पुणे - एकीकडे बेस्ट, टाटा आणि रिलायन्स कंपन्या वीजदर कपातीचे धोरण राबवीत असताना, दुसरीकडे महावितरणने मात्र महसुली उत्पन्नातील तोटा भरून काढण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगासमोर मांडला आहे. त्यानुसार घरगुती वापरासाठी 5 टक्के, तर कृषीसाठी 35 टक्के, तर वाणिज्यसाठी सरासरी 15 टक्के इतक्या मोठ्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाची सुनावणी वीज नियामक आयोगापुढे होणार असून, त्यानंतर महावितरणच्या ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे.
महावितरणने वीज नियामक आयोगापुढे सादर केलेल्या मध्यावधी याचिकेच्या माध्यमातून तब्बल 30 हजार 842 कोटींचा तोटा झाल्याचे मांडले आहे.
हा तोटा भरून काढण्यासाठीच ही वीज दरवाढ प्रस्तावित करण्यात आल्याचे आयोगापुढे मांडलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. विशेष म्हणजे कृषी पंपधारकांसाठी महावितरणने सर्वाधिक अशी 35 टक्के वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे. तर, घरगुती वापरासाठीच्या वीज दरात 5 टक्के आणि वाणिज्य वापरासाठीच्या दरात 15 टक्के इतकी दरवाढ सुचवण्यात आली आहे. ही दरवाढ मंजूर झाल्यास सामान्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड बसणार आहे. या प्रस्तावित दरवाढीबाबत नागरिकांना येत्या एक ऑगस्टपर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. दाखल हरकतींवर 9 ऑगस्ट रोजी कौन्सिल हॉल येथे आयोग सुनावणी घेणार आहे.
महावितरणला 2018च्या सहा महिन्यांत ग्राहकांकडून वाढीव वीजदरातून 15 हजार 714 कोटी आणि 2019-20 या वर्षात 15 हजार 128 कोटी रुपये वसूल होणे अपेक्षित आहे. सध्या खुल्या बाजारात प्रतियुनिट 2 रुपये 50 पैसे दराने वीज उपलब्ध आहे. महावितरणच्या विजेचा किमान दर प्रतियुनिट 4 रुपये आहे. त्यामुळे रेल्वेसह मोठे औद्योगिक ग्राहक महावितरणपासून दुरावले आहेत.
दरवाढीच्या झळा कोणाला ?
- घरगुती ग्राहकांसाठी 100 युनिटच्या पुढे 5 टक्के
- कृषिपंपासाठी सर्वाधिक35 टक्के
- सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे, शाळा, रुग्णालये, औद्योगिक निर्मितीसाठी 2 ते 20 टक्क्यांपर्यंत
- रेल्वे, मोनो रेल, मेट्रो, मॉल्स, कृषिपंपाच्या स्थिर आकारात 109 टक्क्यांची वाढ
'शेतपंपांचा वापरापेक्षा दुप्पट वापर दाखवून महावितरण अनुदान आणि आणि वसुली लाटत आहे. हा एकप्रकारे भ्रष्टाचाराचा धंदा बनला आहे.
प्रस्तावित दरवाढीत महावितरणची व्यावसायिकता कुठेच दिसत नाही. या अन्यायी दरवाढीचा वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून वीज नियामक आयोगापुढे विरोध केला जाईल.''
- प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ आणि वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष
स्थिर आकारातही होणार वाढ
घरगुती वापरासाठीच्या वीजदरात पाच टक्केच वाढ केली असल्याचे महावितरणकडून दाखविले जात असले, तरी प्रत्यक्षात या ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या स्थिर आकारातही मोठी वाढ प्रस्तावित केली आहे. त्यानुसार शून्य ते 100 युनिटपर्यंत ग्राहकांकडून आकारण्यात येणाऱ्या स्थिर आकारात 115 टक्के (म्हणजे 60 रुपयांवर 140 रुपये); तर 101 ते 300 युनिटपर्यंत वापर करणाऱ्यांच्या स्थिर आकारामध्ये 162 टक्के वाढ (65 रुपयांवरून 170 पर्यंत) प्रस्तावित करण्यात आली आहे. या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. वाणिज्यसाठीच्या स्थिर आकारात 109 टक्के, कृषीसाठीच्या स्थिर आकारात 100 टक्क्यांनी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.
|