भोसरीत चौक, रस्त्यांना  अतिक्रमणांचा विळखा 

भोसरीत चौक, रस्त्यांना  अतिक्रमणांचा विळखा 
Updated on

भोसरी - येथील पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता, आळंदी रस्ता, भोसरी-आळंदी रस्ता चौक, भोसरी-दिघी रस्ता चौक, चांदणी चौक आदी भागातील रस्त्यांसह पदपथ फळे व विविध वस्तू विक्रेत्यांनी व्यापल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे येथील रस्ता आणि चौकांत नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यातून सुटका होण्यासाठी अतिक्रमणे हटवून विक्रेत्यांसाठी हॉकर्स झोनची निर्मिती करणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे नो पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवरही कारवाई करणे गरजेचे आहे. 

समस्यांच्या विळख्यात आळंदी रस्ता 
भोसरीतील आळंदी रस्ता हा मुख्य बाजारपेठ आहे. तेथील पदपथावर दुकानदारांनी विक्रीच्या विविध वस्तू ठेवून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ग्राहकांना रस्त्यानेच जावे लागते. भोसरी वाहतूक पोलिस शाखेद्वारे रस्त्यावर सम-विषम पी-1, पी-2 पार्किंग व्यवस्था केली आहे. मात्र या रस्त्यावर पार्किंगचे नियम वाहन चालाकांद्वारे पाळलेले पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे दररोज रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावली जातात. असे असतानाही नो पार्किंगमध्ये असलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली आहे. 

मंगल कार्यालयांमुळे कोंडी 
आळंदी रस्ता व नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर मंगल कार्यालये आहेत. तिथे लग्न समारंभ असल्यास दोन-दोन तास वाहतूक कोंडी होते. भोसरी- आळंदी रस्ता चौक ते बनाचा ओढा हे सुमारे अर्धा किलोमीटरचे अंतर जाण्यासाठी वाहनचालकांना वीस ते पंचवीस मिनिटे लागतात, अशीच परिस्थिती सेवा रस्त्यावरही असते. 

दिघी रस्त्यावरही अनधिकृत व्यापारी 
दिघी रस्त्याचा एक पदरी भाव अनधिकृत भाजी-फळे विक्रेत्यांनी व्यापला आहे. टेंपोतून फळे, भाजी विक्रेतेही रस्त्यावर जागोजागी दिसतात. त्यामुळे या रस्त्यावरही वाहतूक कोंडीची पाहायला मिळते. 

पदपथावर विक्रेत्यांचे राज्य 
पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर खंडोबामाळ, गव्हाणेवस्ती आदी भागातील सेवा रस्त्यावर वाळू, वीट, सिमेंट, खडी मालकांनी अतिक्रमण केले आहे. धावडे वस्तीजवळ सेवा रस्त्यावर हातगाडीवर फळे-भाजी-वस्तू विक्रेत्यांचे अतिक्रमण, तर आळंदी रस्ता चौकाजवळ फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण असते. 

खासगी वाहनांचा विळखा 
भोसरी-दिघी रस्ता चौक, भोसरी-आळंदी रस्ता चौक, सेवा रस्ता आदी ठिकाणी रिक्षा, ऍपे, जीप, बस आदी खासगी प्रवासी वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त थांबलेली असतात. 

हॉकर्स झोनच्या अडचणी 
पिंपरी- चिंचवड महापालिकेने भोसरी परिसरात हॉकर्स झोनसाठी एक हजार दोनशे 42 व्यापाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यात स्थिर विक्रीसाठी 809, तर अस्थिर विक्रीसाठी 229 पात्र अर्ज आहेत. महापालिकेकडे हॉकर्स झोनसाठी 932 जागा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे परिसरातील अतिक्रमित व्यापाऱ्यांची संख्या सुमारे दोन हजार असल्याने उर्वरित व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाची बिकट समस्या आहे. त्याचप्रमाणे हॉकर्स झोनच्या जागेला काही स्थानिक व्यापाऱ्यांसह काही संघटनांचाही विरोध आहे. 

अतिक्रमणामुळे उद्‌भवणाऱ्या समस्या 
* रस्त्यावर वाहनांच्या रांगा व कोंडी 
* विक्रेत्यांद्वारे कचऱ्याचे साम्राज्य व दुर्गंधी 
* पदपथांऐवजी पादचारी रस्त्यावरून जातात 
* वाहनांसाठी एक पदरी रस्ता शिल्लक राहतो 
* वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका अधिक 
* भोसरीतील रस्त्यांवर बकालपणा वाढला 

सदनिका विक्रीस अडचण? 
भोसरी परिसरात बिल्डरद्वारे टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. मात्र सदनिका खरेदी करण्यासाठी येणारी व्यक्ती भोसरीतील वाहतूक कोंडीत अडकल्यास येथील सदनिका विकत घेण्याचे टाळत असल्याचे सदनिका विकसक सांगतात. 

काय उपाययोजना कराव्यात ? 
* हॉकर्स झोनची अंमलबजावणी 
* नो हॉकर्स झोनमधील विक्रेत्यांवर कारवाई 
* अनधिकृत विक्रेत्यांवरील कारवाईत सातत्य 
* अतिक्रमणविरोधी पथकासाठी कार्यालय हवे 
* अतिक्रमण करणाऱ्यांना राजकीय अभय नसावे 
* गावठाणाप्रमाणे दिघी, चऱ्होली भागात मंडई हवी 
* फिरत्या विक्रेत्यांचे पुनर्वसन करावे 
* चौकांतील वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करावेत 
* अतिक्रमण निर्मूलनासाठी अधिकाऱ्यांना पाठबळ द्यावे 
* मंगल कार्यालयांनी पार्किंगची सोय करावी 

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी 
- भोसरी-दिघी रस्ता चौकातून वाहनांना दिघी रस्त्याने प्रवेश न देता भोसरी-आळंदी रस्ता चौकातून यु टर्न घेऊन दिघी रस्त्याकडे वळवावे 
- पीएमटी चौकातून पुण्याकडे जाणाऱ्या पीएमपी बस आळंदी रस्ता चौकातून यू टर्न घेऊन पुढे न्याव्यात 
- दोन्ही चौकात थांबत असलेली खासगी प्रवासी वाहने रांगेत थांबविण्यासाठी 
वाहनचालकांनी शिस्त लावावी 

उड्डाण पुलाखाली हवी पार्किंग 
सध्या राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखाली खाद्यपदार्थांसह विविध वस्तू विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करून पुलाखालील जागेत पार्किंगचे नियोजन केल्यास इतर ठिकाणी लावण्यात येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होईल. या नियोजनानंतर दोन्ही बाजूंकडील सेवा रस्त्यावर नो पार्किंग झोन तयार करण्यात यावा. 

नागरिक म्हणतात 
पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर सम्राट अशोकनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खासगी वाहने उभी केली जातात. नागरिकांना गावात प्रवेशही करता येत नाही. भोसरीतील सर्वच रस्त्यावर नो पार्किंग, पांढरे पट्टे मारून अंमलबजावणी गरजेची आहे. 
- भाऊसाहेब डोळस, सामाजिक कार्यकर्ते 

चार हजार अनधिकृत व्यापाऱ्यांना जगविण्यासाठी चार लाख नागरिकांना दररोज अडचणीस सामोरे जावे लागते. फळे-भाजी विक्रेते यांच्याव्यतिरिक्त इतर सर्व विविध वस्तू विक्रेत्यांवर 
कारवाई होणे गरजेचे आहे. पार्किंगची सोय केली पाहिजे. सर्वच चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करावेत. 
- योगेश गवळी, सामाजिक कार्यकर्ते 

नगरसेवक म्हणतात 
स्मार्ट सिटी प्रकल्प पिंपळे सौदागरला राबविण्यात येत आहे. तसा प्रकल्प भोसरीत राबविणे गरजेचे होते. त्यामुळे येथील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना आळा बसला असता. रस्त्यावरील अतिक्रमणे थांबली पाहिजे. व्यापाऱ्यांचे पुनर्वसनही झाले पाहिजे. 
- अजित गव्हाणे 

भोसरीतील अतिक्रमण हटविण्याचे महापालिकेचे नियोजनशून्य आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालयही उदासीन आहे. येथील अतिक्रमण विभाग अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्‍न आहे. रस्त्यावर बसणाऱ्या व्यापाऱ्यांना महापालिकेने जागा उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे. मात्र, संबंधित अधिकारी नेहमीच वेळ मारून नेतात. 
- ऍड. नितीन लांडगे 

भोसरीतील आळंदी रस्त्यावर एकेरी वाहतुकीसाठी भोसरीतील व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त यांच्या पाठपुराव्याने रस्त्यावरील व्यापाऱ्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करणार आहे. 
- सागर गवळी, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती, महापालिका 

अधिकारी म्हणतात 
भोसरीतील रस्त्यांवर बसणाऱ्या अनधिकृत व्यापाऱ्यांवर नियमित कारवाई करण्यात येते. भोसरीतील हॉकर्स झोनला काही स्थानिक व्यापाऱ्यांसह काही संघटनांचाही विरोध आहे. त्यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांच्या पुनर्वसनात अडचणी येत आहेत. 
- चंद्रकांत इंदलकर, क्षेत्रीय अधिकारी, इ क्षेत्रीय कार्यालय 

भोसरीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या सर्वच वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. आळंदी रस्त्यावर नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्यांवरही कारवाई सुरूच आहे. भोसरीतील सर्वच चौकात वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्याची मागणी महापालिकेकडे करणार आहे. 
- अरुण ओंबासे, पोलिस निरीक्षक, भोसरी वाहतूक शाखा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.