसरी, यमुनानगर, आकुर्डी, थेरगाव, जिजामाता, सांगवी 
दवाखान्यांची संख्या - 28 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.